दक्षिण सोलापूर : "1965 व 1971 मध्ये झालेल्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारतीय (Battle against Pakistan) सैन्यदलात सेवा बजावत असताना आम्ही विजय मिळवला होता. त्याच अनुभवाची शिदोरी माझ्याजवळ असल्यामुळे वयाच्या 89 व्या वर्षी गाठलेल्या कोरोना आजाराशी मी दोन हात केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो. "त्या' दोन लढायांप्रमाणेच कोरोनाबरोबरची लढाईही जिंकली !' अशी भावना भारतीय सैन्यदलात (Indian Army) 20 वर्षे नोकरी केलेल्या भीमराव बापूराव कुलकर्णी (Bhimrao Kulkarni) यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. (The 89-year-old warrior, who fought in two wars with Pakistan, won the battle against Corona)
जुळे सोलापूर येथील ज्ञानेश्वर नगरजवळील अमोल नगरमध्ये राहणारे भीमराव बापूराव कुलकर्णी यांना गेल्या महिन्यात कोरोना महामारीच्या आजाराने ग्रासले होते. या आजारातून मुक्त झाल्यानंतर त्यांच्याशी आजाराबाबत विचारले असता ते म्हणाले, 20 वर्षे मी भारतीय सैन्यदलात मेडिकल कोअरमध्येच काम केले असल्यामुळे मला या आजाराचे विशेष भय वाटले नाही. परंतु, माझ्या वयाचा विचार करता माझे नातेवाईक व मुले घाबरली होती. मीच त्यांना धीर देत या आजारातून नक्की बाहेर येईन, असे सांगितले आणि मी सात मार्चला या आजारातून सुखरूप बाहेर आलो.
या आजारावर मात करण्याचे मुख्य कारण म्हणजे सैन्यदलात असल्यापासून मला रोज व्यायामाची असलेली सवय व कोणतेही नसलेले व्यसन हे आहे. तसेच मेडिकल कोअरमध्ये काम केल्याने भीती वाटली नाही. शिवाय प्राथमिक उपचाराची माहिती असल्याचाही फायदा झाला.
त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल विचारले असता श्री. कुलकर्णी म्हणाले, मी मूळचा तद्देवाडी (ता. इंडी जि. विजयपूर) येथील रहिवासी. जुनी एसएससी पास झाल्यानंतर 1963 मध्ये मी सैन्यदलात मेडिकल कोअर विभागात भरती झालो. ब्रदर म्हणून माझ्या कामाची सुरवात झाली. बेसिक व टेक्निकल हॉस्पिटल ट्रेनिंग मी सिमला येथे पूर्ण केले. येथील ट्रेनिंग संपल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग जाट रेजिमेंटमध्ये ब्रदर म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये लंगधार येथे झाली. माझ्या भरतीनंतर दोनच वर्षात 1965 मध्ये पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. या युद्धाच्या वेळी मी जम्मू- काश्मीरमध्येच होतो. या वेळी आमच्या जाट रेजिमेंटमधील अनेक जवानांवर मी उपचार केले. या कामामुळे कोणत्याही आजाराचे भय माझ्यातून संपले होते.
1966 मध्ये मी ऑपरेशन थिएटर टेक्निशियनच्या ट्रेनिंगसाठी डेहराडूनला गेलो. तेथील नऊ महिन्यांचे ट्रेनिंग संपवून पुन्हा कामाला सुरवात केली. 1971 मध्ये पुन्हा पाकिस्तानबरोबर युद्ध जुंपले. कारगील क्षेत्रातील या युद्धाच्या वेळीही मी मेडिकल कंपनीमध्ये जवानांवर उपचार करण्याचे काम केले. आमच्या टीमने त्यावेळी 14 दिवसांच्या लढाईत 200 जवानांवर ऑपरेशन करण्याचे काम केले. या 14 दिवसांच्या काळात दिवस-रात्र आमचे काम सुरू होते. या कामातील माझे नैपुण्य ओळखून त्या वेळचे सर्जन डॉ. जे. के. खुराणा यांनी माझी सिकंदराबादला झालेली बदली थांबवत या युद्धकाळात काम करण्यास मला प्रवृत्त केले होते. या कामाच्या अनुभवावर मी पुढे दीड वर्ष सिकंदराबाद येथे काम केले. तिथून मला भूतानमध्ये तेथील जवानांना ट्रेनिंगसाठी पाठवले. ते काम संपवून मी कोलकता येथील कमांड हॉस्पिटलमध्ये एक वर्ष काम केले. तेथून पुढे पठाणकोटला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काम केले आणि मग माझे हवालदार या पदावर प्रमोशन होऊन मी लखनऊला आलो. 1978 ते 1983 पर्यंत लखनऊ येथे मी हवालदार पदावर काम पाहत होतो. दरम्यान, माझ्या पत्नीस अर्धांगवायू झाल्याचा निरोप आला अन् मला नोकरीचा राजीनामा देऊन परत यावे लागले. त्या वेळी माझी दोन्ही मुलं लहान होती. त्यामुळे मी 20 वर्षाच्या सैन्यदलातील सेवेचा राजीनामा दिला. सैन्यदलातील कामाचा मोठा अनुभव गाठीशी असल्यामुळे कोरोना महामारीच्या आजाराला मी न घाबरता तोंड दिले आणि त्यातून सुखरूप बाहेर आलो.
89 व्या वर्षीही तब्येत ठणठणीत
सध्या श्री. कुलकर्णी यांचे वय 89 असले तरी तब्येत ठणठणीत आहे. रोज पहाटे चार वाजता उठून व्यायाम व नित्य उपचार करतात. त्यांनी सैन्यदलातून राजीनामा देऊन आल्यानंतर सोलापुरातील मुळे व बिराजदार हॉस्पिटलमध्ये काही दिवस काम केले. त्यानंतर 1985 मध्ये जमखंडी तालुक्यात हसगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. जुलै 2000 मध्ये तेथून ते निवृत्त झाले. सध्या श्री. कुलकर्णी यांना सैन्य दलातील व शिक्षकाच्या नोकरीतील पेन्शन सुरू आहे.
बातमीदार : श्याम जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.