पोथरे (सोलापूर) : हिंदू संस्कृतीतील दिवाळी हा सण सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा मानला जातो. प्रत्येक क्षण हा एका दिवसात येतो आणि जातो. पण दिवाळी हा एकमेव असा सण आहे, की ज्यामध्ये लक्ष्मीपूजन, भाऊबीज, नरक चतुर्थी, पाडवा अशा वेगवेगळ्या नात्यांची गुंफण असलेला व लहानांपासून वृद्धांपर्यंत एकत्र येऊन साजरा होणारा सण आहे. घराची सजावट, आकाश कंदील, पणत्या, वेगवेगळे गोड पदार्थ, फटाक्यांची आतषबाजी करत प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे मात्र हा सण फटाक्यांची आतषबाजी व नातेवाइकांविना साजरा करावा लागत आहे.
विजयादशमीचा सण झाला, त्यानंतर बरोबर वीस दिवसांनी दीपावली येते. या दिवाळीचे वेध विजयादशमी झाले की सुरू होतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवाळीतील दिवसांची आखणी केली जाते. दिवाळीत कोणते गोडधोड पदार्थ करायचे याचीच तयारी सुरू झालेली असते. सुनांमध्ये माहेरी जाण्याची धडपड सुरू असते. लहान मुलांमध्ये मामाच्या गावाला जाण्याची संधी असल्याने अगदी आनंदाचे वातावरण असते. भाऊबीजेच्या अगोदरच बहिणीला आणण्यासाठी भाऊराया नियोजन करून तयार असतात. कितीही वय झालं तरी महिलांना माहेर हे प्रिय असतं. त्यामुळे नवयुवती किंवा वयोवृद्ध महिला आपल्या भावाला व आई-वडिलांना भेटण्यासाठी भाऊबीजेला माहेरी येत असते.
असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत नात्यांची गुंफण असलेला आगळावेगळा सण ज्यामध्ये लाडू, करंजी, चकल्या याबरोबरच नवीन रंगीबेरंगी कपडे, फटाके याचा आनंद घेता येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या प्रदूषणाने दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास होत असल्याने फटाक्यांवर बंदी आहे. याबाबत सोशल मीडियावरून जनजागृतीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहनांचीही मुबलक प्रमाणात सोय नाही. याशिवाय शहरातील नातेवाईक आपल्याकडे येणार म्हटल्यावर डोळ्यासमोर कोरोनाचे चित्र उभे राहात असल्याने एकमेकांकडे जावं की नाही, याबाबत भीती निर्माण होत आहे. त्यामुळे या वर्षीची दिवाळी आपल्या परिवारातच साजरी करावी, असा निर्धार केला जात आहे.
यावर्षी निसर्गाची साथ मिळाली असतानासुद्धा दिवाळीमधील जो आनंद आहे तो मात्र कोरोनामुळे उपभोगता येणार नाही. त्यामुळे इतिहासातील ही पहिली दिवाळी अशी आहे की जी नातेवाइकांविना व साजरी करावी लागत आहे.
फराळाच्या कार्यक्रमांनाही लागणार ब्रेक !
लक्ष्मीपूजनानंतर मित्रपरिवार, जावई, नातेवाईक यांना दिवाळीचे फराळ करण्यासाठी आवर्जून आमंत्रण दिले जाते. एकमेकांकडे फराळ घेण्यासाठी मोठा उत्साह असतो. यातून विचारांची देवाण-घेवाण होते. मात्र कोरोनामुळे यावर्षी दिवाळी फराळाला ब्रेक बसणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.