solapur rain  sakal
सोलापूर

Solapur Rain : कुठे रिमझिम, कुठे मध्यम तर कुठे मुसळधार; ताली व बागांमध्ये साचले पाणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आज (रविवारी) सोलापूर जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. कुठे रिमझिम, कुठे मध्यम तर कुठे मुसळधार बरसलेल्या पावसामुळे बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे खरिपाच्या तग धरून राहिलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून, आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

पंढरपूर शहर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस

पंढरपूर : शहर व परिसरामध्ये रविवारी (ता. ३) सायंकाळी चारच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली होती. मागील दोन दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते; मात्र पाऊस पडला नव्हता. वातावरणातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आज सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

उपळाई परिसरात तासभर पाऊस

उपळाई बुद्रूक : तब्बल दीड महिन्यानंतर उपळाई बुद्रूक (ता. माढा) परिसरात वरुणराजाचे रविवारी (ता. ३) आगमन झाले असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा तर पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पल्लवीत झाल्या आहेत. रविवारी दुपारी तासभर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे परिसरातील शेतात व नाल्यात पाणी साठले आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अशाच काही मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना आणखी आशा आहे.

मोडनिंब परिसरात संततधार

मोडनिंब : मोडनिंब व परिसरात तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने आज (रविवारी) सूर धरला. पुष्य नक्षत्रात झालेल्या पावसानंतर आश्लेषा आणि मघा ही दोन्ही नक्षत्रे कोरडीच गेली. सुरू असलेल्या पूर्वा नक्षत्राने मात्र खरीप पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी दुपारनंतर मोडनिंब व परिसरामध्ये पावसाला सुरवात झाली. भेंड (ता. माढा) येथील पर्जन्यमापक यंत्रामध्ये आज दिवसभराच्या पावसाची ४३.४ मिलिमीटर इतकी नोंद झाली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेतकरी व दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मोहोळ शहर व परिसर

मोहोळ : शहर परिसरात प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. रविवार हा शहराचा आठवडा बाजार असल्याने सायंकाळी चारच्या सुमारास हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे बाजारकऱ्यांची धावपळ झाली. प्रदीर्घ कालावधीनंतर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह विशेषतः शेतकरी बांधवांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

सध्यातरी आकाशामध्ये दाटलेल्या काळ्या ढगांनी जोरदार वर्षाव करून सगळीकडे पाणीच पाणी व्हावे, अशीच प्रार्थना शेतकऱ्यांसह सर्व नागरिक परमेश्वराकडे करीत आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे.

कुर्डुवाडी परिसरात मुसळधार

कुर्डुवाडी : शहर व परिसरातील ग्रामीण भागात शनिवारी (ता. २) रात्री सुमारे दीड तास मुसळधार व रविवारी (ता. ३) दुपारी एक तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

शनिवारी रात्री साडेदहा ते बारापर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पावसाची संततधार सुरू राहिली. रविवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत हलक्या सरींचा पाऊस सुरू होता. परिसरातील ग्रामीण भागात पडलेल्या या पावसामुळे शेतकरी राजाला थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, आणखी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

अकलूज व परिसराला झोडपले

अकलूज : अकलूज व परिसराला रविवारी प्रथमच मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. या पावसामुळे बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता फारशी मिटली नसली तरी अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतील, अशी आशा आहे.

केत्तूर परिसरात हलक्या सरी

केत्तूर : करमाळा तालुक्यात पावसाने सुरवात केली आहे. सुमारे दीड महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हलक्या स्वरूपात का होईना केत्तूर परिसरात हजेरी लावली. शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला असून, दमदार व मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

चिखलठाण परिसरात पाऊस

चिखलठाण : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी (ता. ३) दुपारनंतर परिसरातील चिखलठाण, केडगाव, शेटफळ, पोफळज व जेऊर परिसरात एक तास हलकासा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. शेतातील सर्व पिकांना जीवदान मिळाले असून, यामुळे परिसरातील बळिराजा सुखावला आहे.

नातेपुते येथे रिमझिम

नातेपुते : आषाढमध्ये २३ व २४ जून रोजी नातेपुते व पंचक्रोशीत पाऊस झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर काल (शनिवारी) पहाटे थोडा व आज (रविवारी) सकाळी थोडा पाऊस झाला. रविवारी (ता. ३) सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. सायंकाळी सहापासून संपूर्ण आकाश ढगांनी व्यापलेले होते व विजांचा कडकडाट सुरू होता.

माढा तालुक्याच्या पूर्वभागात दमदार पाऊस

माढा : तालुक्यातील पूर्वभागात दमदार पावसाने हजेरी लावली असून कापसेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी तालुक्यात अद्यापही सर्वदूर पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यातील पूर्व भागातील माढा, महातपूर, उंदरगाव, केवड यासह इतर भागात रविवारी (ता. ३) दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. कापसेवाडी परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे या भागातील पाणी साठले असून ओढे, नाले, बंधारे वाहत आहेत. तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी खरिपाची बहुतांशी पिके जळून गेली आहेत. तसेच तालुक्यात सर्वदूर पावसाची आवश्यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT