उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरची हलाखीची परिस्थिती. त्यात गावात सतत पडत असलेला दुष्काळ. त्यामुळे शेती करायची झाल्यास बेभरवशाची असायची. दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील अनेकांना बेरोजगारीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असायचं. आपल्यावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपल्या मुलांवर येऊ नये, यासाठी वडिलांची मुलांच्या शिक्षणासाठी सतत धडपड असायची. त्यामुळे त्यांनी स्वतः काबाडकष्ट करत मुलांना मोठी स्वप्नं दाखवली व शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे घरच्या परिस्थितीचे भान ठेवून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर मुलाने देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अतुल उत्तमराव झेंडे असे त्या युवकाचे नाव असून, सध्या सोलापूर ग्रामीणला ते अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुलांनी मोठ्या पदावर विराजमान होऊन देशाची सेवा करावी, अशी वडिलांची इच्छा
पुणे जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गाव म्हणून दिवेगाव या गावची ओळख. या गावात पाण्याचा जरी दुष्काळ असला तरी बुद्धिमान, कर्तृत्ववान लोकांचा दुष्काळ कधीच पडला नाही, याचा प्रत्यय येतो. अलीकडेच या गावात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणारी संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे अतुल उत्तमराव झेंडे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील शेती करायचे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पैशाची सतत चणचण भासायची. परंतु वडिलांची मुलांकडून मोठी अपेक्षा. आपल्या मुलांनी मोठ्या पदावर विराजमान होऊन गावाची व देशाची सेवा करावी, अशी ठाम इच्छा असायची. त्यामुळे मुलांना त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याची मोठी स्वप्ने दाखवली. नुसतीच स्वप्ने दाखवली नाही तर त्यांच्याकडून ती सत्यात उतरवून देखील घेतली आहेत. स्वतः शेतात काबाडकष्ट करत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले.
जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला
अतुल झेंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. घरापासून शाळा तीन किलोमीटर अंतरावर होती. दररोज ते तेवढे अंतर पायी चालत जात असत. त्या वेळी त्यांना सायकलची कमतरता भासत असायची. पुढे माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना सायकल मिळाली. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे प्रवेश घेतला. शिक्षणाच्या निमित्ताने प्रथमच ते गावापासून दूर आले. शिक्षण घेत असताना वडिलांची आपल्या शिक्षणासाठी होत असलेली धडपड अतुल यांना जाणवत होती. अतुल झेंडे हे हुशार असल्याने पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना कॉलेज कॅम्पसमधून बॅंकेत चांगल्या पदावर नोकरी लागली होती. परंतु वडिलांचे स्वप्न होते की मुलाने प्रशासकीय क्षेत्रात मोठ्या पदावर विराजमान व्हावे. त्यामुळे त्या नोकरीचा राजीनामा देत अतुल यांनी जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण
विशेष म्हणजे अतुल झेंडे हे अधिकारी होण्याचे ध्येय पूर्ण होईपर्यंत घरगुती लग्न समारंभ व इतर नातेवाइकांच्या कार्यक्रमास जाण्यास बरेचदा टाळत असत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असताना मोबाईलही वापरत नसत. त्यामुळे गावात काय चाललंय याची थोडीशीही कल्पना अतुल झेंडे यांना नसायची. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष न देता ध्येयाचा पाठलाग करत ते अभ्यास करत असत. आई-वडिलांची आपल्याकडून असलेली अपेक्षा व पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचेच, अशी मनाशी खूणगाठ बांधून अतुल यांनी स्पर्धा परीक्षेचा जिद्द, चिकाटी आणि सचोटीने मित्रांबरोबर अभ्यास करण्यास सुरवात केली. 2008 मध्ये त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत यश मिळाले. परंतु एवढ्यावरच न थांबता यापेक्षा मोठ्या पदावर विराजमान व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची प्रबळ इच्छा असल्याने पोलिस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना 2009 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते अव्वल गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाले. त्यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली.
सध्या सोलापूर जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत
हे यश फक्त अतुल झेंडे यांचे नव्हते तर ते त्यांच्या आई-वडिलांचे सर्वांत मोठे स्वप्न होते. दुष्काळी पट्ट्यातील सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा पोलिस उपअधीक्षक झाल्याने परिसरातून आनंद व्यक्त करण्यात आला. आपल्या मुलाने आपल्या कुटुंबाच्या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवत, गरिबीशी झुंज देत आपण पाहिलेले स्वप्न साकार केले, त्यामुळे धनदौलत कमावण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे काम आपल्या मुलाने केल्याचा आनंद वडिलांना झाला होता. अतुल झेंडे यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून नाशिक, रायगड जिल्ह्यात कर्तव्य बजावले असून, सध्या ते सोलापूर जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
आपल्याला जे काही व्हायचे आहे ते निश्चित ध्येय ठरवा. जे वाचायचे ते परफेक्ट वाचा, त्याचे सिंहावलोकन करा. आपल्या जवळील व्यक्तीपासून प्रेरणा घ्या. त्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. ज्या क्षेत्रात जायचे आहे त्यामध्ये तुम्ही अव्वल व्हा. जिद्द, मेहनत, चिकाटीने आणि आत्मविश्वासाने अभ्यास करा. यशस्वी होणारच, असा विश्वास बाळगा.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.