सोलापूर-अमृत भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि दुधनी या चार रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सुमारे १४७ कोटी रुपयांच्या निधीमधून या तीन रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे.
आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ पार पडला.अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांवर विविध कामे केली जाणार आहेत. या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी पार पडला.
दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, इतर मंत्री व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते. सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी ४५० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांसाठी १४७ कोटींचा निधी मिळाला आहे.
यातून रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा देताना शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या योजनेमधून करण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या बेलापूर, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, दुधनी, गाणगापूर, कलबुरगी, शाहबाद आणि वाडी या १५ रेल्वे स्थानकांवरील ४५० कोटींच्या कामांचे उद्घाटन आज झाले.
पंढरपूर रेल्वे स्थानकावरील विविध कामांसाठी ३९ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, त्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. ही कामे झाल्यावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार असून, पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणामुळे पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी जंक्शन हे महत्त्वाचे स्थानक असून मुंबई, पुणे, सोलापूर, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, कन्याकुमारी, तिरुपती, नागपूर, कोल्हापूर, लातूर, विशाखापट्टणम, चेन्नई, भुवनेश्वर यासह सर्व महत्त्वाच्या शहरांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. कुर्डुवाडीच नव्हे तर माढा, मोडनिंब, बार्शी, पंढरपूर, वैराग, टेंभुर्णी या परिसरातील नागरिक प्रवासासाठी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाला प्राधान्य देतात.
या अद्ययावत रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
जिल्ह्यासाठी मंजूर निधी
सोलापूर रेल्वे स्थानक - ५५.८५
पंढरपूर रेल्वे स्थानक - ३९.५२
कुर्डुवाडी रेल्वे स्थानक - २९.७४
दुधनी रेल्वे स्थानक - २१.६८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.