पंढरपूरसह पाच तालुक्यांत आज (शुक्रवार) पासून कडक संचारबंदी असणार आहे.
सोलापूर : पंढरपूरसह (Pandharpur, Solapur) पाच तालुक्यांत आज (शुक्रवार) पासून कडक संचारबंदी (Curfew) असणार आहे. या निर्बंधाच्या निर्णयाबाबत गुरुवारी नियोजन भवन येथे जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर (District Collector Milind Shambharkar) यांच्यासह सर्व महत्त्वाचे अधिकारी, व्यापारी व पदाधिकारी यांची बैठक झाली. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले असून 13 ऑगस्टपासून पंढरपूर, सांगोला (Sangola), करमाळा (Karmala), माढा (Madha) व माळशिरस तालुक्यात कठोर निर्बंध असणार आहेत.
पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यात कठोर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकार मिलिंद शंभरकर यांनी रविवारी (ता. 8) काढले आहेत. या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पंढरपूर येथील व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे. मागील तीन दिवसांपासून पंढरपूर येथे व्यापारी यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, या पाच तालुक्यांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. पंढरपूर शहर व ग्रामीणची रुग्णसंख्या एकत्रित विचारात न घेता स्वतंत्रपणे विचारात घ्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. शहर व ग्रामीण एक युनिटऐवजी दोन युनिट असे विचारात घ्याव्यात, अशी मागणी पंढरपूरच्या व्यापारी महासंघाने केली होती. मात्र, असे करता येणार नाही. तालुका व शहर यांची रुग्णसंख्या एकत्रित विचारात घेतली जाईल. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत प्रशासनाने व्यापाऱ्यांना केले. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व्यापारी बैठकीतून निघून गेले. पंढरपूर येथे रात्री 9 वाजता प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीवकुमार जाधव, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, मनसेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे, सचिन पाटील, विनोद लटके, कौस्तुभ गुंडेवार, संतोष कवडे, संजय भिंगे, कौलास कारंडे, राजेंद्र भरतड, श्री. डोंबे व श्री. गांधी आदी व्यापारी उपस्थित होते.
पाच तालुक्यांसाठी हे आहेत नियम
पंढरपूर, सांगोला, करमाळा, माळशिरस व माढा तालुक्यांमधील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ दुपारी 4 पर्यंत ठेवली आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कठोर निर्बंध लागू केले असून उर्वरित तालुक्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा व वस्तूशी संबंधित आस्थापने आठवडाभर दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत.
निर्बंध कडक केलेल्या पाच तालुक्यांमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आठवडाभर बंद राहणार आहेत.
ठळक बाबी...
रेस्टॉरंटसाठी केवळ पार्सल सेवा
वैद्यकीय कारणाशिवाय प्रवास बंद
मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
विवाह सोहळ्यासाठी केवळ 25 व्यक्तींची मर्यादा
अंत्यविधीकरिता 20 जणांची मर्यादा
बांधकाम मजुरांना बांधकाम स्थळीच राहावे लागणार
यांना आहे सवलत...
अत्यावश्यक सेवेतील वस्तू तयार करणारे, सुरक्षा विषयक, संरक्षण विषयक वस्तू व उत्पादित करणारे, तसेचे डेटा सेंटर, क्लाउड सर्व्हिसेस, क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर सेवेतील आस्थापने 50 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. बाजार समित्या सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेला 50 टक्के उपस्थिती असेल, असेही आदेशातून स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणे व उघडी मैदाने शनिवारी-रविवारी पूर्णपणे बंद रहतील. इतर दिवशी सकाळी 5 ते 9 या वेळेत मैदाने सुरू राहणार आहेत. मात्र, कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे त्या ठिकाणी आयोजन करता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.