माळीनगर : सुपोषित भारत या संकल्पनेखाली आता पोषणाची चळवळ सर्वत्र पसरू लागली आहे. या चळवळीत महाराष्ट्राने सातत्याने अग्रेसर रहात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या पोषण पंधरवड्यात महाराष्ट्रने देशात पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व सहभागी लाभार्थींची संख्या या दोन्हीही प्रकारात महाराष्ट्र राज्याने हे यश मिळविलेले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांच्या संख्येत गुजरात आणि उत्तर प्रदेशला तर लाभार्थ्यांच्या संख्येतही कर्नाटक आणि गुजरातला मागे टाकले आहे. आरोग्य आणि पोषण विषयांमध्ये जागृती करून आहार आणि आरोग्य विषयक सवयींमध्ये मूलगामी बदल करण्यासाठी पोषण अभियान सर्व स्तरावर राबविले जाते. कुपोषण निर्मूलनाची वार्षिक उद्दिष्टे निश्चित करून शासनाच्या विविध विभागांमधील अभिसरण पद्धतीने ही उद्दिष्टे साध्य करण्याबाबत कार्यवाही केली जाते. महिला आणि बालविकास विभाग पोषण अभियानात नोडल विभाग म्हणून कार्य करतो तर नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग हे पोषण अभियानाचा एक भाग आहेत. समाजामध्ये आहार आणि आरोग्य विषयासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी, स्वच्छतेचे भान निर्माण व्हावं आणि आरोग्याची चळवळ उभी व्हावी, यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम शासनाच्यावतीने आयोजन केले जातात.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना तर मार्च महिन्यात पोषण पंधरवडा साजरा केला जातो. या दोन्ही जनचळवळींमध्ये महाराष्ट्राने सातत्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. यावर्षी पोषण पंधरवड्यामध्ये पाण्याचे महत्त्व, निमियाबाबत जनजागृती आणि आहारामध्ये घरच्याघरी बनविलेल्या गरमागरम व ताज्या पदार्थांचं महत्त्व या संकल्पनावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या उपक्रमांना लाभार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या उपक्रमांची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. देशात पहिला क्रमांक मिळवताना महाराष्ट्राने सुमारे १ कोटी ४५ लाख ५८ हजार ६८० कार्यक्रम घेतले. गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाभार्थ्यांच्या संख्येतही महाराष्ट्र अग्रेसर असून ११३ कोटी ४६ लाख ३५ हजार ५५२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. लाभार्थ्यांच्या संख्येबाबत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कार्यक्रमांच्या संख्येबाबत अनुक्रमे रायगड, सातारा आणि पुणे हे जिल्हे अग्रेसर आहेत. लाभार्थ्यांच्या सहभागाबाबत अनुक्रमे रायगड, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
महिला बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.