आता कोरोना कुठं राहिलाय, लय दिवस मास्क वापरला, आता जरा मोकळा श्वास घेऊ. सारखाच मास्क लावला तर गुदमरल्यासारखं व्हतंय...
सोलापूर : आता कोरोना (Covid-19) कुठं राहिलाय, लय दिवस मास्क वापरला, आता जरा मोकळा श्वास घेऊ. सारखाच मास्क लावला तर गुदमरल्यासारखं व्हतंय... यासह अनेक कारणांचा आधार शोधत मास्कचा वापर 70 टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे. सॅनिटायझरचा वापरही कमी झाला आहे. कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांसाठी महत्त्वाची ठरलेल्या 'सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर' (एसएमएस) त्रिसूत्रीचा सोलापूरकरांना विसर पडल्याचे 'सकाळ'च्या पाहणीत समोर आले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाने कठोर नियम शिथिल केले आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाबद्दल नागरिकांमध्ये असलेली भीती सध्या कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा, विनामास्क फिरणाऱ्यांवर पूर्वी पोलिस दंडात्मक कारवाई करत होते. त्यामुळे सोलापूर शहरात एन्ट्री करताच अनेक वाहनचालक, प्रवासी मास्क लावत होते. आता पोलिसही विनामास्कवाल्यांवर पूर्वीप्रमाणे कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.
ठळक...
विना मास्क फिरणारे : 80 टक्के
सोशल डिस्टन्स मोडणारे : 70 टक्के
सॅनिटायझरकडे दुर्लक्ष केलेले : 90 टक्के
नागरिक म्हणतात...
नेहमी मास्क वापरत नाही. शक्यतो गर्दी, दवाखाना अशा ठिकाणी आवर्जून मास्क वापरतो. सततच्या मास्कमुळे श्वास कोंडल्यासारखे वाटते. म्हणून अधूनमधून मास्क काढतो.
- शशिकांत वाघमारे
कोरोना गेला आहे. सर्व स्थिती पूर्ववत येत आहे तर मग मास्कचा फार्स कशाला? गर्दीमध्ये अत्यावश्यक ठिकाणीच मास्क वापरणे योग्य ठरेल. त्यामुळे मास्कचा मी गरजचेपुरता वापर करतो.
- एजाज शेख
मास्कचा अतिरेकी वापर हा शरीरावर परिणाम करतो. कोरोनाचा धोका टळण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे योग्य ठरेल. आता कोरोनाही संपत आला आहे.
- मेघा जोशी
मी शक्यतो मास्क वापरतो, आता रुमालासारखी मास्क ठेवायचीदेखील सवय लागली आहे. परंतु कोरोनाच्या काळात जसे दिवसभर मास्क घालून बसत होतो, आता ते प्रमाण कमी झाले आहे. कोरोना समूळ नष्ट होईपर्यंत मास्कचा वापर करावाच लागेल.
- सागर नरोणी
आता कोरोना गेल्यामुळे आम्ही मास्क कमी वापरतो. जड काम करताना मास्कचा त्रास होतो. सुदैवाने जिल्ह्यात कोरोना पूर्णत: कमी झाल्याने आता मास्कबाबत कोणी विचारत नाही. त्यामुळे मास्क वापरत नाही.
- लक्ष्मीकांत मातनाळे
प्रवासात आम्ही न चुकता मास्कचा वापर केला. आता प्रवास खुला झाला. मंदिरे उघडली म्हणजे कोरोना संपलेला नाही. मास्कसह सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यकच आहे. सर्वांना मास्क वापरावा.
- युवराज गरदडे
हवे तर प्रत्येक ड्रेस- साडीच्या मॅचिंगनुसार मास्क खरेदी करावा. मास्कच्या किंमतीही माफकच आहेत. मात्र, मास्क वापर टाळणे चुकीचे आहे. प्रवासात तसेच बाजारात फिरताना तर मास्क काढूच नये.
- वृषाली गरदडे
सोलापुरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नियमितपणे मास्क वापरल्याने कोरोनापासून बचाव आणि धुळीपासून नाकातोंडाचे रक्षण होत असल्याने मी घरातून बाहेर पडताना मास्क वापरते.
- वर्षा लिगाडे
मी स्वतः मास्क सातत्याने वापरतो. माझे दोन्ही लसीचे डोस व बूस्टर डोस झाला तरी मी मास्क वापरतो. पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नाही. स्वतः मास्क वापरल्याने स्वतःचे संरक्षण आपण करू शकतो.
- शशीकुमार परदेशी
मी नियमित मास्क वापरतो. समाजात मास्कचा वापर 75 टक्क्यांनी घटला आहे. केवळ पोलिस जेथे असतात तेथे लोक मास्क वापरतात. नंतर काढून टाकतात. पण हे सुरक्षित वाटत नाही.
- अनंत पवार
मास्कचा वापर कमी होत चालला आहे. पण धोका अद्याप संपलेला नाही. अद्याप शाळेतील मुलांचे लसीकरण बाकी आहे. तोपर्यंत तरी काळजी घेतलीच पाहिजे असे वाटते.
- लिंबाजी व्हनमने
औषध विक्रेते म्हणतात...
मागील चार महिन्यात सॅनिटायझर व मास्कची विक्री घटली आहे. सॅनिटायझरची खरेदी तब्बल 70 टक्क्यांनी घटली आहे. ग्राहक आता फारशी चौकशी देखील करत नाहीत. मास्कमध्ये दोन प्रकार विकले जात होते. त्यापैकी एक यूज अँड थ्रो प्रकारचा मास्क आहे, त्याची विक्री कमी झाली आहे. दररोज 10 ते 15 मास्क विकले जातात. तर इतर प्रकारचे अधिक किंमतीचे व दर्जेदार मास्कची विक्री अगदी संपत आली आहे. 80 टक्क्यांनी मास्कची विक्री घटली आहे.
- अनिल उघाडे, न्यू गोविंद मेडीकल, विजापूर रोड, सोलापूर
मागील काही महिन्यात सॅनिटायझरची विक्री थंडावली आहे. केवळ शाळा व महाविद्यालयातून मागणी केली जात आहे. पण घरगुती वापरासाठी सॅनिटायझर विक्री होत नाही. मास्कची विक्रीदेखील थंडावली आहे. अगदी तुरळक ग्राहकच मास्कची मागणी करते आहे. कोरोनाच्या बाबतीत आता या दोन्ही वस्तूंची विक्री फारशी होत नाही. लोकांची जागरुकता कमी झाली आहे.
- सुनील गायकवाड, जनऔषधी केंद्र, नवी पेठ, सोलापूर
नो मास्क, नो एन्ट्री
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून दुसऱ्या लाटेपर्यंत व आता कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतरही कायमस्वरुपी मास्क वापरणाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर या तीन अधिकाऱ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या अधिकाऱ्यांची ज्या-ज्या ठिकाणी एन्ट्री होते, त्या ठिकाणी ते मास्क लावूनच जातात. प्रशासनातील बहुतांश अधिकाऱ्यांनी मास्क वापरण्याचे सोडले असताना या अधिकाऱ्यांनी मात्र मास्कचा नियमित वापर अजूनही सुरु केलेला आहे. या अधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या अभ्यागतांना अजूनही "नो मास्क, नो एन्ट्री'चा नियम पाळावा लागत आहे.
या ठिकाणी उडतो 'एसएमएस'चा फज्जा
शासकीय कार्यालये :
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, महापालिका याठिकाणी येणारे 70 टक्के नागरिक विनामास्क येत आहेत. निवेदन देण्याच्या निमित्ताने, आंदोलन अथवा उपोषण करण्याच्या निमित्ताने याठिकाणी सोशल डिस्टन्सचाही वारंवार फज्जा उडतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिका व जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी प्रवेशद्वारावरच कोरोना चाचणी केंद्रही तयार करण्यात आले होते.
रेल्वे स्थानक, बसस्थानक :
रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातही प्रवाशी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सॅनिटायझरचा तर येथे विषयच राहिलेला नाही. गर्दी असतानाही प्रवाशांकडून मास्कचा बेफिकीरपणा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती :
कोरोनाची पहिली लाट असो की दुसरी लाट सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी होत होती. आता तर कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या घटल्याने बाजार समितीत मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायर वापराचे प्रमाण नगण्य झाले आहे. लिलावावेळी होणारी गर्दी अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता आहे.
पेट्रोल पंप :
पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी येणारे वाहनधारकदेखील मास्कबाबत हलगर्जीपणा करीत आहेत. बहुतांशजणांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही. काहीठिकाणी तर गाडीत पेट्रोल, डिझेल भरणारे कामगार देखील बिनधास्त विनामास्क आढळत आहेत. यामुळे वाहनधारकांकडूनही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
'एसएमएस'ची विदारक स्थिती...
सॅनिटायझर संपले, जागेवर सॅनिटायर स्टॅण्डचे सांगाडे राहिले
खासगी प्रवासी वाहनात सोशल डिस्टन्सला फासला जातो हरताळ
एसटी बंद झाल्याने खासगी वाहनात प्रवाशांची तुडुंब गर्दी
विनामास्कच्या कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष
सॅनिटायझर विक्रीत झाली कमालीची घट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.