सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. उद्या (रविवारी) सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. तर मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.
या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.
या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला उद्या होणार आहे.
विजयी मिरवणूक काढल्यास होणार कारवाई
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विजयी मिरवणूक काढण्यावर निर्बंध आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. मतमोजणी केंद्राबाहेर व पंढरपूर शहर, मंगळवेढा तालुक्यामध्ये पोलिसांचा पुरेशा प्रमाणात बंदोबस्त राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर
ठळक बाबी...
सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणीने सुरू होणार मतमोजणीची कार्यवाही
मंगळवेढ्यातील 104 गावे तर पंढरपूर तालुक्यातील 35 गावे आणि पंढरपूर शहराच्या मतमोजणीसाठी वाजणार रात्रीचे आठ
कोरोनामुळे विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी; पोलिस अधीक्षकांनी नेमला तगडा बंदोबस्त
मतमोजणीसाठी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; साडेतीन हजार आहेत पोस्टल मते
मतमोजणीच्या अनुषंगाने दोन एसआरपीएफ तर एक आरसीबीची तुकडी नियुक्त; मतमोजणी केंद्राच्या परिसरात 170 पोलिस अधिकारी व कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.