नगर : जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार, तसेच परिसर "रेड लाइट एरिया' बनला आहे. चेहऱ्याला स्कार्फ बांधून परिसरात उभ्या राहणाऱ्या "त्या' महिलांमुळे ही "आफत' आली आहे. "त्या' महिलांच्या अवतीभोवती अनेक टपोरी फिरत असतात. आता त्यांची वाकडी नजर जिल्हा परिषदेत येणाऱ्या महिलांवर पडली आहे. महिला कर्मचाऱ्यांनाही छेडछाडीचा त्रास व्हायला लागला आहे. जिल्हा परिषदेत आलेल्या एका महिलेला छेडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. मदतीला रखवालदार धावल्याने तिची सुटका झाली.
जिल्हा परिषदेच्या परिसरात देहव्यापार करणाऱ्या महिला रात्रीच नव्हे, तर दिवसाही थांबलेल्या असतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही जण घुटमळत असतात. पोलिसांकडून त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. त्या परिसरात थांबणाऱ्या सर्वच महिलांकडे येणारे-जाणारे पुरुष "त्या' नजरेने पाहतात. हे "अवघड' दुखणे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये तालुक्याच्या ठिकाणांहून कामानिमित्त येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची कामे सायंकाळी पाचच्या आत करून त्यांना घरी जाऊ द्यावे, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्यामुळे हा निर्णय झाला होता. मात्र, या निर्णयाचे सर्रास उल्लंघन होत आहे.
हेही वाचा ः विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्त एक महिला आली होती. ती सायंकाळी गावाकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर उभी होती. तिच्याकडे पाहून काही टपोरी जवळ आले. त्यांनी तिला इशारे करायला सुरवात केली. संबंधित महिला घाबरली. ती पुन्हा आतमध्ये पळाली. ही बाब तेथे नियुक्तीला असलेल्या वॉचमनच्या निदर्शनास आली. त्याने हातात काठी घेत त्या तरुणांना पिटाळून लावले, तेव्हा कुठे ती महिला बसस्थानकाकडे सुखरूप गेली.
कडक कारवाई करणार ः कार्ले
मुख्यालयात येणाऱ्या महिलांना जर सायंकाळी पाचनंतर थांबविल्याचे प्रकार निदर्शनास आले, तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. मग तो अधिकारी कितीही मोठा असला, तरी आपण त्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊ.
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.