पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबतची उदासीनता कधी दूर होणार? Canva
सोलापूर

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबतची उदासीनता कधी दूर होणार?

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबतची उदासीनता कधी दूर होणार?

अभय दिवाणजी

संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर विकासाबाबत प्रचंड उदासीनता दिसू लागली आहे.

सोलापूर : संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर (Pandharpur) विकासाबाबत प्रचंड उदासीनता दिसू लागली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण (Pilgrimage Development Authority) अन्‌ नमामी चंद्रभागा (Namami Chandrabhaga) या योजना तर बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत. एकेकाळी प्रचंड चर्चेत आलेल्या 65 एकर परिसरानेही विकासाकडे पाठ फिरविली आहे. जगभरातून भाविकांची हजेरी लागत असलेल्या पंढरपूरच्या विकासासाठी आता तरी सरकारने ठोस पावले उचलण्याची तसेच राज्य व केंद्र शासनाच्या तिजोरीतून निधी खेचून आणण्यासाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

जवळपास दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगाला घेरले असले अन्‌ प्राधान्यक्रमात हा विषय असला तरी कोरोनापूर्वी आणि गेल्या कित्येक वर्षात पंढरपूरच्या विकासाबाबत साधा विचारही केला गेला नसल्याचे जाणवते. पर्यटन विकासाबाबत दिलेल्या प्रस्तावांसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचेच पंढरपूरशी भावनिक नाते आहे. नमामी चंद्रभागा ही योजना जरी महायुतीच्या काळातील असली तरी पंढरपूर विकास प्राधिकरण योजना तरी त्या आधीच्या सरकारच्या काळातील आहे.

पंढरपूर शहर हद्दीपासून लगतच्या दहा किलोमीटर परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2009 ला पंढरपूर विकास प्राधिकरणाची घोषणा केली. आषाढीच्या महापूजेनिमित्त आल्यानंतर सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी यासंदर्भात प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याला तत्काळ संमती देत प्राधीकरण स्थापन केले. 24 ऑगस्ट 2009 ला श्री. काळे आणि प्रशांत परिचारक यांची प्राधिकरणावर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांच्या अधूनमधून बैठकाही झाल्या. परंतु जमिनीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाल्याने पुढे काहीच झाले नाही. 16 ऑगस्ट 2018 रोजी प्राधिकरणाच्या शेवटच्या बैठकीनंतर गेल्या तीन वर्षात काहीही झाले नाही.

चंद्रभागेतील स्नानाचे महत्त्व काही औरच. परंतु प्रदूषणामुळे चंद्रभागेचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नदी तीरावरील गावातील नगरपालिका आणि ग्रामपंचायती, साखर कारखाने आणि औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. अशा घाण पाण्यातच वारकऱ्यांना स्नान करावे लागते. चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा अवरित निर्मल रहावी यासाठी 2016 मध्ये मोठा गाजावाजा करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "नमामी चंद्रभागा' अभियानाची सुरवात केली. चंद्रभागेच्या उगमापासून पंढरपूरच्या पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदीकाठचा परिसर स्वच्छ राहावा, सांडपाणी थेट नदीत मिसळले जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार होती. यासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा पुढाकार होता. अर्थसंकल्पात प्रारंभी 20 कोटींची तरतूद करण्यात आली होती. नदीपात्रात बंधारे बांधणे, यात्रेदरम्यान पुरेशी स्वच्छतागृहे उभारणे, भीमा नदीबरोबरच उपनद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही कामे प्राधान्याने करण्यात येणार होती. 2022 पर्यंत चंद्रभागा निर्मळ स्वच्छ करण्याचे ध्येय होते. भाजप सरकारने या अभियानाचा जेवढा गाजावाजा केला तेवढे गांभीर्याने काम झाले नाही आणि आता तर या अभियानाकडे दुर्लक्ष झाले आहे. काही अपवाद वगळता नमामी चंद्रभागेची कामे दुर्दैवाने अजून कागदावरच आहेत. नमामी चंद्रभागा अभियानाच्या अनुषंगाने नदीकाठच्या लोकांमध्ये नदी प्रदूषण न करण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली संकल्प यात्रादेखील काढली होती. या अभियानाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली होती. "प्रदूषणविरहीत भीमा नदी' अंतर्गत "सकाळ'नेही जनजागृती केली होती.

सरकार बदलल्यानंतर या योजना सध्या तरी कागदावरच असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे विकास कामात खंड पडल्याचे सरकारकडून सांगण्यातही येईल. निधी नसल्याचे कारणही पुढे येईल. परंतु पंढरपूरच्या विकासासाठी केंद्राकडून तसेच लोकसहभागाचेही आवाहन केले तर निधी उभारण्यात कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

स्काय वॉक आणि दर्शन मंडप प्रलंबितच

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप ते वीणे गल्लीतून चंद्रभागा घाटापर्यंत उड्डाणपूल (स्काय वॉक) उभा केला आहे. हा स्काय वॉक तेथून पुढे स्मशानभूमीलगत उभारण्यात येणार असलेल्या नवीन दर्शन मंडपापर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी नकाशे तयार करण्यात आले आहेत. स्काय वॉक व दर्शन मंडपासाठी सुमारे 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलावरून जाताना कडेला बसण्याची व्यवस्था असणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. नवीन दर्शन मंडपात भाविकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार असून तेथे हॉटेल असेल. मंदिर समितीने भाविकांकडून देणग्या जमा करून हे काम पूर्ण करण्याचे ठरवले होते. परंतु अद्याप या कामाला सुरवात होऊ शकलेली नाही.

जमेच्या बाजू

  • चंद्रभागेत घाण पाणी जाऊ नये म्हणून भुयारी गटार योजनेच्या (70 कोटी) तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण

  • यमाई तलावाशेजारी तुळशी वन उद्यान विकसित

  • पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत

पर्यटन विकासासाठी...

  • भविष्यात पंढरपूरनजीकच्या दहा किमीपर्यंत अंतर्गत रस्ते विकासाची गरज

  • वारकऱ्यांच्या सुविधांसाठी विसावा तथा निवारा केंद्रांच्या उभारणीची गरज

  • 200 एकराचा तलाव परिसर विकास, बोटिंग, संतांसंदर्भात लेझर शोसाठी पाठपुरावा

  • महाराष्ट्रात उत्तम दर्जाच्या नाट्यगृहासाठी पाठपुरावा

  • पर्यटन विकासाबाबत मंत्री पातळीवर प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT