मंगळवेढा : पिण्याचा व शेतीचा पाणी प्रश्न, पुरेशा प्रमाणात वीज, रस्ते व इतर सुविधा दिल्या नसल्याच्या कारणावरून तालुक्याच्या दक्षिण भागात सिमावर्ती भागात असलेल्या तालुक्यातील लवंगी ग्रामपंचायतीने चक्क कर्नाटक राज्याला जोडण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत केला.
याबाबत या ग्रामपंचायतीची मासीक सभा सरपंचाच्या अध्यक्षेते खाली 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली त्यामध्ये ठराव क्र 6 नुसार हा ठराव केला.लवंगी हे गाव सिमावर्ती भागात असल्यामुळे शासनाने कोणत्याही सुविधा या गावावरती देण्यात आलेल्या नाहीत. 2009 साली शेतीच्या व पिण्याच्या पाण्यावरून तत्कालीन सरपंच स्व. जयसिंग निकम यांनी पाणी आंदोलनाचा लढा उभारला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत या गावाने शंभर टक्के बहिष्कार टाकला गावाच्या सीमावर्ती भागात उटगीजवळ म्हैसाळ योजनेचे पाणी आले ते पाणी या परिसरात सहजपणे येऊ शकते परंतु अद्यापही या पाण्याबाबतचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री तथा विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या भागातील शेतीच्या पाण्यापासून संदर्भात शैला गोडसे यांच्या पुढाकारातून बैठक घेऊन नव्याने गावे समावेश करण्याबाबत निर्णय घेतला परंतु या प्रश्नामध्ये म्हणावी तितकी गती घेतली नाही.
पिण्याच्या पाण्याची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. यापूर्वी कमी प्रमाणात आलेल्या पाण्याची भरमसाठ पाणीपट्टी आकारणी केले आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सध्या शेतीसाठी पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा केला जात नाही. जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी महावितरण चालढकल करत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना खाजगीत हे ट्रान्स्फार्मर भरमसाठ रकमा भरून बसवावे लागत आहे.
या भागातील रस्ते खराब झाले असून त्याची दुरुस्ती केली जात नाही. साखर कारखानदारीमुळे या भागात वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खड्ड्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. गावात असलेल्या प्राथमिक शाळेला शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे देखील बारा वाजले आहेत.राज्य बदलाच्या मागणीचा ठराव या ग्रामपंचायतीने केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
केवळ सीमावर्ती भागात आहे म्हणून नियुक्त कर्मचारी या भागामध्ये काम करण्यासाठी नाक मुरडतात. कोणत्याही कामासाठी या भागातील नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो या भागातील समस्याकडे शासन लक्ष देत नसल्यामुळे केवळ सीमावर्ती भाग म्हणून अन्याय सहन करावा लागला, सातत्याने अन्याय सहन करण्यापेक्षा उलट कर्नाटक राज्याला जोडलेले बरे मानसिकता होऊ लागली.
महादेव देवकर,लवंगी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.