सांगली : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे प्रस्तावित महत्त्वाकांक्षी ‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पासोबत तेथे सौरऊर्जा प्रकल्प उभारावा. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागांना सोबत घेऊन त्यावर पुढील कार्यवाही सुरू करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर त्याविषयी लवकरच अभ्यास सुरू होण्याची अपेक्षा आहे.
रांजणी येथील ‘ड्रायपोर्ट’च्या जागेचा तिढा जवळपास सुटत आला आहे. केंद्रीय पातळीवर त्याबाबत अंतिम प्रस्ताव आहे. त्याचा लवकरच करार होईल, असे संकेत मिळत आहेत. हा जिल्ह्याच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत असतानाच नवा पुणे ते बंगळूर हरित राष्ट्रीय महामार्ग, त्या लगत लॉजिस्टिक पार्क आणि ड्रायपोर्ट या संकल्पना आता आकाराला येण्याच्या टप्प्यावर आल्या आहेत. रांजणी येथे ड्रायपोर्ट झाल्यास ब्रॉडगेज रेल्वे, महामार्ग आणि कार्गो विमानतळ अशी तिहेरी दळणवळण व्यवस्था येथे उभी होणार आहे. त्यादृष्टीनेही तयारी सुरू आहे. या सगळ्या हालचालींमध्ये तेथील क्षेत्राचा वापर करून सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा नवा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यावर प्रारंभिक चर्चा झाल्याचे भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
तांत्रिक मुद्दा चर्चेत
प्राथमिक प्रस्तावानुसार, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अतिरिक्त जागा खरेदी करावी लागणार नाही, ही जमेची बाजू असेल. त्यात पॅनेल उभा करणे महत्त्वाचा भाग असेल. त्याचवेळी ती तयार झालेली वीज ग्रीडपर्यंत नेण्यासाठीची गुंतवणूक मोठी असेल आणि त्याची गुंतवणूक कशी उभारायची, असा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. त्याला पवन ऊर्जेसाठी तयार असलेल्या पायाभूत सुविधा वापरता येतील का, असा विषय समोर आला आहे. त्याची ‘सकाळ’ने खातरजमा केली. त्यात पवन ऊर्जा वाहून नेण्यासाठीची यंत्रणा ही त्याच्या क्षमतेनुसार आहे. त्यावर अतिरिक्त ताण देता येणार नाही. त्यामुळे सौरऊर्जा निर्मिती करायची असेल तर अर्थातच ती वाहून नेण्याचीही व्यवस्था करावी लागेल. तो कळीचा मुद्दा ठरू शकतो.
पवन ऊर्जा : सांगलीची ताकद
अपारंपरिक ऊर्जानिर्मिती हीच भविष्यात तारक ठरणार आहे. त्यात पवन ऊर्जा केंद्रस्थानी असून जिल्ह्यात ती ताकद ठरत आहे. सध्या जिल्ह्यात उभा राहिलेल्या पवनचक्क्यांची क्षमता दररोज एक हजार ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची आहे. वाऱ्याचा वेग किती आहे, यावर रोजची निर्मिती कमी-अधिक होते. जिल्ह्याची रोजची मागणी ५०० मेगावॅट असून, आणखी एका जिल्ह्याला पुरवठा होईल, एवढी वीजनिर्मिती आपण करतोय. त्यात सौरऊर्जेची भर पडल्यास वीज पुरवणारा जिल्हा म्हणून सांगलीची नवीन ओळख तयार होऊ शकेल.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी जत, कवठेमहांकाळ भाग आदर्श आहे. तेथे ऊर्जानिर्मिती उत्तम होईल. मात्र ती वीज पवन ऊर्जेसाठीच्या लाइनमधून नेणे शक्य नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागेल.
- धर्मराज पेटकर, अधीक्षक अभियंता, महावितरण
दुष्काळी भागातील रांजणीत सौरऊर्जा प्रकल्प उभा राहू शकतो आणि त्याचा अभ्यास करावा, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. ‘ड्रायपोर्ट’सोबत तो विषय पुढे आला तर कमी गुंतवणुकीत ते शक्य होऊ शकते.
- पृथ्वीराज पवार, भाजप प्रदेश सचिव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.