हवामान बदलाचा पशुपालनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दूध उत्पादनातील घट, आजारांचे वाढते प्रमाण, चाऱ्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक आहे.
सांगली : उन्हाचा पारा ४२ अंशांवर असल्यामुळे तसेच चारा, टंचाईच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांत दूध उत्पादनात (Milk Production) मोठी घट झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १८ लाख ६५ हजार ४९५ लिटर दूध संकलन होते. मे २०२४ मध्ये पहिल्या पंधरवड्यात सरासरी दूध संकलन १५ लाख २८ हजार लिटरपर्यंत घटले आहे.
चार महिन्यांत तीन लाख ३७ हजार ३५० लिटरनी घट झाली. दिवसाला गाय दूध (Cow Milk) दोन लाख लिटर प्रतिलिटर दर २५ रुपये आणि म्हैस दूध दीड लाख लिटर दर ५० रुपये दर धरला तरी दिवसाला सुमारे १.२५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जात होता. आता हाच व्यवसाय मुख्य झाला आहे. शेतीचे पैसे वर्षाला येणारे असतात; मात्र जनावरांच्या पैशांतून घर चालत असते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत; मात्र दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात चार महिन्यांपासून चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हवामान बदलाचा पशुपालनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दूध उत्पादनातील घट, आजारांचे वाढते प्रमाण, चाऱ्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक आहे. दुसऱ्या बाजूला पशुखाद्य, चाऱ्याचे वाढते दर आणि घसरलेल्या दूध दरामुळे पशुपालकांचे अर्थकारण बिघडले आहे. हवामान बदलामुळे गाय, म्हैस दूध उत्पादनात सातत्य ठेवत नाहीत. हवामान बदलाचा परिणाम पिके उत्पादन, पाणीटंचाई, मानवी आरोग्यापुरता मर्यादित न राहता पशुपालनावर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. खाद्य दर, कमी होणारा दूध दर यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत आहे.
दहा वर्षांतील तापमानातील वाढ, तसेच हिवाळ्यातील कडाक्यामुळे गाईमध्ये ताण दिसतो. पशुखाद्याचे ५० किलोचे पोते एक हजार ६५० रुपयांना झाले आहे. दर सहा महिन्यांनी ५० रुपये वाढ आहे. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुधाचा दर सध्या गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर मिळतोय. या दरात उत्पादन खर्च निघणे मुश्कील आहे. व्यवस्थापनाचा खर्च लक्षात घेता प्रतिलिटर दुधाला ४० रुपये दर मिळाला तर कोठे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल.
कमाल आणि किमान तापमानात १२ अंशांपेक्षा अधिक फरक पडल्यास मोठ्या प्रमाणात दूध घटते. ते घटू नये यासाठी गोठ्यात खेळती हवा ठेवा. जास्त खिडक्या असाव्यात. जनावरांना दररोज दिवसा अंघोळ घालावी. जनावरांना पुरेसे आणि दिवसातून तीन-चार वेळा थंड पाणी द्यावे. पाण्यात थोडे मीठ आणि मैदा टाकून जनावरांना द्यावे. शक्य असल्यास जनावरांना सकाळ-संध्याकाळ चारायला पाठवावे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहील.
-भुवनेश्वरकुमार बोरकर, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, मिरज.
१०६ ते १०८ अंश फॅरनहाईट इतका ताप.
जनावरे सुस्त होऊन खाणे-पिणे बंद करतात.
उष्माघातामुळे जनावरांच्या तोंडात जीभ चिकटते.
त्यांना नीट श्वास घेणे कठीण होते. जनावरांच्या तोंडाभोवती फेस येतो.
उष्माघातामुळे जनावरांचे डोळे व नाक हे लाल होतात.
अनेकदा जनावरांच्या नाकातून रक्त येऊ लागते. हृदयाचे ठोके जलद होतात.
जनावरांना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात, डबक्यात ठेवून थंड पाणी शिंपडावे.
जनावरांच्या अंगावर बर्फ किंवा अल्कोहोल चोळावे.
कांदे आणि पुदिना यापासून तयार केलेला अर्क जनावरांना खायला द्यावा.
जनावरांना थंड पाण्यातून साखर, भाजलेले बाली आणि मीठ यांचे
मिश्रण द्यावे.
या उपायांनंतरही जनावरांना आराम मिळत नसेल तर तातडीने
डॉक्टरांशी संपर्क साधावा.
नोव्हेंबर २०२३ १३ लाख ८८ हजार २५९
डिसेंबर २०२३ १४ लाख ८० हजार ६४७
जानेवारी २०२४ १८ लाख ६५ हजार ४९५
फेब्रुवारी २०२४ १७ लाख ५५ हजार ३९४
मार्च २०२४ १६ लाख ८४ हजार ४७४
एप्रिल २०२४ १५ लाख ७८ हजार १४५
मे २०२४ १५ लाख २८ हजार (सुमारे)
(स्त्रोत- पशुसंवर्धन विभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.