सोलापूर : राज्यातील सर्वात मोठे केळी निर्यात केंद्र असलेल्या जळगावला सोलापूरने यावर्षी केळी निर्यातीत मागे टाकत एक वेगळी कामगिरी नोंदवली आहे. जळगावच्या केळी निर्यातीचा आकडा ४० कोटी असून सोलापूर जिल्ह्यातून ५७ कोटी रुपयांची केळी निर्यात झाली आहे.
काही वर्षांपूर्वी केळी निर्यातीचा आकडा अत्यंत कमी होता. कंदर (ता. करमाळा) केंद्रातून निर्यातीची वाढ सुरू झाली. हळूहळू आता जिल्ह्यातील १० केंद्राहून निर्यातीसाठीचे कंटेनर भरले जात आहेत.
पूर्वी डाळिंबाचा निर्यातीचा आकडा हा मोठा असायचा. पण आता केळीची निर्यात वाढली आहे. कोरोना काळात देखील अत्यंत जिद्दीने कंदर येथील उत्पादकांनी निर्यातीमध्ये सातत्य ठेवले. त्यानंतरच्या काळात इतर केंद्राहून निर्यात सुरू झाली.
पूर्वीपासून राज्यात जळगाव हे सर्वाधिक केळी निर्यात करणारे हे केंद्र आहे. त्यानंतर आता सोलापूरने जळगावला मागे टाकले आहे. राज्यातील केळी निर्यातीत सर्वात मोठा वाटा असणारा सोलापूर जिल्हा हा एकमेव बनला आहे. देशाच्या पातळीवर देखील आता सोलापूरच्या केळी निर्यातीच्या आकडेवारीची दखल घेतली गेली आहे.
मोहोळ : येवती, आष्टी व शेटफळ
माढा - टेंभुर्णी
पंढरपूर - करकंब
करमाळा - कंदर, जेऊर, वाशिंबे, वरकटणे
माळशिरस - अकलुज
जिल्ह्याने ज्या पद्धतीने केळी उत्पादनात जी काही वाटचाल सुरू केली आहे त्यातून मिळालेले यश आहे. राज्यात केळी निर्यातीत स्थान मिळाल्याने शासनाने त्याची दखल घेण्याची गरज आहे.
देशपातळीवर सोलापूरला योग्य स्थान केळी निर्यातीत मिळवण्यासाठी आता सोलापुरात केळी संशोधन व निर्यात केंद्र उभारण्याची गरज आहे. केळी उत्पादकांना लागवड, लागवड पश्चात व्यवस्थापन, निर्यात व्यवस्थापन या सर्व मुद्द्यांवर एक संशोधन केंद्र असण्याची गरज आहे.
केवळ शेतीला पाणी आहे म्हणून सर्व काही होत नाही. या पाण्याचा उपयोग कशा पध्दतीने निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन व निर्यात प्रक्रियेत सहभागासाठी केलेली कामगिरी महत्वाची ठरते. जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी हे करून दाखवले आहे. जळगावची सध्या जी केळी निर्यात आहे त्यापेक्षा अधिक निर्यात सोलापुरातून झाली आहे.
- किरण डोके, केळी उत्पादक व निर्यातदार, कंदर, ता. करमाळा
जिल्हाभरातून केळी निर्यात वाढत आहे. केळी उत्पादकांनी तंत्रशुध्द लागवड व उत्पादनपश्चात विक्री यामुळे ही आकडेवारी वाढत आहे. सध्या दररोज ३० ते ४० कंटेनर निर्यातीसाठी पाठवले जात आहेत. हे कंटेनर पुणे व मुंबईला जात आहेत. जिल्ह्यातील विविध केंद्राहून केळी पाठवली जात आहे.
- आर. टी. मोरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.