कुर्डू - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील चार नेत्यांवर भाजपच्या अदृश्य शक्ती अर्थात अमित शहा यांनी खूप अन्याय केल्यामुळेच ते अडचणीत आले आहेत. आणि या चौघांच्या विरोधात बोलले की मला खूप राग येतो, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
कुर्डुवाडी (ता. माढा) येथील मंगल कार्यालयात आयोजित माढा लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते. व्यासपीठावर रोहिणी खडसे, अभिजित पाटील, संजय पाटील घाटणेकर, बळिराम साठे, अभिजित पाटील, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, आशा टोणपे, दत्ताजी गवळी, अनुराधा गवळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून गुजरातचे महत्त्व वाढवण्यासाठी भाजपची अदृश्य शक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी जन्माला घातलेले पक्ष यांनी खोक्यांची व पदांची आमिषं दाखवून फोडले. फडणवीस यांनी १०५ जागा आणूनही त्यांना उपमुख्यमंत्री केले व गडकरींचे केंद्रातील अधिकार कमी केल्याने यांच्यावर फार मोठा अन्याय केला.
हे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन खोके सरकार काँट्रॅक्ट बेसिसवर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतंय. म्हणजेच त्यांना आरक्षणाचा रस्ता बंद करायचा आहे. हा संविधानाचा अपमान आहे. शाळा बंद करून दारूची दुकाने वाढवत आहेत. अशा या सरकारचा २०२४ च्या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा निर्धार करा, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले.
शरद पवार यांच्याबाबत काही उलटसुलट बोललात तर तीन वेळा ऐकून घेईन, चौथ्या वेळेस असा करारा जवाब देईन, की तुमचे मतदारसंघात फिरणे मुश्कील होईल, असा सज्जड दमही नामोल्लेख टाळून त्यांनी दिला.
सर्व्हे सरकारच्या विरोधात येत असल्याने कोणत्याही निवडणुका घेण्याचे धाडस या सरकारमध्ये नसल्याने आता एक वर्षानंतरच निवडणुका होतील, असा अंदाज सुळे यांनी व्यक्त केला.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, सध्या राज्यात दुष्काळाची छाया आहे.
सरसकट राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करून राजकारणात जे दिसतेय त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. विनाकारण धास्ती घेऊ नका. सगळेजण पराभव करण्याच्या तयारीत आहेत. ही संधी आपण गमवायची नाही, जोमाने तयारीला लागा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील घाटणेकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांना जेवढं मताधिक्य दिले होते तेवढेच मताधिक्य इंडिया आघाडीच्या उमेदवाराला दिल्याशिवाय शांत बसणार नाही.
संजय पाटील घाटणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कविता म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, संतोष वारे व अभिजित पाटील यांची भाषणे झाली. सुधीर क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताजी गवळी यांनी आभार मानले.
... तर सुप्रिया सुळे नाव सांगणार नाही!
राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक आयोगापुढील सुनावणीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रेमाने मागितले असते तर दिले असते; पण तुम्ही वडिलांचा पक्ष हिसकावून न्यायला लागलात तर कदापिही मिळणार नाही. तुम्ही बायकांच्या नादी लागू नका, एकदा का लाटणे या खोके सरकारच्या मागे लागले तर तुम्ही नेस्तनाबूत होताल. ८३ वर्षांच्या पवार साहेबांनी या पक्षाला जन्म दिलाय, त्याविरुद्ध लढताना पवार साहेब स्वतः बाजू मांडायला गेले होते. त्यांचा फक्त वकील आला होता. त्या वकिलाचाही करेक्ट कार्यक्रम केला नाही तर सुप्रिया सुळे नाव सांगणार नाही.
विरोधात बोललात की ‘आईस’ लागलाच
मी जर संसदेत सरकार विरोधात बोलले की लगेचच घरी इन्कम टॅक्सची नोटीस येते व नवऱ्याचा मेसेज येतो लव्ह लेटर आले. तुम्ही सरकार विरोधात बोललात की ‘आईस’ लागला म्हणून समजाच. ‘आईस’चा अर्थ इन्कम टॅक्सची नोटीस, सीबीआयची झंझट आणि ईडीची कारवाई होतेच. मी त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.
‘इंडिया’चा पाचकलमी कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव
महाराष्ट्रातील प्रत्येक महिला व मुलींना सुरक्षिततेची हमी
जी मुले शाळाबाह्य आहेत त्यांना मोफत शिक्षण
प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी सरकार घेईल
संपूर्ण राज्यातील जुन्या एसटी बस नव्या घेईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.