एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मोहोळ तालुका ओळखला जात होता.
मोहोळ (सोलापूर) : एकेकाळी कॉंग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून मोहोळ तालुका (Mohol Taluka) ओळखला जात होता. परंतु, येथील कॉंग्रेसमधील काही पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत राजकीय विरोध करण्याच्या एककलमी कार्यक्रमाने कॉंग्रेसच्या तत्त्वात न बसणाऱ्या विचारसरणीच्या वळचणीला जाऊन बसण्याच्या मानसिकतेमुळे गांधीवादी विचाराची कॉंग्रेस तालुक्यातून आपले अस्तित्वच हरवून बसली होती. कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील (Dhawalsingh Mohite-Patil) यांच्या माध्यमातून झंझावती जनसंवाद यात्रेद्वारे पुन्हा एकदा तालुक्यातील कॉंग्रेस आपले जनमानसातील अस्तित्व शोधून ते पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
मोहोळ तालुक्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक कै. संभाजीराव गरड व कै. माजी आमदार शहाजीराव पाटील यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता असूनही कै. रामकृष्ण संभाजीराव गरड, कै. ए. आर. डी. शेख, अरुण शहाजीराव पाटील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब बळिराम क्षीरसागर नव्या पिढीमध्ये देवानंद गुंड-पाटील, अशोक देशमुख, राजेश पवार आदी नेते विस्कटलेल्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून शहाजीराव पाटील गटाचे नेतृत्व करू शकले नाहीत. उलट, काहीजणांनी राष्ट्रवादीच्या डेरेदार सावलीला बसणे पसंत केले. तर बहुतांश जणांनी स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाना, विधानसभा आदी निवडणुकांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकीय विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणेच पसंत केले. "कधी उघडपणे तर कधी गुपचूपपणे' विरोधी राजकीय पक्षाला व संघटनेला ताकद देण्याचे काम कॉंग्रेसच्या काही पुढाऱ्यांनी केले. परिणामी विरोधी पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होत गेली.
संबंधित नेत्यांना पाठिंबा व साथ दिल्यामुळे कॉंग्रेसच्या काही पुढाऱ्यांना स्टेजवरचा मान-सन्मान किंवा एखादे पद मिळत गेले. पण कॉंग्रेस पक्ष मात्र परावलंबी होत राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कॉंग्रेस पक्षाच्या आदेशानुसार पक्षाच्या अधिकृत हाताच्या चिन्हावर उमेदवार फक्त उभेच राहात होते, पण या सर्वच निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पडलेली अत्यल्प मते व शिवसेना-भाजप यांच्या उमेदवारांना पडलेली मते यातील तफावत पाहिली तर ही मते नेमकी कोणाच्या मतपेटीत जात होती? याचीच साक्ष कॉंग्रेसच्या उमेदवारांना पडलेली मते देत होती. परिणामी, कॉंग्रेस नेत्याच्या व कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेचा फायदा घेत शिवसेना, भाजप आदी पक्षांसह भीमा परिवार तालुक्यात आपले वेगळे भक्कम स्थान निर्माण करू शकले. मात्र, त्यांच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे अस्तित्व फक्त पक्षीय कार्यक्रम, बैठक, निषेध व्यक्त करणे, निवेदने देणे आदींपुरतेच उरल्याची जाणीव आता उशिरा का होईना कॉंग्रेसला झाली आहे. त्यामुळे आता जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेससाठी सकारात्मक चित्र दिसू लागले आहे.
कॉंग्रेसमध्ये सकारात्मक बदल
आता महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील कॉंग्रेस मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यशैलीचा सकारात्मक परिणाम जाणवू लागला आहे. मात्र, मोहोळ तालुक्यातील कॉंग्रेसच्या पुढारी व कार्यकर्त्यांवर याचा किती परिणाम झाला आहे? याचे प्रात्यक्षिक आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच दिसून येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.