सातारा - मराठी माध्यमातून आमच्या तिघांचे शिक्षण झाले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमचे शाळेवर नितांत प्रेम आहे. शिक्षकांनी आम्हाला घडविले असून, आयुष्यात कोठेही गेलो तरी त्यांना मान देत राहू, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, भरत जाधव व पुष्कर श्रोत्री यांनी काढले.
राज्य शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षकांना सुखद धक्का देण्यासाठी या तिघांची कार्यक्रमातील उपस्थिती गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीने शिक्षक सुखावले. त्यांनी शालेय जीवनातील गप्पा मारत शिक्षकांशी संवाद साधला. श्री. बांदेकर म्हणाले, ""आम्ही ज्या स्थितीला आहे, त्यामागे मराठी शाळेतील शिक्षकांनी दिलेले संस्कार आहेत. मराठी शाळेत शिकलो म्हणून आयुष्यात कधीच कोणतेही नुकसान झाले नाही. विधाते सर मला म्हणायचे तू जेथे जाशील तेथे इतिहास रचशील, ते खरेही झाले. शिक्षकांचा हात मायेचा, आश्वासन व विश्वासपूर्ण होता.''
भरत जाधव म्हणाले, 'शाळेत कच्चा असलो, तरी त्या वेळी शिक्षकांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्याच ताकदीवर माझे इंग्रजीविनाही कोठे अडत नाही. योग्य वयात शिक्षण, संस्कार, खेळ मिळाले पाहिजेत. मी वर्गात स्वच्छतामंत्री असल्याने कुलकर्णी सर माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहायला मला आवडते. माझ्याकडे पाहून आता त्यांची कॉलर टाइट होते.''
श्री. श्रोत्री म्हणाला, 'शाळेत शिकविलेले तुमच्याबरोबर आयुष्यभर राहते. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च स्थान हे शालेय शिक्षणाला आहे.''
'डेंजर'चं "धनगर' वाचलं
अभिनयात मास्टर असणाऱ्या भरत जाधवने शाळेत "ढकल स्टार्ट' असल्याचे सांगितले. पाचवीत असताना माझ्यासाठी शिक्षक हिटलरच वाटायचे. त्यांचा तास म्हणजे त्रास वाटायचा. एकदा इंग्लिश वाचण्यास सांगितले असता मी "डेंजर'ऐवजी "धनगर' असे वाचले होते. शिक्षकांनी खेडू फेकून मारला. पुढे खडू झेलण्याचा माझा सरावच झाला, असा किस्सा, तसेच "गुणिले भागिले, बाकी काय राहिले, वर्गात जे जे शिकविले ते ते परीक्षेत लिहिले, तरी पण आम्ही नापास कसे झालो,' असे गाण्याच्या बोलात भरत जाधवने सांगताच सभागृहात हशा पिकला.
सातारा - राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बुधवारी शालेय जीवनात गप्पा मारताना आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव.
|