सोलापूर : आयुष्यभर दुसऱ्यासाठी झिजत असताना आपल्या शरीराची कशी आणि कधी झीज होते, हे लक्षातच येत नाही. दुसऱ्यासाठी झटणारे हात-पाय सांधेदुखीमुळे असह्य वेदना देऊ लागल्यास दुसऱ्याचे बघण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वत:कडेच झालेले दुर्लक्ष अनेकांच्या लक्षात येते. असह्य वेदना देणारी गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, स्पोंडीलिसिस, खांदेदुखी यांसारख्या वातविकारांवर अग्निकर्म म्हणजे सुखद चटका मानला जात आहे.
सध्या भौतिक साधनांची व सोयी-सुविधांची विपुल उपलब्धता आहे. त्यामुळे माणूस हा भौतिक साधनांच्या सवयीमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक विकारांना बळी पडत आहे. वाढलेले वय, थंडी, पुरेशी झोप न होणे, वेळेवर जेवण न करणे, सकस आहाराचा अभाव, व्यायाम न करणे यामुळे वातविकार उद्भवतात. दुसऱ्यासाठी स्वत:चे आयुष्य आणि शरीर झिजवत असताना आपल्या आरोग्याकडे आपणच बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. आयुर्वेदात साधारणतः पाच हजार वर्षांपासूनच चालत आलेली उपचार पद्धती मागे पडली होती. बदलती जीवनशैली, खाण्याच्या, झोपण्याच्या चुकलेल्या वेळा यामुळे अनेकांना ऐन उमेदीच्या काळात वातविकारांचा सामना करावा लागत आहे. वातविकारांमुळे होणाऱ्या असह्य वेदनांवर मात करण्यासाठी अग्निकर्म ही सोपी व खात्रीशीर पद्धत असल्याने अनेकांनी या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे.
अशी ठेवा जीवनशैली...
सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे आवश्यक आहे. व्यायाम/ योगा/ प्राणायाम झाल्यानंतर सकाळी नऊ ते १० च्या दरम्यान सकस आहाराचा नाश्ता किंवा जेवण करावे. दुपारी एक ते दोनच्या सुमारास जेवण, त्यानंतर सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान रात्रीचा हलका आहार घ्यावा. रात्री कमी व हलके जेवण केल्यानंतर किमान दोन ते तीन तासांनंतरच झोपावे. रात्री १० ते ११ च्या सुमारास झोपल्यास पहाटे पाचपर्यंत सहा ते सात तासांची व्यवस्थित झोप होते. जीवनशैली व्यवस्थित ठेवल्यास वातविकारांवर मात करता येऊ शकते, अशी माहितीही डॉ. लांडे यांनी दिली.
असे होते अग्निकर्म...
सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयातील पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत लांडे म्हणाले, लोखंड, तांबे, चांदी, सोने, कांस्य किंवा मिश्रधातूपासून बनवलेल्या गरम शलाकाद्वारे शरीराच्या वेदनादायक भागाला विशेष ऊर्जा (उष्णता) देऊन आराम देण्याचे जुने तंत्र आहे. शरीरातील विविध स्नायू आणि त्यांचे विकार दूर करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. या उपचारामुळे ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी नवीन पेशींची झपाट्याने वाढ होते. त्या ठिकाणचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. उपचारादरम्यान रुग्णाला अल्प वेदना जाणवतात. रुग्ण डोळे मिटून बसला असेल तर त्याला कळतही नाही की त्याचे उपचार अग्निकर्माने केले आहेत. अग्निकर्म ही भारतीय वैद्यक पद्धतीमध्ये वर्णन केलेली वेदना व्यवस्थापन प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारच्या वेदनांसाठी ही प्रक्रिया आहे आणि ती औषधविरहित प्रक्रिया आहे. सुश्रुत संहितेच्या शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथात सांगितल्यानुसार, आयुर्वेदामध्ये वेदना किंवा विविध सौम्य रोगांसाठी वापरली जाणारी अग्निकर्म ही उपचार पद्धती आहे.
आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ
भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने नेमलेल्या बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे सदस्य डॉ. नारायण जाधव म्हणाले, आचार्य सुश्रुत यांच्या सिद्धांतानुसार भैषज, क्षार, अग्निकर्म व शास्त्र या उपायानुसार सगळ्याच आजारांत आयुर्वेद सिद्धांत पाळण्यासाठी अग्निकर्म केला जातो. गोवा येथे 8 ते ११ डिसेंबरमध्ये ९वी जागतिक आयुर्वेद परिषद होत आहे. या परिषदेत जगभरातील ४५ देशांमधील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पाच हजार आयुर्वेदिक डॉक्टर, ३५० आयुर्वेदिक कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाला पाच लाख नागरिक भेट देतील असा अंदाज आहे. आयुर्वेदाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वेदापासून पूर्ण तंत्रज्ञानापर्यंत भारतीय चिकित्सा पद्धतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालयाचा मोठा लाभ होत आहे.
फसवणूक टाळा,तज्ज्ञांकडूनच उपचार घ्या
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे म्हणाले, अग्निकर्माच्या नावाखाली काही ठिकाणी क्रूर पद्धती अवलंबल्या जातात. रुग्णांनी तज्ज्ञ व प्रशिक्षित व्यक्तींकडूनच अग्निकर्म करून घ्यावे. अग्निकर्मासाठी लोह, तांबे, सोने, चांदी या धातूंसह शेळीची लेंडी, गूळ, बिबा, विटेचा तुकडा, धूप स्टिकप्रमाणे मातीपासून केलेली वात (खापर) याचा अवलंब केला जातो. अरण (ता. माढा), शेळवे (ता. पंढरपूर), श्रीपत पिंपरी व गाडेगाव (ता. बार्शी), जिंती (ता. करमाळा) येथील आयुर्वेदिक दवाखान्यात व अक्कलकोट, मोहोळ, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा व नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालय या शासकीय संस्थांमध्ये मोफत अग्निकर्म केले जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.