सोलापूर शहराचा विस्तार वाढला असून गुन्हेगारी रोखणे, गुन्हेगारांचा तपास करण्याच्या दृष्टीने शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वाढणे गरजेचे आहे.
सोलापूर: शहरालगत दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत शहरीकरणाचा विस्तार वाढला आहे. ग्रामीण पोलिसांवरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव काही दिवसांत निकाली लावला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
सोलापूर शहराचा विस्तार वाढला असून गुन्हेगारी रोखणे, गुन्हेगारांचा तपास करण्याच्या दृष्टीने शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावाची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री पाटील म्हणाले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयाने पोलिस महासंचालकांना त्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून कंन्सेंट बैठक होणे अपेक्षित आहे.
सतेज पाटील नव्याने शहर पोलिस आयुक्तालयात जाणारा परिसर, त्याचा नकाशा निश्चित करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब गरजेचे आहे. परंतु, अजून ती बैठक झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यावर राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. पोलिस वसाहतींचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल, महिला पोलिसांची ड्यूटी आठ तास करण्याचा निर्णय टप्प्याटप्याने राज्यभर घेतला जाईल, उच्चशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांचा वापर विविध गुन्ह्यांच्या शोधासाठी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जाणून घ्या, प्रस्तावित आयुक्तालयाची हद्द
तुळजापूर रोडवरील तामलवाडी, हैदराबाद रोडवरील बोरामणी, विजयपूर रोडवरील भीमा नदीच्या पुलापर्यंत आणि पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यापर्यंत शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाने पोलिस महासंचालक कार्यालयास सादर केला आहे. चिंचोली एमआयडीसी शहर आयुक्तालयात समाविष्ट करावी, असे निवेदन एमआयडीसी असोसिएशनने दिले आहे.
शहरात वाढणार 'ही' पोलिस ठाणे
शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सध्या शहरात सात पोलिस ठाणे आहेत. त्यात विजापूर नाका, एमआयडीसी, सलगर वस्ती, सदर बझार, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. मात्र, आता हद्दवाढीनंतर सोलापूर तालुका पोलिस ठाणे, मंद्रूप पोलिस ठाणे यांचा शहर आयुक्तालयात समाविष्ट होतील. दुसरीकडे जुळे सोलापूर, बाळे, सैफूल, चिंचोली एमआयडीसी याठिकाणी नव्याने पोलिस ठाणे सुरु होतील, असेही त्या प्रस्तावात नमूद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
खासगी व्यावसायिकांनी बसवावेत सीसीटिव्ही
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी विशेषत: घरफोडी, चोरीच्या घटना वाढत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्हींची संख्या वाढणे अपेक्षित आहे. परंतु, सोलापूर शहरातील खासगी व्यावसायिकांनी अवघे दोन हजार सीसीटीव्ही बसविले आहेत. परंतु, ती संख्या दहा हजारांपर्यंत वाढल्यास निश्चितपणे गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कॅमेऱ्यांचे जीओ टॅगिंग होईल आणि त्यातून गुन्हेगारांचा शोध घेणे सोयीस्कर होईल, असेही त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.