सोलापूर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्या निर्णयाला राज्यपालांनी विरोध केला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे नेमकी परीक्षा होणार की नाही? या संभ्रमात विद्यार्थी आहेत. या निर्णयावर विद्यार्थी संघटनेमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. परीक्षेवरून या संघटनांचे राजकारण तापू लागले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष निशांत साळवे म्हणाले, महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने परीक्षा रद्द करून सर्वांना उत्तीर्ण करण्याचा जो निर्णय घेतला, तो विद्यार्थी हिताचा निर्णय आहे. गेली तीन महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लॉकडाउनमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात होते. मात्र, राज्यपालांनी परीक्षांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना परीक्षा रद्द कराव्यात असे पत्र पाठवले आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा.
भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष अक्षय अंजिखाने म्हणाले, मेहनतीने अभ्यास करून परीक्षा देऊन गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या पदवीचे महत्त्व त्यांना समजत नाही हे स्पष्टच आहे. मात्र, राज्य सरकारला अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची फारच घाई झालेली दिसतेय. स्वतःच्या अधिकारात नसलेले निर्णय घेऊन राज्यपालांना देखील झुगारून देण्याची या सरकारची वृत्ती दिसून आली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात मुख्यंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेबाबत पत्र पाठविले आहे. पंतप्रधान मोदींनी परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेताच सर्वांना पदवी किंवा पदविका देण्याचा निर्णय घेताना निर्बुद्ध राजकारण्यांनी घाई करू नये. शिक्षण, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी व जाणकार मंडळींशी सल्लामसलत करून मगच निर्णय घ्यावा.
एनएसयूआयचे गणेश डोंगरे म्हणाले, कोरोनाच्या संक्रमणाने देश मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाला आहे. या वेळी लोकांचे जीव वाचविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसोशीने प्रयत्न चालू आहेत. या कालखंडात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे आत्ताच्या परिस्थितीत भयावह आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. त्यावर पंतप्रधानांनी योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करावा. जर परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या रोषाला उद्भवणाऱ्या परिस्थितीला ते जबाबदार असतील.
अभाविपचे महानगरमंत्री सूरज पावसे म्हणाले, महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना सतत संभ्रमात टाकत आहे. याचे कारण म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्दचा निर्णय शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेला होता. कालच मुख्यमंत्र्यांनी परत प्रधानमंत्री यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा कोविडच्या परिस्थितीत घेऊ शकत नाही, तसा आदेश आपण अपेक्स बॉडीला द्यावा असं कालच्या पत्रात सांगितले आहे. परंतु यात सर्व परीक्षांबाबत अपेक्स बॉडी यांना राज्य शासनाला परीक्षा घेतल्या पाहिजेत असंच या आधी देखील सांगितलं आहे. हे सरकार पुन्हा पुन्हा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सातत्याने संभ्रमात टाकत आहे.
शिवसेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड म्हणाले, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तो योग्य आहे. या वेळी लोकांचे जीव वाचविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसोशीने प्रयत्न चालू आहेत. या कालखंडात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे आताच्या परिस्थितीत घेणे गरजेचे नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे, त्यावर पंतप्रधांनानी योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.