water discharge of 1 5 lakh cusecs from Almatti  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : सांगली, चिक्कोडी भागातील पूरस्थिती टाळण्यासाठी आलमट्टीतून दीड लाख क्युसेकने विसर्ग

Sangli Latest News In Marathi | कर्नाटकने फार वाट पाहून विषाची परीक्षा न घेता गरजेनुसार विसर्ग वाढवावा, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे. वेळकाढूपणा नको, अशी सूचनादेखील केली आहे. कोयना धरणातील साठा ५६.८४ टीएमसी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : शनिवारी महाराष्ट्राच्या विनंतीनुसार आलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक इतका सुरू केलेला विसर्ग रविवारी (ता. २१) आणखी वाढवण्यात आला. रविवारी दोन टप्प्यांत हा विसर्ग वाढवत तब्बल दीड लाख क्युसेक इतका केला आहे.

महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात व सांगली, कोल्हापूर, चिक्कोडी भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांतून वाहून येणारे पाणी वाढले आहे. परिणामी सांगली, चिक्कोडी भागातील पूरस्थिती टाळण्यासाठी आलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात येत आहे.

सांगली पाटबंधारे विभागाने शनिवारी विनंती केल्याने विसर्ग वाढविला होता. रविवारी पुन्हा आवक वाढल्याने आलमट्टी धरण प्रशासनाने सकाळी व दुपारी अशा दोन टप्प्यांत एक लाखावरून दीड लाख क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

कृष्णेसह इतर नद्यांच्या पाण्याचा प्रवाह वाढत आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता आलमट्टीत १ लाख २३ हजार ४४५ क्युसेक पाणी येत होते. त्यामुळे पुन्हा विसर्ग वाढविला. शनिवारी ६५ हजार क्युसेक आवक असताना, पाणी पुन्हा अधिक येण्याची शक्यता गृहीत धरून सांगली पाटबंधारे खात्याच्या विनंतीनुसार शनिवारी संध्याकाळी एक लाख क्युसेक विसर्ग केला होता.

त्यानंतर पाणी अधिक येत असल्याने व धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्याने रविवारी दुपारी १२ वाजता एक लाखावरून १ लाख २५ हजार क्युसेक विसर्ग केला. तर आवक पाहून व पूरस्थिती नियंत्रणासाठी म्हणून दुपारी अडीच वाजता पुन्हा २५ हजारांने विसर्ग वाढवून दीड लाख केला संध्याकाळी सहापर्यंत आलमट्टी सव्वा लाख आवक तर दीड लाख विसर्ग ठेवण्यात आला आहे.

गेल्या चार दिवासांपूर्वीच धरण शंभर टीएमसीपर्यंत भरले होते; पण पाऊस वाढल्याने व पाणी अधिक येत असल्याने आवकेपेक्षा अधिक विसर्ग केल्याने धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. पाणी वाहून आल्यावर पुन्हा धरण भरू शकते, या हिशेबाने सध्या विसर्ग वाढविला आहे. धरणात रविवारी संध्याकाळी ९५.८९० टीएमसी साठा (७७.९० टक्के) झाला आहे.

‘पाटबंधारे’कडून कर्नाटकशी संपर्क

कर्नाटकने फार वाट पाहून विषाची परीक्षा न घेता गरजेनुसार विसर्ग वाढवावा, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे. वेळकाढूपणा नको, अशी सूचनादेखील केली आहे. कोयना धरणातील साठा ५६.८४ टीएमसी झाला आहे.

हे कृष्णा नदीकाठासाठी जमेची बाजू आहे. धरणातून अद्याप विसर्ग सुरू केलेला नाही. चांदोली २५ टीएमसी भरलेले आहे. त्यातून १५९२ क्युसेक विसर्ग आहे. सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, कोल्हापूर जिल्ह्यात यलो अलर्ट तर सांगलीत ग्रीन अलर्ट आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण समितीने आलमट्टीचा विसर्ग तीन लाखांपर्यंत न्या, अशी सूचना केली आहे. कोयना भरले नसले तरी आलमट्टी भरून घेण्याचा कर्नाटकचा अट्टहास चांगला नाही. घाई अडचणीची ठरू शकते.

कोयनेतून विसर्ग करावा लागला, कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला तर आलमट्टीतून एकावेळी तीन लाखांवर विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी पुढील क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी ते तसा निर्णय घेऊ शकणार नाहीत.

आताच विसर्ग वाढवून स्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, सर्जेराव पाटील, सुयोग व्हावळ यांनी केली आहे. सांगली पाटबंधारे विभागाने या स्थितीत कर्नाटक पाटबंधारे विभागाशी कागदोपत्री व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसे होताना दिसत नाही. हा हलगर्जीपणा पाटबंधारे विभागासाठी अडचणीचा ठरू शकतो, असा इशाराही समितीने दिला आहे.

दोन्ही राज्यांकडून अधिकारी नियुक्त

महाराष्ट्र पाटबंधारे विभागाच्यावतीने आलमट्टीत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे आवक व जावक याची माहिती नियमित आणि योग्य मिळावी, यासाठी काही वर्षांपासून अधिकारी नियुक्त केले जात आहेत. कोयना धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे व पाण्याचे नियोजन घेण्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोयनेसाठी नियुक्त केले आहेत. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणासाठी समन्वय राखला जात आहे.

‘हिप्परगी’चे सर्व २२ गेट उचलले

हिप्परगी धरणाचे सर्व २२ गेट शनिवारी सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे फुगवटा कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. सध्या राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकच्या हद्दीत सध्या ८६ हजार क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. तो ९० हजारांवर गेला, तर आलमट्टीला २५ हजाराने विसर्ग वाढवावा लागेल, अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे.

कर्नाटक पाटबंधारेचे वरिष्ठ अधिकारी हिरेगौडार यांच्याशी सायंकाळी संवाद झाला. महाराष्ट्रातील स्थितीची माहिती देण्यात आली. स्थिती नियंत्रणात आहे तोवर योग्य निर्णय घ्या, अशी विनंती केली. त्यांनी गरजेनुसार विसर्ग वाढवला जाईल, असे सांगितले आहे.

- चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT