Vittal Idol Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : अधिकाऱ्याच्या मुलाकडून विठ्ठलास दुग्धाभिषेक; व्हिडिओ व्हायरल

नव्याने विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले राजेंद्र शेळके एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - नव्याने विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले राजेंद्र शेळके एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या मुलाच्या हातून देवाला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. अभिषेक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर विठ्ठलाची पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, मुलाच्या हस्ते करण्यात आलेल्या विठ्ठलाच्या अभिषेकावर वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज यांनी आक्षेप घेत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता वारकरी विरुद्ध मंदिर प्रशासन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

बडवे उत्पातांचे मंदिरातील पूजाअर्चा करण्याचे अधिकार संपुष्टात आल्यानंतर देवाच्या विविध पूजा मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जातात. महत्त्वाच्या पूजा मंदिर समितीचे अधिकारी आणि सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक केल्या जातात.

अलीकडेच आषाढी यात्रा पार पडल्यानंतर विठ्ठल- रुक्मिणीची प्रक्षाळपूजा झाली. ती पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. पूजा करण्याचे अधिकार मंदिर समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि सदस्यांना असताना कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या मुलाकडून देवाला अभिषेक घालण्यात आल्याचा मंदिरातील पूजेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

त्यानंतर देवाची पूजा करण्याचा मान अधिकारी पुत्राला कोणी दिला? याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अधिकाऱ्याच्या पुत्राने अभिषेक केल्याचे समोर आल्यानंतर वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज यांनी आक्षेप घेत, देवाचा अभिषेक करण्यासाठी आता आम्हाला अधिकाऱ्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागेल का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच शेळके यांची दिलगिरी

समाज माध्यमात माझ्या मुलाचा विठ्ठलाचा अभिषेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हा प्रक्षाळपूजेचा आहे. त्यावर काही भक्त व महाराज मंडळींनी आक्षेप घेतला आहे. हा व्हिडिओ ७ जुलै रोजी प्रक्षाळपूजेचा आहे.

सहअध्यक्ष आणि सदस्यांनी रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे अधिकार दिले होते. त्या दिवशी सहकुटुंब पूजा केली होती. ही पूजा करत असताना माझ्या मुलाने विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन सोवळे घालून व देवाचे पावित्र्य राखून अभिषेक केला होता. यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.

व्हिडिओ व्हायरल कोणी केला, याची चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल. माझ्या मुलाने अभिषेक केल्याने भाविक आणि महाराज मंडळींच्या भावना दुखावल्या असतील तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला.

...अधिकाऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागेल

विठ्ठलाची नित्य पूजा करण्यासाठी सर्वसामान्य भाविकांना मंदिर समितीला २५ हजार रुपयांचे देणगी शुल्क द्यावे लागते. तरीही लांबूनच देवाची पूजा बघावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना विठ्ठलाला दुग्धाभिषेक करण्यासाठी आता अधिकाऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागेल.

अधिकारी पुत्राला देवाचा अभिषेक करण्यास कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी पाईक संघाचे सचिव रामकृष्ण वीर महाराज यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT