केत्तूर : जुलैचा अर्धा महिना संपला तरीही रुसलेला वरुणराजा बरसण्यास तयार नसल्याने आता पोशिंद्यावर दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूने उजनी जलाशयाचा पाणीसाठा उणे ३४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
हवामान खात्याच्या भरवशावर बसलेल्या आणि पूर्वनियोजन न करता उशिरा जागी झालेली प्रशासकीय व्यवस्था यामुळे आता उजनीचा पाणीसाठा राखीव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांना उजनी धरण वरदान ठरले आहे. या उजनीवर पाण्याच्या जेवढ्या योजना आहेत त्यापेक्षा अधिक शेती व औद्योगीकरण अवलंबून आहे. गेल्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले, मात्र मार्च ते जुलै या पाच महिन्यांतच उजनीचा पाणीसाठा मायनस ३४.५४ टक्क्यांवर जाऊन पोचला आहे.
उजनीच्या पाणी वापरावर मर्यादाच नसल्याने दरवर्षी खऱ्या धरणग्रस्तांना पाण्यासाठी टाहो फोडावाच लागतो. यावर्षी तर उजनीची परिस्थिती फारच बिकट बनली आहे.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
धरणग्रस्तांना उजनीच्या पाण्याचा मोठा आधार असतो; मात्र पाणलोट क्षेत्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. पळसदेव व टाकळी, केत्तूर, पारेवाडी भागापासून खालच्या भागात आता पाणी सरकले आहे.
आता उजनी मायनस ३४.५४ वर आल्याने व पाऊस साथ देत नसल्याने भविष्यात पाण्याचे मोठे संकट घोंगावताना दिसत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने आता शेती आणि औद्योगीकरणाचा पाणीपुरवठा बंद करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. साहजिकच उजनीवर अवलंबून असलेला शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
असे असले तरी अजूनही औद्योगीकरण क्षेत्र पाणी वापरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. संभाव्य पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन औद्योगीकरणासाठी पाणी उचलण्यावर तत्काळ बंदी घालणे अतिशय गरजेचे बनले आहे.
सध्या पुणे खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने ही धरणे खालावलेल्या अवस्थेत आहेत. उजनी धरण तर पुण्याच्या वरच्या भागावर व तेथील धरणे भरण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था उजनीची झाली आहे.
‘उजनी’ प्लसमध्ये केव्हा येणार?
उजनी धरण परिसरात पाऊस नसला तरी चालेल परंतु पुणे जिल्हा परिसर तसेच भीमा खोऱ्यातही पावसाचा रुसवा कायम असल्याने संकटात भरच पडली आहे. पुणे जिल्हा व परिसरात सुरवातीला पाऊस झाल्यानंतर १० हजार क्यूसेसने पाणी उजनी धरणात दाखल होत होते.
परंतु सध्या पावसाने ब्रेक घेतल्याने पुणे जिल्हा व परिसरातील केवळ २०० क्यूसेस पाणीही उजनी जलाशयात दाखल होत नाही. हे असेच राहिले तर उजनी मायनसमधून प्लसमध्ये केव्हा येणार, हाही प्रश्न आहे.
‘पंधरा सात’चा मुहूर्त टळल्याने उसाऐवजी मक्याची पेरणी
दमदार पाऊस न झाल्याने उजनी लाभक्षेत्रात उसाच्या लागवडी रखडल्या आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात १५ तारखेला ऊस लागवडी होतात. त्यामुळे शेतकरी उत्साही होतात परंतु यावर्षी उजनी वजा पातळीत असलेले व पावसाने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याकडे धजावत नाहीत त्यामुळे यावर्षी ‘पंधरा सात’चा मुहूर्त टळला आहे. शेतकऱ्यांनी मका व इतर पिकांना पसंती दिली आहे सध्या उजनी लाभक्षेत्रात मक्याचे मोठ्या प्रमाणावर पेरणी झाल्याचे दिसून येत आहे.
‘त्या’ दुष्काळाच्या पुनरावृत्तीची शक्यता
उन्हाळ्यात जिवाचे रान करून ऊस, डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी अशा फळबागा व तरकारी पिके जगवण्यात आली. मात्र या वर्षी अवकाळी पावसाने दडी मारली. त्यानंतर जून व जुलै महिना कोरडाच गेल्याने भेगाळलेली शेती व तग धरून उभा असलेल्या पिकांनी केव्हाच माना टाकल्या आहेत.
बहुतांश फळबागा, उसाचा पाचोळा झाला आहे. तरीही बळिराजा आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस होत नसल्याने गेल्या सहा-सात वर्षांपूर्वीच्या दुष्काळाची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दिवसरात्र शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. या भागात असलेले सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने दगा दिला. अवकाळी पाऊस झालाच नाही. उजनीचे पाणी मायनसमध्ये असल्याकारणाने पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे, असे समजते. याचा फटका उभ्या पिकांना बसणार आहे. फळबागा वाळून जाणार आहेत.
यापुढे दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. पावसाळी वातावरण तयार होत आहे परंतु पाऊस पडत नाही. त्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. आडसाली उसाच्या लागवडी थांबल्या आहेत तर उभ्या उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादन घटणार आहे. पाऊस न झाल्यास गुरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.
- अशोक पाटील, संचालक, दूध उत्पादक संघ, सोलापूर
मध्यंतरी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका उजनीच्या मुळावर बसल्या आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले उजनी धरण मागील दोन महिन्यात मायनसमध्ये गेले. त्याचा फटका ऐन पावसाळ्यात उजनी लाभक्षेत्राला बसू लागला आहे. पाऊस न झाल्यास राहिलेले पाणीही राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत प्रशासन आहे. त्यामुळे मूळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.
- ॲड. अजित विघ्ने, केत्तूर
गेली सलग दोन-तीन वर्षे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने यावर्षी पाण्याचे कसलेही नियोजन झाले नाही. त्यातच उजनीतून सोलापूरसाठी नदीद्वारे व इतर कारणास्तव सहा पाळ्यांमध्ये पाणी सोडण्यात आल्याने जवळपास ४२ टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला आहे. यापुढे मृत साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या कारणावरून उजनी लाभक्षेत्रातील वीज कपात केली तर मोठे जनआंदोलन केले जाईल. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे उजनीच्या पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
- शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, धरणग्रस्त समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.