सोलापूर : शहरातील सैफुल भागातील करिश्मा बाबर या युवा उद्योजिकेने अत्यंत कठोर मेहनत घेत व कोरोना संकटातील अडचणी बाजूला सारत विविध प्रकारच्या चॉकलेट उत्पादनांची निर्मिती केली आहे. कोरोना संकटाच्या काळात स्वतः प्रेरित होऊन कार्य केले तर सर्व अडचणींवर मात करता येते, यासाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरला आहे.
सैफुल भागात राहणाऱ्या करिश्मा बाबर ही स्वतः आर्ट डिझाईनची विद्यार्थिनी आहे. स्मरण ब्रॅंड सोल्यूशन्स कंपनीची प्रमुख म्हणून काम करत असताना तिने प्रॉडक्ट ब्रॅंडिंगचा अभ्यास केला. स्वतःच्या निर्मितीला काही चांगल्या पद्धतीने ब्रॅंड करण्याच्या दृष्टीने तिने प्रयत्न सुरू केले. चॉकलेट प्रकारात विविध फ्लेव्हर तयार करावेत यासाठी तिने संशोधन केले. त्या संशोधनातून तिला चॉकलेटचे 13 नवे फ्लेव्हर तयार करता आले. त्यासाठी तिने बाजारपेठांचा अभ्यास देखील केला. कुटुंबातील सदस्य व विदेशात असलेल्या नातेवाइकांनी तिला या कामासाठी प्रोत्साहन दिले. हे प्रॉडक्ट केवळ पारंपरिक नसावेत तर ते ब्रॅंड क्वालिटीचे असावेत, हा तिचा आग्रह तिच्यासाठी उत्तम निर्मितीचा आनंद देणारा ठरला.
चॉकलेट फ्लेव्हर निश्चित झाल्यानंतर या प्रॉडक्टची निर्मिती श्री गणेशाच्या पूजेने करावी, या हेतूने तिने गणेशोत्सवाच्या काळात पहिले उत्पादन "ईस्टविंड' चोको मोदक तयार केले.
आबालवृद्धांना आवडतील असे ट्रफल्स असणारे चोको मोदक तिने उत्पादित केले. तिने कस्टमाईज चॉकलेट तयार केले, ज्यामध्ये तेरा वेगवेगळ्या प्रकारचे शुद्ध चॉकलेट मोदक तयार केले आहेत. त्यापैकी मिक्स ड्रायफ्रूट, रिच ड्रायफ्रूट, टुटीफ्रुटी, बटरस्कोच, पान, रसमलाई, गुलकंद, नटेला, रोस्टेड अलमंड्स, कॅरमल निट्स आणि मार्बल चोको मोदकांचे प्रकार तिने उपलब्ध केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनाची निर्मिती व विक्रीमध्ये स्वच्छतेचा विचार करूनच हे चोको मोदक बनवले. शहरातील उद्योग समूह व नागरिकांनी करिश्मा बाबर हिच्या चोको मोदकांना जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे तिने आता प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हे चोको मोदक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवातील हा प्रतिसाद पाहून तिने आता तिच्या चॉकलेट उत्पादनांच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले आहे. यासाठी तिला कुटुंबीयांचे पाठबळ मिळाल्याने उत्पादनांचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. आता दिवाळी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा पन्नासहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट तयार करण्याचे ठरवले आहे. वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचीही उत्पादने उपलब्ध केली जाणार आहेत. या उत्पादनामध्ये आरोग्यदृष्ट्या लोकांना हवे असलेले इतर प्रकार देखील देण्याबाबत तिने संशोधन सुरू केले आहे. त्यानुसार चॉकलेटचे नवे प्रकार देखील ती आणणार आहे.
कुटुंबीयांची प्रेरणा मोठी
या यशाबाबत करिष्मा बाबत म्हणते, माझ्या कुटुंबीय व नातेवाइकांसह अनेकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी स्वतःचे उत्पादन तयार करू शकले. कोरोना संकटाचे अडथळे पार करून मी उत्पादन निर्मिती न डगमगता चालू ठेवली. पुढील काळात देखील या ध्येयासाठी काम करणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.