सोलापूर : कोरोना व्हायरसने संपूर्ण जग धास्तावले आहे. बाधित रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. तरीसुद्धा नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली नाही. सोलापुरातील बाळीवेस परिसरातील एक 39 वर्षांची महिला नुकतीच कोरोनामुक्त होऊन घरी आली आहे. "मला कोरोनाचा नाही, पण शेजाऱ्यांचा, जवळच्या व्यक्तींचा एवढा त्रास झाला की ते सांगूच शकत नाही,' असं डोळ्यांत पाणी आणून त्या सांगत होत्या. "डॉक्टर, सिस्टर एवढी काळजी घेत होत्या, की त्यांच्यामुळेच मी बरं होऊन आनंदाने घरी परतले', असं त्या म्हणाल्या.
बाळीवेस परिसरातील एका महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवली आणि कशाचाही विचार न करता त्यांनी मला तपासणी करून घ्यायची आहे, असा हट्ट पतीकडे धरला. मात्र, आपल्याला कोरोना होऊच शकत नाही, असा भ्रम असलेल्या त्यांच्या कुटुंबाला रुग्णालयात गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी धक्का बसला. तपासणी झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. त्या म्हणाल्या, मी एका ठिकाणी जॉब करते. मात्र, कोरोनामुळे कार्यालय बंद आहे. त्यामुळे फक्त भाजी किंवा इतर साहित्य खरेदी करायचे असेल तरच बाहेर जावे लागत होते. तेव्हा सर्वत्र कोरोनाचीच चर्चा होती. प्रत्येकवेळी खरेदीला गेले तरी योग्य ती काळजी घेत होते. परंतु सुरवातीला थोडा खोकला यायचा. मात्र, मे महिन्यात मला पुन्हा खोकला येऊ लागला. मात्र, हा खोकला दरवेळेपेक्षा वेगळा असल्याची जाणीव झाली. मी सतत कोरोनाबद्दलचे व्हिडिओ पाहत होते. त्यातून मला कोरोनाची लक्षणे असल्याचे जाणवले. परंतु नेहमीप्रमाणे खोकला असेल म्हणून नेहमीच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले. त्यांनी मला गोळ्या दिल्या. पण, माझे समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले. तेव्हा माझा त्रास वाढला होता. म्हणून मीच स्वत: श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. घराकडे येत असताना काहीही करून तुम्ही सिव्हिलमध्ये चला असा आग्रह मी पतीकडे धरला आणि घराजवळ आलेली गाडी पुन्हा सिव्हिलकडे नेली. तिथे गेल्यानंतर आम्हाला रुग्णालयात दाखल करून घेतले, असं त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सुरवातीला जनरल वॉर्डमध्ये दाखल करून घेतले होते. तेथील स्वच्छता पाहून आपल्याला येथे उपचार नको म्हणून बाहेर पडावे असं वाटलं. कारण तिथे बेड शिल्लक नव्हता. तेथील डॉक्टरांकडे विचारणा केली तर जागा रिकामी झाली की तुम्हाला बेड मिळेल असं सांगितले. परंतु तोपर्यंत मला खालीच गादी टाकून दिली होती. त्यानंतर माझे स्वॅब घेण्यात आले. दोन दिवसांनी माझा रिपोर्ट आला. त्यानंतर मला कुंभारी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथील व्यवस्था अतिशय उत्तम होती. गरम जेवण, फळं दिली जायची. तिथे काहीजण रुग्णांना फळं घेऊन यायचे. तेव्हा मलाही वाटत होतं की, आपल्यालाही कोणी तरी अशी फळं घेऊन यावीत. म्हणून मी जवळच्यांना सांगितले देखील. पण कोणी आलं नाही. त्यांनी वेगळीच कारणं सांगितली. तेथील व्यवस्था अतिशय उत्तम होती. त्यामुळे काही अडचण आली नाही. त्या म्हणाल्या, माझ्या पतीलाही रुग्णालयात दाखल करून घेतलं होतं. घरी मुलगी आणि मुलगा होता. त्यांना होम क्वारंटाइन केलं होतं. रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह आला, तेव्हा पोलिस घरी तपासण्यासाठी गेले होते. तेव्हा जवळच्यांना माहीत झालं. त्यांच्याकडून खूप त्रास झाला. नको नको ते बोलत होते. डोळ्यांत पाणी आणून त्या घडलेला प्रसंग सांगत होत्या. शेवटी त्या म्हणाल्या, उपचार व्यवस्थित झाले. डॉक्टरांनी काळजी आणि आपण वेळीच दक्षता घेतली तर कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. मला कोरोनाचा नाही, पण त्यांचा त्रास झाला. माझ्या कुटुंबालाही त्रास झाला. आपण कोरोनाशी लढत आहोत की कोरोनाबाधिताशी, असा प्रश्न मला यातून निर्माण झाला, असं त्या हुंदके देत रडत सांगत होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.