करकंब : राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये विजेचा प्रश्न कायम आहे. औद्योगिक पद्धतीने भरमसाट होणारी वीज आकारणी आणि वीजबिल भरण्याची कोणतीही नसणारी आर्थिक तरतूद यामुळे शाळांमधील वीजजोडणी खंडित केलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वरवडे (ता. माढा) केंद्रातील सर्व म्हणजे १७ जिल्हा परिषदांच्या शाळा आणि दोन माध्यमिक विद्यालयांना मुंबई येथील एक्सिम बँकेने एक किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत. याकरिता बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून सर्व रक्कम खर्च केली आहे.
सध्या राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी बिले थकीत जाऊन वीज वितरण कंपनीने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी, विजेअभावी शाळांमधील संगणक, एलसीडी प्रोजेक्टर यांसारखी डिजिटल साधने वापराविना धूळखात पडलेली असतात.
मात्र याच समस्येवर उपाय म्हणून माढा तालुक्यातील वरवडे केंद्रासाठी एक्सिम बँक धावून आली. ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने केंद्रातील सर्व १७ जिल्हा परिषद शाळा व दोन माध्यमिक विद्यालयांमध्ये सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत. त्यातून मागील वर्षभरात सर्व शाळांमध्ये एकूण ३० हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे. शिवाय सौरऊर्जा निर्मिती करणारी राज्यातील पहिले केंद्र म्हणून वरवडे केंद्राची ओळख निर्माण झाली आहे.
सौरऊर्जा पॅनेलबरोबरच एक्सिम बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून वरवडे, परितेवाडी, आहेरगाव, वेणेगाव, अकुंभे आणि अकोले बुद्रूक या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये सक्षम प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबच्या मदतीने शिक्षण देणारी मोबाईल व्हॅन आणि चार प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त केले आहेत.
ही व्हॅन प्रत्येक शाळेत आठवड्यातून एकदा जाते आणि मुलांना टॅबच्या मदतीने गणित व इंग्रजी विषयातील कठीण संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात. यासोबतच शाळांमधील डिजिटल साधनांचाही वापर करून हे स्वयंसेवक शिक्षण देतात.
सौरऊर्जा पॅनेलमुळे या शाळांमधील विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाल्यामुळे गटशिक्षणाधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख शिवराज ढाले, केंद्रीय मुख्याध्यापक छगन गवळी, मुख्याध्यापक जावीद मुजावर यांनी एक्सिम बँकेचे आभार मानले.
एक्सिम बँकेने वरवडे केंद्रातील सर्व शाळांना सौरऊर्जा पॅनेल तर दिलेच पण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून चार प्रशिक्षित स्वयंसेवकांमार्फत टॅबद्वारे शिक्षण दिले जात आहे, ही आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम तीन वर्षे चालणार असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. भविष्यात तालुक्यातील आणखी शाळांना इतर बँका व कंपन्यांनी अशाच प्रकारे मदत केली तर गोरगरिबांच्या मुलांना काळाबरोबर शिक्षण घेता येईल.
- विकास यादव, गटशिक्षणाधिकारी, माढा
जिल्हा परिषद शाळांमधील वीजबिलाच्या समस्येचे निराकरण सौरऊर्जेच्या माध्यमातून करता येते, हेच या उपक्रमातून दिसून आले. मला आशा आहे, की याचे अनुकरण इतरही संस्था करतील. ग्रामपंचायती मार्फतही जिल्हा परिषदांच्या शाळांना सौरऊर्जा पॅनेल दिले तर ही समस्या कायमची निकालात निघू शकते.
- रणजित डिसले, ग्लोबल टीचर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.