सोलापूर : शाळा, महाविद्यालयांबाहेरील रोडरोमियोंवर कारवाई करण्यासाठी व मुलींचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्तालयाने 16 दामिनींची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून ऑगस्ट ते 7 डिसेंबरपर्यंत दामिनींनी शहरातील विविध भागातील 204 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयातील मुलींना स्वरक्षणाचे धडेही दिले जात आहेत. घरातून निघालेली मुलगी अथवा महिला शाळा अथवा महाविद्यालयात सुरक्षित पोहचावी, रोडरोमियोंसह अन्य गुन्हेगारांवर वचक बसावा या उद्देशाने शाळा, महाविद्यालये परिसरात दामिनी पथकाने गस्त वाढविली आहे.
हेही वाचाच...फेसबूकवरुन बुलेट खरेदी पडली महागात
पाच महिन्यांत 204 जणांवर कारवाई
शहरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगार, रोडरोमियो यांच्यावर कारवाईसाठी दामिनी पथक सज्ज झाले आहे. ऑगस्ट ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील 204 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपुरे मनुष्यबळ असतानाही दामिनी पथकाने केलेल्या या कामगिरीचे पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी कौतूक केले आहे. जोडभावी पोलिस ठाणे, विजापूर नाका व सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने आता त्याठिकाणी दामिनी पथकाने गस्त वाढविली आहे.
हेही वाचाच...कांदा तेजीतच...पण वाचा आणखी किती दिवस राहणार
शाळा अन् महाविद्यालयातील मुलींना स्वरक्षणाचे धडे
मागील दोन महिन्यांत दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. शहरातील श्राविका प्रशाला, देवराज प्रशाला, वसुंधरा महाविद्यालय, लोकसेवा हायस्कूल, पी. एस. इंग्लिश मिडिअम, संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकूल, गांधीनाथा प्रशाला, ज्ञानसागर प्रशाला, दयानंद आसावा, सिध्देश्वर प्रशालेला दामिनींनी भेटी दिल्या. तेथील मुलींना स्वरक्षणाचे धडेही दामिनी पथकाने दिले. त्यामध्ये दामिनी पथकाच्या प्रमुख ज्योती कडू, एन. एस. इमडे, जे. एन. शेरखाने, एस. जे. काटे, बी. एम. गुंड, एम. आर. नारंगकर, आर. व्ही. सोनवणे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचाच...असा उखाणा तुम्ही ऐकलाय का
मुलींनो हे नंबर सेव्ह करा...
पोलिस आयुक्तालयातील 0217-2744620 व 0217-2477600 आणि महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 हे क्रमांक प्रत्येकांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवावा. अडचणीच्या वेळी या क्रमांकावर कॉल केल्यास दामिनी पथकातील कर्मचारी काही वेळात संबंधित ठिकाणी हजर होतील, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक ज्योती कडू यांनी केले आहे.
हेही वाचाच...पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन : आमदार राम सातपुते
10 जणांच्या नियुक्तीचे आदेश
शहरातील मुली अन् महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तत्पर आहे. दामिनी पथकात आता नव्याने 10 जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. शहरातील कोणत्याही भागात अडचण वाटल्यास संबंधितांनी दामिनी पथकाला संपर्क करावा. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल.
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर
मुलींना स्वरक्षणाचे धडे
दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले जात आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांबाहेर दामिनी पथकाचे क्रमांक लावण्याचे नियोजन असून प्रत्येक मुली व महिलांना अडचणीवेळी संपर्क करण्याचे क्रमांक मोबाईलमध्ये ठेवायला सांगितले आहे. पोलिस आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे काम उत्तमपणे चालू आहे.
- ज्योती कडू, सहायक पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा कक्ष, सोलापूर
|