सोलापूर : युनिट टेस्टचा पेपर लिहिताना तिसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, ऐन परीक्षेच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू, स्पर्धा परीक्षेच्या अपयशानंतर आलेल्या नैराश्यातून काहींच्या आत्महत्या, अशा प्रकारच्या बातम्या कानावर आल्यावर सध्याच्या तरुणाईची, लहान मुलांची मानसिकता बिघडत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. हा चिंतेचा व चिंतनाचाही विषय होऊन बसला आहे.
ध्येय असावे, त्याच्या पूर्ततेसाठी धडपडही असावी; परंतु त्यापर्यंत पोचण्यासाठी जीवाचा आटापिटा कितपत योग्य आहे? हे पालकांना समजणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांत मुली पळून जाण्याचे प्रमाणही भरमसाठ वाढले आहे. अक्षरशः एकाच जिल्ह्यात त्याची संख्या हजारोंच्या घरात आहे. सामाजिक दृष्टीने हासुद्धा एक चिंतेचाच विषय आहे.
पूर्वीच्या काळी तणाव फार नव्हता असे नाही; परंतु गळेकापू स्पर्धा कमी होती. आपल्या पाल्याने एखादे उद्दिष्ट गाठावेच, अशी अहमहमिकाही नव्हती. मुळात एकतर पालकांना मुलांच्या शिक्षणाबद्दलची जागरूकता नव्हती. त्याचप्रमाणे अपत्यांची संख्याही दोनपेक्षा जास्त असे. त्यामुळे कोणीतरी एकाने शिकून मोठे व्हावे, दुसऱ्याने शेती, तिसऱ्याने व्यापार अशी विभागणी होत असे. सध्या एक फारतर दोन अपत्यांवर सारे काही अवलंबून आहे. त्यामुळे ‘कॉन्संट्रेशन’ त्या एका अपत्यावरच जास्त असल्याने त्याच्यामागे ध्येयपूर्तीसाठी पालकांचा ससेमिरा असतो. आत्महत्या, आकस्मिक मृत्यूमागील काही कारणांमध्ये ध्येयाचाही काही प्रमाणात वाटा असू शकतो, तो नाकारता येत नाही.
अलीकडच्या काळात अंतर्गत गुणांमुळे टक्केवारी वाढत आहे. पदवी अभ्यासक्रमात विषय निवडीची भरपूर संधी आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रचंड बदल करण्यात आले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता मुलांना आवडत्या विषयातून शिकता येणार आहे. तसेच त्यांना आवडते करिअर निवडण्याची मुभा आहे.
पालकांनी विद्यार्थ्यांना विनाकारण ताण देऊन त्यांच्यामागे सतत टुमणा लावण्याची गरज नाही. दुसरी भाषा म्हणून विदेशी भाषेची सोय आहे. पहिलीपासूनच इंग्रजी हवे, हे मध्यंतरीचे वाढते फॅड आता ग्रामीण भागात कमी होऊ लागले आहे. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिकून स्पर्धा परीक्षेत मान उंचावणारी कामगिरी करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
इंग्रजी आले पाहिजे, ते वाघिणीचे दूध असल्याचे सांगितले जाते. परंतु, इंग्रजी हा करिअरला जोडणारा विषय नसल्याचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी अनुभवातून सांगतात. त्यामुळे त्याचाही बाऊ करण्याची गरज नाही. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच, वकिलाच्या मुलाने वकीलच बनावे, असाही ट्रेंड आता राहिला नाही. तरीही नकारात्मक बातम्या आल्या की मन विषण्ण होते.
पालकांनी हे आवर्जून लक्षात ठेवावे
प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्यांनी खूप शिकून नाव कमवावे, असे त्यांना वाटते. त्यासाठी ते खूप परिश्रम घेतात, सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात. अभ्यासात कमी पडू नये म्हणून क्लास लावले जातात. हुशार मुलांशी बरोबरी किंवा अनुकरण करतात. पण, कधीकधी या अपेक्षा अवास्तव ठरतात.
पालक आपले विचार मुलांवर लादतात, पण मुलांना काय वाटते, याचा विचार बऱ्याचदा केला जात नाही. स्पर्धात्मक युगात निभाव लागण्यासाठी मुलांनी सतत अभ्यास करावा, अशा विचाराने ताण देतात. पर्यायाने मुलांना खेळाचा आनंद मोकळेपणाने घेता येत नाही. पालकांनी आपल्या मुलाची क्षमता वेळीच ओळखली पाहिजे. मुलांवर सुसंस्कार करणे पालकांचे कर्तव्यच आहे. पण, त्याचा अतिरेक केल्यास बालपण हरवले जाईल आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाही. मुले मोठी झाल्यावर त्यांनी खूप पैसा मिळवावा, परंतु आई-वडिलांचा मान, आदर राखावा, अंतर देऊ नये हीपण माफक अपेक्षा असते.
मुलांनीही पालकांची भावना विचारात घ्यावी
प्रत्येक पालक हा आपल्या माघारी मुलगा मोठा झालेला असावा, तो कोणावरही अवलंबून राहू नये, तो स्वयंपूर्ण व्हावा, यासाठीच रक्ताचे पाणी करून त्याचे हट्ट पुरवतात. त्यांना रागावले तर त्यामागे भविष्याची चिंता दडलेली असते. पालक कधी रागावले तर मुलांनी फारसे मनावर घेऊ नये. ते जे करतात, आपल्या भल्यासाठीच असल्याचा सकारात्मक विचार प्रत्येक मुलाने करायला हवा. तणावात्मक स्थिती येण्यापूर्वीच प्राणायाम, ध्यान व योगाचा विचार आवर्जून केला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.