पदाधिकारी निवडीवरून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवेढा (सोलापूर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हा नेतृत्वाने जिल्हा व तालुका कार्यकारिणीत बदल केला. परंतु, या पदाधिकारी निवडीवरून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार केल्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपला जवळ करत भाजप उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे मोजक्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर 2019 विधानसभेची जागा राष्ट्रवादीने पटकावली. परंतु (स्व.) भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत गेलेल्या अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे सारथ्य केले. परंतु ही जागा जिंकण्यात अपयश आले. त्यामागील कारणे अनेक असली तरी येत्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांना सामोरे जात असताना राष्ट्रवादीने देखील मजबूत बांधणी करणे आवश्यक आहे. म्हणून तालुका व जिल्हा कार्यकारिणीत बदल करत असताना व नव्या नेतृत्वाला संधी देताना जुन्यांनाच संधी देण्यावर भर दिल्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे. त्यातूनच शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
ही गटबाजी जर अशीच राहिली तर येणाऱ्या चार महिन्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जाणार, हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात सत्ता असताना देखील तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात विशेषत: तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, प्रांत, पोलिस स्टेशन व महावितरणच्या कार्यालयात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. तशी तक्रार राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले नाही. सध्या तालुक्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पदाधिकारी बदलण्याचा अट्टहास का केला, असा प्रश्न देखील शहर व ग्रामीण भागातून विचारला जात आहे.
जनता दरबार भरलाच नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादीने नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी 68 जिल्हा परिषद गटात जनता दरबाराचे आयोजन केले. त्यामध्ये आलेल्या अडचणी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवल्या जाणार होत्या. तालुक्यातील नागरिक यासाठी प्रतीक्षेत होते. परंतु, हा जनता दरबार मंगळवेढ्यामध्ये आयोजित केला नाही. शासकीय कार्यालयात येत असलेल्या अडचणींबाबत या दरबाराच्या माध्यमातून मतदारांशी जवळीक साधण्याची आयती संधी होती, परंतु ही संधी देखील राष्ट्रवादीने सध्यातरी गमावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.