राजकीय रंग sakal
सोलापूर

Solapur: राजकीय रंग खेळू चला... राजकीय रंग उधळू चला...

जिल्ह्यात राजकीय रंग बारा महिने अन् चोवीस तास उडणारे; प्रत्येक राजकारण्यांचा रंगात रंग वेगळा

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी भोसले

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात नेतेमंडळींचा शिमगा अन् राजकीय रंग उधळणं हे तसं समीकरण. परंतु, राजकारणामधील प्रत्येक नेतेमंडळींचा प्रत्येकाचा रंग हा वेगळा असतो. ‘रंगात रंग माझा वेगळा’ याचा प्रत्यय प्रत्येक वेळी या नेतेमंडळींकडून येत असतो.

आजच्या रंगपंचमीच्या निमित्ताने, जिल्ह्यातील काही नेतेमंडळींना आपण ‘अक्षर रंग’ लावतोय. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका यांच्या निवडणुकीची धुळवड पुढे गेली असली तरी आमदारकीच्या अन् खासदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, या नेतेमंडळींनी राजकीय रंग लावणं सुरु ठेवले आहे. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

सुशीलकुमार शिंदे यांच्या ध्यानी, मनी आणि स्वप्नी‘तिरंगा’ हाच रंग बरं का. राजकारण करताना आपल्याला आव्हान देणारं नेतृत्व सोलापुरात उभा राहू नये, म्हणून आजवर त्यांनी अनेक रंग खेळले. पण तिरंग्याशी ते एकनिष्ठ राहिले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा रंग खेळण्यावर अद्याप ते तटस्थ राहत असले तरी सोलापूर लोकसभेचा रंग खेळताना मलिकार्जुन खर्गे, नाना पटोले यांनी कितीही विरोधात रंग उधळले तरी गांधी परिवार आपले ‘हात’ भाजणार नाही, सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे आपल्यापेक्षा तगडा उमेदवार नाही, याची खात्री असल्याने सुशीलकुमार शिंदे हे रंगपंचमी ‘तिरंगा’ रंगाने खेळणारं बरं. ‘जनवात्सल्य’वर रंग घेऊन कोणी जाणार असाल, तर तिरंगाच घेऊन जा. सुशीलकुमारांच्या रंगाबद्दल खात्री करून घ्यायची असेल तर चेतनभाऊंना संपर्क करा.

प्रणिती शिंदे यांना भाजपचं ‘कमळ’ हाती घेत ‘भगवा’ रंग घेऊन रंगपंचमी खेळावी, अशी ऑफर असली प्रणितीताईंसोबत कोणी ‘जनवात्सल्य’वर रंग खेळण्याला जाणार असाल तर ‘तिरंग्या’पैकी कोणातही रंग घेऊन जा. प्रणिती यांचं अजूनही ‘भगवा’ रंग हाती घेण्याचं ठरलेलं नाही. ‘भगव्या दहशतवादा’ची अजून तरी त्यांना अ‍ॅलर्जी आहे बरं. अगदी त्यांच्या पित्याप्रमाणे. चुकून भगवा रंग घेऊन गेला तर बोलून ‘क्लीन बोल्ड’ करतील तुम्हाला.

त्यांचा ‘क्लीन बोल्ड’ काय असतो, हवं तर विचार आमदार रोहित पवारांना ‘जनवात्सल्य’ बंगल्याजवळच असणाऱ्या उदयअण्णा पाटील यांच्याकडे रंगपंचमी खेळण्यासाठी जाणार असाल तर बिनधास्त ‘भगवा’च रंग घेऊन जा. अनेक वर्षे विजनवासात असलेले ‘अण्णा’ रंगाची बादली घेऊन सज्ज आहेत, मात्र दक्षिण किंवा उत्तर यापैकी कोणत्या मतदार संघात निवडणुकीचे रंग उडवायचे, याच्या निरोपाची वाट ते पाहत आहेत बरं.

होटगी रस्त्याला सुभाषबापू देशमुखांच्या अतिक्रमणग्रस्त बंगल्यात रंग खेळायला नक्की जा. तिथं ‘भगवा’ रंगच चालणार पण. उदयअण्णांचं अतिक्रमण ‘दक्षिण’मध्ये होईल की काय? याचं टेन्शन सुभाषबापू यांना आहे बरं का, तेव्हा त्यांचा मूड बघून रंग खेळायला जा. त्यांच्या मुडबद्दल सांगायला अविनाश महागावकर आहेतच की, काळाजापूर मारुतीजवळच्या विजयकुमार देशमुख मालकांच्याकडे भगव्या रंगाची उधळण होईल.

कारण मालकांची भगव्यावर खूप निष्ठा. ‘सही दिशा अन् स्पष्ट नीती हेच मालकांचे पक्षाप्रमाणं धोरण. पण उदयअण्णा आणि धर्मराज काडादी यांच्यामुळे मालक म्हणे टेंन्शमध्ये आहेत,काडादींपेक्षा मालकांना अण्णांचे अवघड वाटतं. तरीपण मालक ‘उत्तर’मध्ये विधानसभेला स्वतः: रंग उधळणार की सुपुत्र डॉ. किरण यांना संधी देणार? यावरदेखील रंग उळधणं अवलंबून आहे.

जिल्हा परिषदेसमोरच्या माने बँकेत रंग लावायला जाणार असाल तर रंग कोणता न्यायचा हे ठरवा आणि मगच जा. कारण मालकांनाच कोणता रंग धार्जिन नाही असं झालं आहे. ‘भगवा’ सोडून बारामतीकरांचा ‘पॉवर’बाज रंग हाती घेऊन राजकारण करावं म्हटलं तर बारामतीकरांचीच सरकारमधली टिकटिक बंद झाली.

घड्याळाचे काटे उलटे-सुलटे झाले. त्यांचा रंगाचा बेरंग झाला. त्यामुळे माने बँकेत बसून राजकारणाचे अनेक रंग उधळलेल्या मालकांचे अवघड झालयं. तेव्हा त्यांच्याकडे रंगपंचमी खेळण्यासाठी जात असाल तर शिवाजी घोडके यांना विचारा, कोणता रंग घेऊन यायचा ते. नाहीतर विनाकारण भ्रमनिरास होईल.

डफरीन चौकात गंगा निवासमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी जात असाल तर बिनदिक्कतपणे कोणताही रंग घेऊन जा. धर्मराज काडादी म्हणजे राजू मालकांना कोणताही रंग आवडेल. तशी त्यांनी मानसिकता करून घेतली आहे. कारखान्याची चिमणी, शेतकऱ्यांचे हित या आडून राजू मालकांनी जणू सगळेच रंग ‘मॅनेज’ केलेत. केतन शहा आणि सोलापूर विकास मंच यांच्याच फक्त रंगांची त्यांना अ‍ॅलर्जी आहे बरं.

मुरारजी पेठेत महेश कोठे यांना रंग लावायला जाणार असाल तर कोणता रंग घेऊन जाणार याची फिकीर करु नका. महेशआण्णा यांना कोणताही रंग चालू शकतो. कारण अण्णा यांनी अद्याप कोणताच रंग फायनल केलेला नाही. आमदारकी मिळवायची हे मात्र त्यांचे फायनल आहे. त्यासाठी वाटेल तो रंग त्यांना चालू शकतो.

शेळगीला खासदार महास्वामी यांच्या मठात रंग खेळायला जाणार असाल तर तिथे फक्त चालेल ‘भगवा’ ‘सत्यमेव जयते, मी देशसेवा करण्यासाठी खासदार’ असं सांगणाऱ्या महास्वामी यांनी खासदारकी मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी किती खोटे रंग उधळले हे जगाला माहीत हा भाग वेगळा. पण तिथे चालणार फक्त भगवाच. त्याच्या आडून खोटेपणाचे कितीही चालू शकतात रंग.

बारामतीकरांना चालणारा रंग घेऊन अनगरला राजन पाटील यांना रंग लावायला जाणार असेल तर विचार करा. मालकांना तो रंग आता चालणार आहे का, शिवाय रंगपंचमी खेळण्यासाठी राजन मालक हे अनगर ग्रामपंचायत किंवा कारखान्यावर आहेत का, दाजी आमदार बबनराव शिंदे यांच्याकडे ‘भगवा’ रंग घेऊन धुळवड कशी खेळायची, हे विचारला गेलेत का खात्री करा बरं. कारण आता म्हणे त्यांचं दाजीच ठरविणार आहेत.

बाळराजे यांनी सगळं काही अगोदरच ठरवून ठेवलं आहे हा भाग वेगळा. मोहोळमध्येच संजय क्षीरसागर यांच्याबरोबर त्यांच्या धुळवड हॉटेलवर रंग खेळायला जा, परंतु, एकवेळ भगवा रंग घेऊन जा. मात्र पिवळा भंडारा घेऊन जाऊ नका. सध्या त्यांचा भंडारावाला समाज त्यांच्या खार खाऊन आहे. समाजामधील उद्ध्वस्त झालेल्या लेकीबाळीला न्याय देण्याऐवजी ़संजयअण्णा यांनी अनगरकर पाटलांची मांडिलकी केली असा त्यांच्या आळ आलाय, त्यातून समाज त्यांच्यावर बिघडालय म्हणे.

बारामतीकर पवार परिवार आणि राष्ट्रवादीशी नातं सांगत, रंग उधळणाऱ्या उमेश पाटील यांना रंग लावायला जाणार असाल तर, बारामतीकरांचा रंग त्यांना चालेल. राजन पाटील यांनी भगवा रंग हातात घेऊ द्या, अगर अन्य काही. बारामतीकरांच्या जिवावर उड्या मारत रंग उधळण यामध्ये धन्य मानणाऱ्या उमेश पाटील यांना स्वतः:च्या वैयक्तिक नेतृत्वाचे रंग उधळणे हेच त्यांच्यासाठी भारी बरं का.

अकलूजला ‘शिवरत्न’ बंगल्यावर रंग खेळायला जात असाल तर ‘भगवा’ रंग घेऊन जा. माढेकर शिंदे, फलटणकर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या केवळ रंगांची अ‍ॅलजी मोहिते-पाटील बंधू यांना आहे. ते आणि अन्य काहीजण वगळता अन्य जणांचे रंग त्यांना चालतील.

दिलीप सोपल आणि रश्मी बागल कोलते यांना त्यांच्या पक्षाप्रमाणं ‘भगवा’ रंग लावायला जाल, ते स्वीकारतीलदेखील. पण ते मनापासून नाही. कारण ‘भगव्या’ रंगाच्या पक्षात ना त्याचं तन, मन आणि धन असेच काहीच नाही बरं का.

‘रंगात रंग माझा वेगळा’ असे दर्शन नेहमी घडविणाऱ्या पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीला रंग लावल्यानंतर राजकारण्यांना रंग लावायला जाणार असाल तर कोणता रंग घेऊ याची काळजी करु नका. ‘विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ?’ असा प्रश्‍न असणाऱ्या अभिजित पाटील यांना बारामतीकरांचा शिवाय भाजपचा भगवा असा कोणताही रंग या रंगपंचमीला चालू शकतो.

आजवर राजकारणात ढोबळ मानाने रंग उधळणाऱ्या प्रा. लक्ष्मण ढोबळे सरांकडे रंग लावायला जाणार असाल तर त्यांना भगवा चालेल. कारण कन्या आणि चिरंजीव यांच्या राजकीय करिअरसाठी ते सोलापूर लोकसभेला आणि मोहोळ विधानसभेला भगवाच रंग उधण्याच्या बेतात आहेत.

माढ्यात संजयमामा यांना रंग लावायला जाणार असाल तर भगवा आणि बारामतीकरांचा ‘पॉवर’बाज रंग चालू शकतो. कारण भाजप आणि बारामतीकर यांना संजयमामांच्या रंगाची गरज आहे. तिथे आमदार बबनदादा भेटले आणि त्यांना तुम्ही ‘भगवा’ रंग लावायला गेला तर ते फारसे खवळणार वगैरे नाहीत बरं का.

सांगोल्यात सध्या कोणता रंग वेगळा आहे तेच समजत नाही. शहाजीबापू आणि दीपकआबा हे दोघे मिळूनच सध्या रंग उधळताहेत, तेव्हा कोणताही रंग आपण तिथे नेऊ शकता.

मंगळवेढ्याला दामजीपंताना रंग लावून पुढे राजकारण्यांना रंग लावणार असाल तर ‘भगवा’ रंग लाऊन अवताडे यांचं आणि तुमचं स्वतः:चं समाधान करून घ्याल. येथे भगिरथ भालके आणि प्रशांत परिचारक भेटले तर दोन वेगवेगळ्या रंगाच्या पुड्या वेगवेगळ्या खिशातून काढू शकता.

करमाळ्याला कोणताही रंग चालतो या भ्रमात आपण जाल, पण तसं नाही. फक्त कारखाना चालू करण्यासाठी नारायण पाटील आणि रश्मी बागल-कोलते या मंडळींनी तत्कालीन वेळी रंग उधळले. आता मात्र त्यांना चालणारेच रंग घेऊन जा. बागल- कोलते यांना तर आवर्जून कोणत्या रंगात रंगपंचमी खेळायची हे विचारा.

दक्षिण तालुक्याच्या मुलूखात जाताय रंगपंचमीला तर आमदार सुभाष देशमुख वगळता कोणते नेते कोठे आहेत, त्यांचा पक्ष कोणता आणि त्यांना कोणता रंग चालेल? याचा अभ्यास करून जा.

उत्तर सोलापूर तालुक्याचे म्हणाल तर पवार बंधूंची जोडगोळी आहेच भगव्या रंगाच्या बादल्या घेऊन रंगपंचमी खेळायला. दुनिया इकडे तिकडे होऊ द्या. त्यांचा ठरलेला रंग मात्र पक्का. वडाळ्यात अजूनतरी बारामतीकर पवारांचा पॉरबाज रंग घेऊन काका साठे बसलेले दिसतील. भविष्यात राजन पाटील यांच्यानंतर त्यांनी रंग बदलला तर वेगळे वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT