सोलापूर - स्मार्ट सिटी म्हणून गवगवा होत असलेल्या सोलापुरात नागरिकांना वेगळ्याच समस्येला दररोज तोंड द्यावे लागत आहे. मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री अक्षरश: नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. त्यांना प्रतिबंध घालणारी महापालिकेची यंत्रणा झोपत आहे का? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
मोकाट जनावरे तसेच भटकी कुत्री यामुळे दररोज अपघात होत आहेत. अपघातामधून नागरिक कायमचे जायबंदी होत आहेत.
शहरात मोकाट जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रस्त्यांवर आपली गुरे-ढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध महापालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
मात्र या समस्येपासून नागरिकांनी सुटका करण्यात महापालिका कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने महापालिका हतबलता झाली आहे की काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे..
शहरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरे कळपा-कळपाने फिरत आहेत. तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावरच आपला ठिय्या मांडत आहेत. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावरील दुभाजकावर ठिय्या मांडून बसतात आणि अचानकपणे हे मोकाट जनावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत.
तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक संतापले आहेत.सातरस्ता ते होटगी रोड व्हीआयपी रोड परिसरात अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. याठिकाणी रस्त्यात बसलेली जनावरे आणि भटके कुत्रे रात्रीच्या वेळी डोकेदुखीच ठरत आहे.
१० ते १५ गायींचा कळप असल्याने त्यांना हुसकावणे कठीण जाते. वाहनचालकांना अर्ध्याच रस्त्याचा वापर करीत ये-जा करावी लागत असल्याने अपघात झाले आहेत.
त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव सहन करावा लागतो. रात्रीच्या शिफ्ट मध्ये कामावरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या मागे घोळका करुन बसलेले कुत्रे पाठलाग करतात. बहुतांश वेळा हे श्वान अंगावर धावून जातात.
यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात. तर, श्वानदंशाने जखमी झालेल्यांचेही प्रमाण मोठे आहे. याप्रश्नाकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे रात्रीची वेळ ही कामगारांसाठी अतिशय कठीण असते.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या मोकाट जनावरांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक सातत्याने करीत असतात. मात्र, महापालिकेच्या नेहमीच्या दुर्लक्षामुळे ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
कारवाई करणारेदेखील मोकाट
मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र विभाग आहे. या विभागाची यंत्रणा आहे. मात्र हा विभाग आणि पर्यायाने यंत्रणाच आपली जबाबदारी पार न पाडता मोकाट असल्याच्या संतापलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. मोकाट जनावरे शहरात धुडगूस घालत असताना त्यांना प्रतिबंध घालण्यासाठीची यंत्रणा काय करते, हा सवाल आहे. मोकाट जनावरे नागरिकांच्या जिवावर उठली असतानादेखील त्यांना प्रतिबंध का घातला जात नाही हा खरा सवाल आहे.
यंत्रणेची बेपर्वाई, नगरसेवकांचा हस्तक्षेप
मोकाट जनावरांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाची बेपर्वाई, उदासीनता दिसून येते. दुसऱ्या बाजूला अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करताना नगरसेवकांचा हस्तक्षेप आहे. संबंधित भागातील नगरसेवक कारवाई करू देत नाहीत, त्यामुळे मोकाट जनावर मालकांचे फावते. त्यातूनच शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनला आहे.
‘या’ ठिकाणी मोकाट जनावरांचा उच्छाद
रूपाभवानी मंदिर परिसर, विजयपूर रस्ता, किडवाई चौक,पोलिस कल्याण केंद्र,असार मैदान,डीसीसी बँक, बाळीवेस, टिळक चौक, विजापूर वेस, रेल्वे स्टेशन, कुमार चौक, मोदी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, सुपर मार्केट, मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मार्केट, लष्कर, सातरस्ता, पोटफाडी चौक, रंगभवन, मधला मारुती, चाटी गल्ली, कुंभार वेस, दत्त चौक, कन्ना चौक या रस्त्यावरच जनावरे ठिय्या मारून बसलेली असल्याने सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी वारंवार ट्रॅफिक जाम होते. या परिसरात त्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.