Ashadhi Wari sakal
सोलापूर

Ashadhi Wari : मराठी-गुजराती संस्कृतीचा ‘वारकरी’ सेतू;अनंतप्रसाद यांच्या साहित्यात उल्लेख; संत नरसी महेता यांच्या घराण्यातील अकरावे वंशज

वारकरी संप्रदाय, येथील संतांचे कार्य, आषाढी वारी आणि एकादशीचे माहात्म्य महाराष्ट्राला माहिती आहे. पण, गुजरातमधील महान संत नरसी महेता यांच्या घराण्यातील अकरावे वंशज अनंतप्रसाद यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गुजराती भाषेतही वारीचे महत्त्व सांगितले आहे.

शंकर टेमघरे -सकाळ वृत्तसेवा

नातेपुते : वारकरी संप्रदाय, येथील संतांचे कार्य, आषाढी वारी आणि एकादशीचे माहात्म्य महाराष्ट्राला माहिती आहे. पण, गुजरातमधील महान संत नरसी महेता यांच्या घराण्यातील अकरावे वंशज अनंतप्रसाद यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गुजराती भाषेतही वारीचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या ग्रंथातील आख्यानांमध्ये पंढरीची वारी आणि एकादशी व्रताच्या माहात्म्याचे काव्यात्मक वर्णन आहे. वारकरी संप्रदाय हा मराठी आणि गुजराती संस्कृतीचा सेतू असल्याचे त्यांच्या ग्रंथरचनेतून अधोरेखित होत आहे.

गुजराती संतकवी नरसी महेता यांनी पंधराव्या शतकात आपल्या काव्यातून नामदेव महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज, पंढरी माहात्म्य याबाबत अनेक रचना केल्या आहेत. नरसी महेता यांच्या घराण्यातील अकरावे वंशज अनंतप्रसाद यांनी रचलेले ‘आख्यानमाला- खंड १ व २’ हे ग्रंथ१८८० मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. यात अनंतप्रसाद यांनी सहा मुख्य वारकरी संतांच्या चरित्राला गुजराती भाषेत शब्दबद्ध केले होते.

अनंतप्रसाद यांच्या आख्यानांच्या ग्रंथाचा आरंभच, ‘एकादशी व्रत आजन्म अंगीकारणाऱ्या संप्रदायाच्या संत चरित्राचे हे गायन आहे,’ अशा शब्दांत केला आहे. त्यासाठी ग्रंथात भागवतातील श्लोकांचा आधार घेत लिहिले आहे की, ‘एकादशेन्द्रियै: पापं यत्कृतं सर्वमानवै:। एकादश्युपवासेन तत्सर्वं विलयं व्रजेत्।। अकरा इंद्रियांच्या (मन आणि दश इंद्रिये) पापांना धुणाऱ्या व अकरा उपवासांनी सर्व मानवांना शुद्ध आयुष्य देणारे हे व्रत. या व्रताचे हे माहात्म्य सांगणाऱ्या वारकरी संतांची जीवन चरित्रे आहेत. ज्यांनी आजन्म शुद्ध शाकाहार व गळ्यात तुळशीमाळ, एकादशीचे हरिव्रत आणि आषाढीमध्ये विठ्ठल भेटीची वारी ही कटाक्षाने जगली होती.

अनंतप्रसाद यांचा परिचय

संत नरसी महेतांचे गुरू व चुलते पर्वतराय यांच्या घराण्यातील अनंतप्रसाद त्रिकमलाल श्रीवैष्णव (इ.स. १८५४ ते इ.स. १९१०) हे अकरावे वंशज होते. राधानगरी संस्थानमध्ये ‘दिवाण’ म्हणून कार्यरत असताना अनंतप्रसाद यांनी ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांना कथा, कीर्तने, आख्यानांसाठी वंश-परंपरेने शिक्षण लाभलेले होते. त्यात वारकरी संतांची महती, भागवत धर्माची तत्त्वे, एकादशी माहात्म्य, आषाढवारीचे माहात्म्य इत्यादी तत्त्वज्ञानही त्यांनी अभ्यासले होते. तेच पुढे त्यांनी ‘आख्यानमाला’ ग्रंथांत शब्दबद्ध केले आहे. आख्यानमालेच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, ‘मी माझ्या मांगरोळ गावातील आमचे पूर्वज संतकवी नरसी महेता आणि पर्वतरायांपासूनच्या लाभलेल्या पिढीजात आध्यात्मिक आणि धार्मिक टिपणांवर आधारित हे लेखन करीत आहे.’’

अनंतप्रसाद यांचे ग्रंथ

वारकरी संप्रदायातील संत ज्ञानदेव आणि संत नामदेव तीर्थाटनावर आधारित ‘श्रीनामदेवजी निश्चय आख्यान’, चरित्रात्मक ‘श्रीनामदेवजी आख्यान’, ‘श्री जनुबाई आख्यान’, ‘श्रीसेनान्हावी आख्यान’, ‘श्री एकनाथ आख्यान’, ‘श्रीतुकाराम अने विठोबा आख्यान’, ‘श्री दामाजी आख्यान’ आणि ‘श्रीतुकाराम ने शिवाजीनुं आख्यान’ आदी चरित्रे अनंतप्रसाद यांनी आख्यानांतून मांडली आहेत. या आख्यानांमध्ये महाराष्ट्राला ज्ञात चरित्र-प्रसंग आहेत, तसेच ‘ज्ञानदेव-नामदेव’ तीर्थावळीच्या संदर्भातील काही अज्ञात प्रसंगही मांडलेले आहेत. ते लिहितात, ‘एक तरफ श्रीनामदेव ने ज्ञानदेव चाल्या जाता। पण नामा विठ्ठल संभारी, घडी घडी विह्वल थाता।। चाल्या चाल्या रे श्री नामदेव, शाहनुं स्थान त्यजी। साथे व्हाला रे रहे ज्ञानदेव, भावे भगवान भजी।।

वारकरी परंपरेचा छंदबद्ध परिचय

अनंतप्रसाद यांच्या पूर्वी गुजरातसह उत्तर भारतात पंधराव्या शतकापासून विविध संत आणि भक्तांची चरित्रे लिहिण्याचा प्रारंभ झालेला दिसतो. उदाहरणार्थ वल्लभाचार्य लिखित ‘चौरासी वैष्णवों की वार्ता’ तसेच वल्लभाचार्यांचा नातू गोकुलदास लिखित ‘दो सौ बावन वैष्णवों की वार्ता’ या दोन्ही ब्रजभाषेच्या ग्रंथांत ज्ञानदेव आणि नामदेवांची चरित्रात्मक माहिती आहे. तसेच पुढे सतराव्या शतकात नाभादास लिखित ‘भक्तमाला’, यात केवळ नामदेवरायांचे चरित्र आढळते. मात्र, अनंतप्रसाद यांनी सहा वारकरी संतांचे सविस्तर चरित्रांसह संपूर्ण वारकरी परंपरेचा परिचय गेय आणि छंदबद्ध गुजराती भाषेत आख्यानमालेतून करून दिलेला दिसतो, असे संत साहित्याच्या अभ्यासक व संशोधक मनीषा बाठे यांनी सांगितले.

अनंतप्रसाद यांचा आख्यानमाला ग्रंथ १८८० मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यातील रचना गुजरातमधील वैष्णवांच्या मुखी गायल्या जाऊ लागल्यावर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी राधानगरीचे मातब्बर दिवाण अनंतप्रसाद यांना बोलावून घेतले. त्यांच्या आदर सत्काराच्या बरोबरीने पुरस्कार स्वरूपात अनंतप्रसाद यांच्या पुत्राला गायकवाड यांच्या राज्यात मुजुमदार म्हणून नियुक्त केले होते.

- मनीषा बाठे, संत साहित्य अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT