Flowers Canva
सोलापूर

वैशाखी विखारात नयनरम्य रंगीबेरंगी फुलांची रंगपंचमी !

माळीनगर परिसरातील रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्ग नयनरम्य बनला आहे

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

पिवळसर छटा असलेला गुलमोहर लालबुंद फुलांच्या गुच्छांसह येथे फुलला आहे. झाडांच्या पायथ्याशी पडलेला गोलाकार फुलांचा सडा म्हणजे आपल्या स्वागतासाठी अंथरलेले "रेड कार्पेट' असल्याचा अनुभव येतो आहे.

माळीनगर (सोलापूर) : माळीनगर व परिसरात गुलमोहर, बहावा, बोगणवेल, मधुमालती, सोनचाफा या रंगीबेरंगी फुलांची निसर्गात मुक्तपणे उधळण सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या भागात निसर्गात फुलांची रंगपंचमी सुरू असल्याचे चित्र आहे. वैशाखी विखारात हे लोभस, नयनरम्य दृश्‍य डोळ्यांना सुखद गारवा देत आहे. (The colorful flowers of Malinagar area make the nature beautiful)

माळीनगर साखर कारखाना, दि मॉडेल विविधांगी प्रशालेचा परिसर विविध वृक्षराजींनी नटला आहे. अगदी रखरखते ऊन कोणालाच नको असते. निसर्ग सौंदर्याचा खराखुरा आनंद घेण्यासाठी, निसर्गाला निरखून बघण्यासाठी, त्याचे दिमाखदार वैभव अनुभवण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होणारे मन व संवाद साधणाऱ्या अंतर्मनाची गरज असते. वैशाखी सौंदर्याने उन्हाची काहिली कुठल्या कुठे पळून जाते. लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाशी वैशाखाचे जवळचे नाते असल्याचे जाणवते.

वैशाखाच्या सौंदर्यात भर पडते ती लालचुटूक गुलमोहरांच्या फुलांची. येथील परिसर गुलमोहरांच्या फुलांनी बहरून गेला आहे. पिवळसर छटा असलेला गुलमोहर लालबुंद फुलांच्या गुच्छांसह येथे फुलला आहे. झाडांच्या पायथ्याशी पडलेला गोलाकार फुलांचा सडा म्हणजे आपल्या स्वागतासाठी अंथरलेले "रेड कार्पेट' असल्याचा अनुभव येतो आहे. वाऱ्याची झुळूक आणि त्यातील गारव्यामुळे चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटत आहे.

कारखाना व शाळेच्या आवारात सोनपिवळ्या झुपक्‍यांनी अंगभर फुललेला बहावा मोठ्या दिमाखात डौलत आहे. त्याच्या पातळ पारदर्शक पिवळ्याधमक पाकळ्या उन्हे पिऊन सुंदर, तेजस्वी झाल्याचे दिसत आहे. संपूर्ण झाडाला लगडलेली पिवळी फुले आणि टोकाला पोपटी रंगाच्या कडा असलेली गोल मण्यांसारखी झुंबरे म्हणजे आपल्या स्वागतासाठी जणू आकाशदिवे लटकावल्याचा आभास निर्माण करीत आहेत. गळालेल्या फुलांमुळे पिवळा गालिचा अंथरल्यासारखे दृश्‍य बहाव्याच्या झाडाखाली दिसत आहे. हळूहळू बहाव्याला हातभर लांबीच्या काळ्या रंगाच्या शेंगा लागून पुढच्या ऋतूपर्यंत तो संन्यस्त होईल.

शाळेच्या परिसरातील कुंपणावर बोगणवेलच्या गुलाबी, पांढऱ्या, केशरी रंगाच्या पातळ कागदी फुलांनी शोभा वाढविली आहे. हिरव्या रंगाचा लांब देठ असलेल्या गुलाबी, पांढरट जांभळ्या रंगाच्या मधुमालतीच्या फुलांचा साज शाळेच्या इमारतीवर चढला आहे. फुलांचे गुच्छ झुंबराप्रमाणे जमिनीकडे झुकलेले दिसत आहेत. मधुमालतीच्या फुलांचा मंद सुगंध मनाला तजेला देत आहे. मधुमालतीला फुले वर्षभर असतात. मात्र, या दिवसात त्याला अधिक बहर असतो. शाळेच्या कोपऱ्यात लाल फुलांनी बहरलेले चाफ्याचे उंच झाड लक्ष वेधून घेत आहे. लॉकडाउनमुळे निसर्गातील रंगपंचमीचे विलोभनीय दृश्‍य सर्वांना अनुभवता येत नाही. मात्र, निसर्गाने त्याचे काम चोख बजावले आहे.

उन्हाळ्यातही निसर्ग ऐन भरात असतो. आपल्या संपूर्ण लावण्यासह ऐटीत उभा राहतो. विविध रंगछटांसह हसत असतो. त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. बहावा जास्त फुलला तर ते जास्त पाऊस पडण्याचे संकेत असतात.

- प्रा. प्रकाश चवरे, उपमुख्याध्यापक, दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT