‘राजारामबापू’ व हुतात्मा सहकारी साखर कारखाना, किर्लोस्करवाडीचा औद्योगिक कारखाना या ठिकाणी अनेकांना रोजगार मिळाला.
नवेखेड : रोजगाऱ्यांचे गाव ते संपन्न गाव असा अनोखा प्रवास वाळवा तालुक्यातील नवेखेडने जिद्द, कष्टाने केला आहे. पहिले डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) गणपत खेडकर यांनी १९६० च्या दशकात या गावाची ओळख कुस्तीतील आपल्या कामगिरीने राज्यभर केली. अवघे सुमारे १२०० एकरच्या जवळपास जमीन क्षेत्र. त्यातील ७५ टक्के कोरडवाहू होते. जेमतेम उत्पन्न मिळे. एकर- दोन एकर जमीन असणारा शेतकरी मोठा. त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत. उर्वरित बहुतांश गावकरी रोजगार करीत. शेतीकामाबरोबर विहीर खोदणे हे मुख्य काम असायचे. मुलीबाळींच्या लग्नासाठी जमीन गहाण ठेवावी लागे.
सन १९६० च्या दरम्यान गावात कृष्णा नदीतून (Krishna River) सिंचन व्यवस्था सुरू झाली. सिमेंट पाईपलाईन व इंजिनद्वारे पाणी ओढणे, असे स्वरूप होते. नदीपासून जवळ असणाऱ्या क्षेत्रात हे प्रयोग यशस्वी झाले, तरी उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडे. पुढे, नागठाणे बंधारा झाला. खऱ्या अर्थाने हरित क्रांतीला सुरवात झाली. छोट्या-मोठ्या उपसा सिंचन योजना झाल्या. अनेकांनी स्वतंत्र योजना केल्या. नगदी पीक म्हणून ऊस मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ लागला. जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय वाढला. खासगी गवळी जाऊन दूध संकलन संस्था आल्या.
‘राजारामबापू’ व हुतात्मा सहकारी साखर कारखाना, किर्लोस्करवाडीचा औद्योगिक कारखाना या ठिकाणी अनेकांना रोजगार मिळाला. या संस्था गावच्या विकासात मैलाचा दगड ठरल्या. लोकांची आर्थिक स्थिती सुधारली. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनी शेतीत वेगळे प्रयोग करून उत्पन्न वाढवीत प्रगती साधली. महिला मजुराला सहा रुपये व पुरुषांना १० रुपये मजुरी मिळे.
अनेकांनी मजुरी करत एक काळ घालवला. मात्र आजघडीला त्यांचा रोजगार थांबला. त्यांची प्रगती झाली. मुले चांगली शिकून अनेक ठिकाणी नोकरी- व्यवसायात स्थिरावली. त्यातूनही अनेक कुटुंबांची प्रगती झाली. अनेक टुमदार बंगले गावात उभे राहिले आहेत. वाढीव गावठाण म्हणून गावाशेजारील शेतजमिनी निवासी कारणासाठी वापरात आल्या.
एके काळी फुफाट्याचा रस्ता व पावसाळ्यात गुडघाभर चिखल असणाऱ्या ठिकाणी आखीव-रेखीव रस्ते व गटारे झाली. ‘कार्पोरेट लूक’ असणारी ग्रामपंचायत, मध्यवर्ती सभामंडप अशी विकासाची पहाट उगवली आहे. मास्टर प्लॅन असणारे नवेखेड अधिकच सुंदर वाटू लागले. गावाने मोठ्या कष्टाने रोजगारी गावाचा शिक्का पुसला. पूर्वीपासून असणारी सातवीपर्यंतची मराठी शाळा नवे रुपडे लेऊ लागली आहे. माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून स्थानिकांनी माध्यमिक विद्यालय स्थापन करण्याचा प्रयोग केला. मात्र तो अल्पकाळात थांबला. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्याने तो पूर्णत्वास गेला. शाळेची सुंदर इमारत आकारला आली आहे.
गावात दोन राजकीय गट आहेत. निवडणुकीचा कालावधी सोडला तर इतरवेळी विकासासाठी सर्वजण एकत्र असतात. युवा पिढी राजकारणात सक्रिय आहे. अनेकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवीत गावचे नाव उंचावले आहे. अनेक युवक सामाजिक कामात अग्रेसर आहेत. ग्रामदैवत भैरवनाथ, देवाचा भक्तीचा जागर मोठ्या श्रद्धेने लोक करतात. विविध संप्रदायांची परंपरा आहे. चैत्री वारीला ४५ वर्षांची परंपरा आहे. दख्खनचा राजा जोतिबा येथील अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
एकेकाळी डोक्यावर धान्य घेऊन बाजारासाठी इस्लामपूर, वाळवा, बोरगाव येथे पायी जावे लागे. जवळचे विकावे व प्रापंचिक साहित्य खरेदी करावी, अशी स्थिती होती. आता गावात किराणा, मेडिकल, पानटपरी, बझार, बेकरी, मंगल कार्यालय, शैक्षणिक अकॅडमी अशी रेलचेल आहे. ग्राहकांची आर्थिक गरजा भागवणारी नवेखेड सोसायटी त्यांचा आधार बनली आहे. महिला घराच्या चार भिंतीमधून बाहेर पडल्या आहेत. बचत गट चळवळ जोमात सुरू झाली. आजघडीला तीस बचत गट कार्यरत आहेत. पूर्वीपासून दोन, तीन, चार, पाच भावांची एकत्र कुटुंबपद्धती होती. ती कमी झाली तरी काही ठिकाणी मात्र काही कुटुंबांत अद्यापही टिकून आहे.
विकासाची कात टाकत असताना गावात आमूलाग्र बदल झाले. त्याचवेळी माणसामाणसांतील जिव्हाळा कमी झाला. एकमेकांबद्दल कटुता वाढली. ही वस्तुस्थिती आहे. युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. ती अनेक कुटुंबांची डोकेदुखी ठरत आहेत. स्पर्धा परीक्षा, भरती आदी सराव करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षित तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.
पहिले डबल महराष्ट्र केसरी गणपत खेडकर यांनी १९६० चे दशक गाजवले. ज्या तालमीमुळे ते घडले ती तालीम नव्याने उभारून युवकांमध्ये पुन्हा व्यायामाची आवड पुन्हा निर्माण आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात गाव मागे आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मुळात कमी असणाऱ्या लागवडीखालील क्षेत्रात क्षारपड जमिनीचा धोका गावात वाढत आहे. ठोस काम करावे लागेल अशी स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.