सोलापूर : बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. बाजारात येणारी विक्रमी आवक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अक्षरश: मुळावर उठली आहे. साधारण महिना-दीड महिन्यापूर्वी सफरचंदापेक्षा जादा म्हणजे तब्बल १५० ते २०० रुपयांपर्यंत गेलेला टोमॅटोचा दर सध्या ६ रुपये प्रती किलोवर आला.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. जाण्या-येण्याचा खर्चदेखील निघत नसण्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात लिलावाला न लावता फेकून दिले तर काहींना न तोडताच जागेवर ठेवले. यातून टोमॅटोचा लाल चिखल झाला.
प्रती किलो १५० ते २०० रुपये भाव गेलेला पाहून आपल्याही टोमॅटोचा बक्कळ पैका होईल या भोळ्याभाबड्या आशेवर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला. उत्पन्न आणि फायद्याची गोष्ट सोडा, लागवडीचा खर्चदेखील निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने वेळेवर हजेरी लावली नव्हती. त्यावेळी ज्या उत्पादकांनी पाण्याची सोय करून टोमॅटो बाजारात आणला त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. पहिला पाऊस झाल्यानंतर आवक येण्यास सुरवात झाली.
पण भाव वाढल्यानंतर बाजारात उपलब्ध झालेल्या इतर भाज्यांची आवक वाढली. टोमॅटोची आवक घटलेली असून देखील पर्यायी भाज्यांमुळे मागणी घटली. त्यामुळे सुरवातीला भाव कमी झाले. नंतर बारामती भागातून मालाची आवक सुरु झाली. आवक वाढल्यानंतर भावाची घसरण सुरु झाली. पावसाचा विस्कळितपणा असला तरी टोमॅटोचे भाव मात्र झपाट्याने उतरू लागले. आता तर या भावाने निचांक गाठला आहे.
टोमॅटोचे अर्थकारण
- एकरी लागवडीचा खर्च १ लाख रुपये (बियाणे, बेसल डोस, फवारण्या, तोडणी व वाहतूक)
- एकरी अंदाजित उतारा- १००० कॅरेट (२५ किलोचा एक कॅरेट प्रमाणे)
- लागवड खर्च व नफा धरून अंदाजे अपेक्षीत भाव- २५० ते ३०० रुपये कॅरेट
- सध्या बाजारात कॅरेटचे भाव - १५० रुपये (६ रुपये प्रती किलो प्रमाणे)
टोमॅटो लागवडीचा खर्च भरपूर असतो. त्याशिवाय त्यावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने त्याचे संरक्षण देखील फवारण्या घेऊन अधिक प्रमाणात करावे लागते. मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे लागवड खर्चात देखील वाढ होऊ लागली आहे. सध्याचे बाजारात मिळणारे दर अत्यंत कमी असल्याने त्यातून वाहतूक खर्च देखील निघत नाही.
- दत्तात्रेय माळी, उत्पादक, खंडाळी, ता. मोहोळ
टोमॅटोचे बाजारात नेमके काय झाले?
- जूनमध्ये पावसाच्या सुरवातीला लागवड कमी असल्याने भाव वाढले
- नंतर बारामती भागातून सोलापुरात टोमॅटोचे आवक वाढली
- भाववाढीने ग्राहकांनी पर्यायी भाज्यांची खरेदी वाढवली
- पुन्हा भावात झाली घसरण
- आता लागवड व आवक विक्रमी झाल्याने भावाचा झाला रेंदा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.