कोरवली (सोलापूर) : मागील दोन वर्षांपासून बिल न भरल्यामुळे बंद असलेला कामती पोलिस स्टेशनचा टेलिफोन नुकताच पदभार घेतलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी थकीत बिल भरून चालू केला. त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन ते अडीच वर्षात कामती पोलिस ठाणे कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्याचाच एक भाग म्हणजे आता बदली झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दोन वर्षे टेलिफोन बिल भरण्याचे औदार्य दाखवले नाही. परिसरातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी टेलिफोन सुरू करण्याची विनंती उंदरे यांना केली होती. मात्र, त्यांनी 8 ते 10 हजारांच्या बिलासाठी टेलिफोन बंद ठेवला होता.
कुठलीही अपराधिक घटना, चोरी, दरोडा, खून, मारामारी घडल्यास नागरिक प्रथम पोलिस स्टेशनला संपर्क साधण्यासाठी त्या पोलिस ठाण्याच्या फोनवर संपर्क साधतात. मात्र पोलिस स्टेशनचा फोनच जर बंद असेल तर संपर्क साधायचा कुणाला व गुन्हे आटोक्यात तरी येणार कसे? त्यातल्या त्यात पोलिस प्रशासनानेच फोनचे बिल थकवणे म्हणजे आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल.
कामती पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कुरुल ते कोरवली येथून पुणे - विजयपूर महामार्ग जातो. शिवाय शिंगोली ते घोडेश्वर येथून रत्नागिरी - नागपूर महामार्ग जातो. या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण देखील जास्त असते. झालेला अपघात पोलिस स्टेशनला कळविण्यासाठी फोन बंद असल्यामुळे अडचणीचे ठरत होते. शिवाय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 28 गावांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिस स्टेशनला कळविता येत नव्हती. या सर्व समस्यांचे निवारण होण्यासाठी व सामान्य जनतेची गरज ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी पदभार घेताच टेलिफोन बिल भरून तो पूर्ववत सुरू केला आहे. त्यांनी नागरिकांना अडचणीच्या वेळी संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.