माळशिरस (सोलापूर) : माळशिरस पंचायत समितीच्या (Malshiras Panchayat Samiti) उपसभापतिपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने (Mohote-Patil Group) 17 सदस्यांच्या पाठबळावर बोरगाव पंचायत समिती गणाचे सदस्य प्रताप पाटील (Pratap Patil) यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, विरोधी गटातील तीन सदस्य निवडीवेळी मोहिते- पाटील गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधी गटाला चांगला धक्का बसला आहे. (Unopposed election of Pratap Patil as Deputy Chairman of Malshiras Panchayat Samiti)
माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील व सहाय्यक शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात सोमवारी उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसभापतिपदासाठी मोहिते- पाटील गटाकडून प्रताप पाटील यांनी तर विरोधी गटाकडून अजय सकट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
माळशिरस पंचायत समितीमध्ये मोहिते-पाटील गटाची 14 तर विरोधी गटाची आठ सदस्य संख्या होती. परंतु राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन विरोधी गटाचे अनिल जाधव, विजया धाईंजे व संगीता शेळके या तीन विरोधी सदस्यांनी मोहिते- पाटील गटात प्रवेश करत प्रताप पाटील यांना पाठिंबा दिल्याने पंचायत समितीमध्ये मोहिते- पाटील गटाची सदस्य संख्या 17 झाली. त्यामुळे उपसभापतिपदाच्या निवडणुकीतून विरोधी गटाचे अजय सकट यांनी माघार घेतली व मोहिते- पाटील गटाचे प्रताप पाटील यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. या निवडीने तालुक्यातील विरोधी गटाला जोरदार धक्का बसला.
प्रताप पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, सभापती शोभा साठे, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते- पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील, किशोर सूळ, सदस्य गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, अनिल जाधव, विजया धाईंजे, रेणुका माने-देशमुख, ऍड. हसीना शेख, हेमलता चांडोले, लतिका कोळेकर, विद्या वाघमोडे, ताई महाडिक, संगिता शेळके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.