सोलापूर : ऑफलाइन पद्धतीने वर्णनात्मक प्रश्नांद्वारे परीक्षा घेण्याची संपूर्ण तयारी झाल्यानंतरही शेवटच्या टप्प्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला. ५० वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पाच पेपर घेतले जातील. महिन्यात परीक्षा संपवून निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.
कोरोनामुळे लिखाणाचा सराव कमी झाला असून प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागाकडे केली होती. तरीदेखील, विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा मुद्दा पुढे करून प्रश्नपत्रिकेत बदल करणार नसल्याची ताठर भूमिका घेतली. पण, नियोजित वेळापत्रकानुसार २० जूनपासून परीक्षा सुरू होणार असतानाच आषाढी वारीमुळे परीक्षा १४ जुलैपासून घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ प्रश्नांची असेल, असेही स्पष्ट केले. त्यामुळे छपाई केलेल्या चार-पाच लाख प्रश्नपत्रिकांचे काय करायचे, छपाई होण्यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने असा का निर्णय घेतला नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता बीए, बीकॉम, बीएएएसी, बी-टेक, एमए, एमकॉम, एमएस्सी, एम-टेक, अभियांत्रिकी, फार्मसी व आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांची परीक्षा होणार आहेत. आता परीक्षांची कार्यपद्धती ठरविण्यासाठी उद्या (सोमवारी) विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नांचा क्रम कसा असावा, दररोज किती पेपर घेता येतील, दोन पेपरमध्ये किती तासांचे अंतर असावे, अशा बाबींवर चर्चा होऊन नियोजन निश्चित होणार असल्याची माहिती परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. निकाल वेळेत लावून पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरु केले जाणार आहे.
प्रश्नांच्या उलटसुलट क्रमामुळे विद्यार्थ्यांचा लागणार कस
कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकलेल्या विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिताना त्यांना अडचणी येतील म्हणून ऐनवेळी विद्यापीठाने वस्तुनिष्ठ प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल, असे जाहीर केले. पण, कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे क्रम उलटसुलट असणार आहेत, जेणेकरून एकमेकांना विचारून किंवा एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिता येणार नाहीत, हा त्यामागील हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.