Solapur News: सकाळ वृत्तसेवा सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासावर येऊन ठेपला असताना पंढरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस मताधिक्याची हॅट्रिक करणार की भाजपला मताधिक्य मिळणार ? याचीच निकालापेक्षा अधिक उत्सुकता लागून राहिली.
या मतदारसंघातून 2014 ला मोदी लाट असताना देखील स्व. आ.भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य मिळाले तीच परिस्थिती 2019 ला होती. स्व. आ. भारत भालके यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसला मताधिक्य मिळाले मात्र मताधिक्यात घट ही वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे झाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत वंचितचा प्रभावी उमेदवार नसल्यामुळे वंचितला पडलेली मते यंदा कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली.
तर दुसऱ्या बाजूला भाजप उमेदवाराला गत निवडणुकीत पडलेल्या मतामधील किती मते शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कमी होऊन ती मते काँग्रेसच्या मतात समाविष्ट होणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे शिवाय गत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना लिंगायत समाजाने त्यांना गुरु मानून मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले मात्र यंदा ते उमेदवार नसल्यामुळे लिंगायत समाजाची किती मते भाजप उमेदवारांना मिळणार आणि किती मते काँग्रेस उमेदवार मिळणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला दहा वर्षातील हजाराची निष्क्रिय कामगिरी या मतदारसंघात न सुटलेला पंढरपूर विजापूर रेल्वे मार्ग, पीक विम्याची न मिळालेली भरपाई, दुष्काळात तालुक्याचा समावेश नसणे, पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यास प्रशासन झालेला विलंब ,काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अगोदरच गावाचे केलेले दौरे व अंतिम टप्प्यात भगीरथ भालके समर्थकांची मिळालेली साथ ही काँग्रेस उमेदवारासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी पंढरपुरातून माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या बरोबरीने आ.समाधान आवताडे दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील शिवाय भाजपची प्रभावी बुथ यंत्रणा या जोरावर भाजपला देखील चांगली मते मिळेल या आशेवर आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला गॅस योजना, मोदी आवास योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना, या योजना ग्रामीण भागातील मते घेण्यासाठी जमेच्या ठरणार आहेत 2014 व 2019 सारखी यंदा मोदी लाट या मतदारसंघात प्रभावी ठरणार नसली तरी भाजपच्या उमेदवाराला मतदारसंघातील संपूर्ण गावाचा दौरा करता आला नाही.
त्यामुळे त्यांना पंढरपुरातून प्रशांत परिचारक व मंगळवेढ्यातून आ. समाधान अवताडे यांनी घेतलेली घोंगडी बैठक याच जोरावर मताधिक्यासाठी अवलंबून राहावे लागणार आहे त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघातून मताधिक्य घेण्यास आघाडीवर राहणार की भाजप उमेदवार आघाडीवर राहणार हे येत्या काही तासातच स्पष्ट होणार आहे.-
केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकांना राबवलेल्या विकासात्मक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय निर्माण झालेली प्रतिमा, मतदारसंघातील वंचिताचे प्रश्न सोडवण्यासाठी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून नाराज घटकाचे प्रश्न सोडण्यास आलेले यश यामुळे या मतदारसंघातून भाजपाचे राम सातपुते यांना मताधिक्य मिळून या मतदारसंघात भाजपाची हॅट्रिक होईल.
--------
लोकसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीतून निश्चित झाल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे राज्यात असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे त्या या मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होणार आहेत.
मतदारसंघातल्या प्रश्नाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी होती,ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष,नेमकी तीच संधी साधून आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक जाहीर होण्याआधी केलेले गावभेट दौरे व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाय्रांनी केलेले कष्ट यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नेहमीप्रमाणे आघाडीवर राहणार आहे गत निवडणुकीत वंचितला मिळालेली मते काॅग्रेसला मिळणार असल्यामुळे या मतदारसंघातून दुप्पट चांगले मताधिक्य मिळून प्रणिताईच खासदार होणार .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.