सोलापूर : जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून सध्या जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागील वर्षी साधारणत: जिल्ह्यात एक लाख 65 हजार हेक्टरपर्यंत ऊस असतानाही गाळप लवकर उरकले होते. मात्र, आता एक लाख 71 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असतानाही शेतकऱ्यांचा ऊस कारखानदार घेऊन जात नसल्याची विदारक स्थिती आहे. वीज तोडल्याने पाणी देता येत नाही, 18 महिन्यांहून अधिक काळ लोटल्याने उसाला तुरे आले आहेत. तरीही, शेतकरी संघटना त्या प्रश्नावर गप्प का, असा प्रश्न बळीराजा विचारू लागला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या दारोदारी हेलपाटे मारणारे बहुतेक पुढारी आता अतिरिक्त ऊस असो वा वीज तोडणी मोहिमेबद्दल अधिवेशनात 'ब्र'देखील काढत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतातून ऊस तोडून साखर कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसांत एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक आहे. सध्या ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने साखर आयुक्तालयाने सरसकट दहा टक्के उतारा गृहीत धरून एफआरपी (2900) देण्याचे आदेश काढले. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याची स्थिती आहे. रब्बीचा सोलापूर जिल्हा खरीपाकडे वळला आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले. पण, शेतकऱ्यांच्या जीवावर एकापेक्षा अधिक साखर कारखाने उभारणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे गांभीर्याने पहायला वेळच नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक असतानाही काहींनी बाहेरील ऊस आणायलाच प्राधान्य दिले. त्यामुळेच जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनल्याचे साखर आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अशा संकटात शेतकरी संघटनांनी त्या बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभारण्याची आवश्यकता आहे. पण, एरव्ही कारखान्यावर धडक देऊन तथा गोणीत उडी घेऊन आंदोलन करणाऱ्या संघटना व संघटनांचे नेते अजूनही आक्रमक झाल्याचे दिसत नाहीत, हे विशेष.
जिल्ह्यातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत साखरेचा गळीत हंगाम सुरुच राहणार आहे. साखर कारखानदारांनाही तशा सूचना केलेल्या आहेत. सरासरी दहा टक्के साखर उतारा गृहीत धरून कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणे अपेक्षित आहे.
- राजेंद्र दराडे, प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर
पंढरपूर, मोहोळ तालुक्यात सर्वाधिक ऊस
जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. 2020-21 मधील कृषी विभागाकडील नोंदीनुसार पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 23 हजार 721 हेक्टर तर मोहोळ तालुक्यात 27 हजार 947 हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. उत्तर सोलापूर चार हजार 11, बार्शी तालुक्यात एक हजार 968, सांगोल्यात तीन हजार 144 हेक्टरवर ऊस आहे. उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये 11 हजार ते 20 हजार हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.