सातारा : हवापालटाच्या नादात संचारबंदीचा आदेश डावलून महाबळेश्वरला आलेल्या उद्योजक वाधवान कुटुंबीयांना 14 दिवस क्वारंटाईनची हवा खायला लागली. त्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे आता त्यांची सुटका होणार, की पुन्हा सीबीआय किंवा ईडीच्या ताब्यात जावे लागणार.... नेमके यांचे काय होणार वाधवान कुटुंबीयांचे असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाबंदीही आहे. कोणाही नागरिकाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय जायला मनाई आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबियातील नऊ सदस्य गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या पत्राच्या मदतीने लोणावळ्यातून प्रवास करत आठ एप्रिलला रात्री महाबळेश्वरात मुक्कामी आले होते. त्यामध्ये त्यांच्यासोबत 14 नोकरांचाही ताफा होता. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ एप्रिलला वाधवान कुटुंबियांना पाचगणतील सेंट झेविअर हायस्कुलमध्ये क्वारंटाईन केले होते. तसेच त्यांच्यावर जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज (बुधवारी) दुपारी दोनला वाधवान कुटुंबियांच्या क्वारंटाईनची मुदत संपत आहेत. वाधवान कुटुंबातील काही सदस्यांची सीबीआय व ईडीकडूनही चौकशी सुरू असल्याची माहिती दरम्यानच्या काळात समोर आली होती. त्यानुसार त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रीया करण्याबाबतचा पत्रव्यवहार साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सीबीआय व ईडीच्या कार्यालयाशी केलेला आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी कडक नियम असताना हायप्रोफाईल वाधवान कुटुंबीयांना सूट कशी मिळते याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात झाली होती. त्यामुळेच क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतर वाधवान कुटुंबीयाचे काय होणार याकडे जिल्ह्याचे तसेच राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. या वाधवान कुटुंबीयातील काही सदस्य सुटून मुंबईला जाणार की, सीबीआय किंवा ईडीच्या ताब्यात जाणार याचीही उत्सुकताही लोकांना आहे.
याबाबत विचारल्यावर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ""वाधवान कुटुंबीयांच्या क्वारंटाईनच्या मुदतीबाबत जिल्हाधिकारी आज (बुधवार) निर्णय घेतील. त्यानंतर जिल्हाबंदीचा आदेशाच्या गुन्ह्यामध्ये पोलिस त्यांना ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडतील.'' सीबीआय व ईडीच्या कार्यवाहीबाबत विचारले असता, "आम्ही पत्रव्यवहार केला आहे, काय प्रक्रिया करायची याचा ते निर्णय घेतील,' असे त्या म्हणाल्या.
मिडीया ट्रायलच्या माध्यमातून वाधवान कुटुंबीयांनी फार मोठ काही तरी केल्याचे संपूर्ण राज्यभर गेले आहे. त्यातून अनेकांना ते आता कारागृहातच जातील किंवा गेले पाहिजे असे वाटू लागले आहे. पण, मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या स्टेटमेंटवरून राज्य यंत्रणा आपल्या गळ्यातील "वीणा' शिताफीने केंद्रीय संस्थांच्या गळ्यात घालण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे. वाधवान कुटुंब महाबळेश्वर येथे आल्यावर भाजपने यामगे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे बडे नेते असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून लोकभावना राष्ट्रवादीच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न झाला. वाधवान यांच्या सुटकेनंतर ते होऊ नये आपली मान बाजूला निघावी यासाठीच सीबीआयला आम्ही त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वाधवान सुटले, तर साहजिकच ते सीबीआय किंवा ईडीने काही न केल्याने सुटले असे चित्र निर्माण होणार आहे. त्याला कायदेशीर कारणही तसेच आहे. कायद्यातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, क्वारंटाईनची मुदत संपल्यावर जिल्हा प्रशासन त्यांना जबरदस्तीने जादा काळ ठेवू शकत नाही. महाबळेश्वर येथे त्यांचे घर आहे. त्यामुळे ते तेथे राहू शकतात. राहिला मुद्दा त्यांच्या अटकेचा.
सातारा येथील वकील राजेंद्र गलांडे म्हणाले, ""जिल्हा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा एकदम गंभीर स्वरूपाचा नाही. या गुन्ह्यामध्ये चार पर्याय आहेत. पहिला म्हणजे त्यांना अटक न करता पोलिस थेट न्यायालयात दोषारोपपत्र सादर करू शकतात, न्यायालय वाधवान कुटुंबीयांना नोटीस काढून खटल्याची कार्यवाही सुरू करू शकते. दुसर म्हणजे दाखल असलेला गुन्हा हा जामिनपात्र आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांनी कायदेशीर तरतूदीनुसार जामिनाची मागणी केली तर, पोलिस ठाण्यातही त्यांना जामिन मिळू शकतो. तिसरे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले तरीही जामिनपात्र गुन्हा असल्याने वाधवान कुटुंबीयांना जामिन मिळू शकतो. चौथी बाब म्हणजे वाधवान कुटुंबीय थेट न्यायालयातही जामिनासाठी अर्ज करू शकतात, गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यांना तो थेटही मिळू शकतो. या एकंदर पर्यायांचा विचार करता राज्य पोलिस वाधवान कुटुंबीयांना कोणत्याही परिस्थिती अटक करून कारागृहात पाठवू शकत नाहीत. त्यामुळे मुद्दा रहातो तो सीबीआय व ईडीच्या कार्यवाहीचा. त्यांना तपासात अटकेची आवश्यकता असली तरच ते तशी प्रक्रिया राबवू शकतात. त्यांनी अटकेची प्रक्रिया केली नाही तरीही सीबीआय व ईडी या केंद्रीय संस्था असल्याने विरोधकांनी किंवा अन्य कोणी हा मुद्दा उचलून धरला तरी तो राज्य सरकारच्या अंगलट येणार नाही याची व्यवस्था गृहमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून केली आहे. त्यामुळे क्वारंटाईनीची हवा खाल्ल्यानंतर वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरातील आपल्या घरात राहतात, की आणखी कोठे जातात हे पाहावे लागणार आहे.
EXCLUSIVE :: अमिताभ गुप्तांवरील कारवाई थातूरमातूर! AIS - D&A नुसार निलंबन शक्य!
सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई
कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.