सातारा - येथील विसावा नाका परिसरातील माने हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या भागात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे काविळीची साथ सुरू झाली आहे. या संदर्भात स्थानिकांना सातारा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन दिले असून पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येथील विसावा नाक्यानजीक माने हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस काही बंगल्यांसह मानसी डुप्लेक्स, महावीर अपार्टमेंटसह अनेक घरे आहेत. हा भाग सातारा नगरपालिकेच्या हद्दीत येतो. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तेथे पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागात गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती आजारी आहे. त्यातील काहींना काविळीची साथ झाल्याचे समोर आले आहे. ही कावीळ ‘ई’ या प्रकारातील असून या काविळीच्या साथीतून गंभीर आजार होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा करून दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला. पण, त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे दूषित पाण्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. या प्रश्नाची दखल घेण्यासाठी स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन दिले आहे. त्यात दूषित पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यात येत्या चार दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती सातारा नगरपालिका, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर, सौ. काळोखे व शेखर मोरे यांना देण्यात आल्या आहेत.
सर्वांकडूनच टोलवाटोलवीची उत्तरे
विसावा नाका परिसरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार स्थानिकांनी नगरसेकांच्यासमोर मांडला. त्यावेळी त्या नगरसेवकांनी ‘आमचे पालिकेत कोणी ऐकत नाही,’ असे उत्तर दिले. सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापतींना विचारले असता त्यांनीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवले. काविळीची साथ पसरत असताना स्थानिक नगरसेवकांनी दिलेल्या उत्तराने अनेकांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.