फलकांवर महापालिका काहीच कारवाई करत नाही, चिरीमिरी दिली, की अधिकारी हात लावत नाही. हे जरी खरं असलं तरी लोकप्रतिनिधी काहीच कशी जबाबदारी घेत नाहीत?
फलकांवर महापालिका काहीच कारवाई करत नाही, चिरीमिरी दिली, की अधिकारी हात लावत नाही. हे जरी खरं असलं तरी लोकप्रतिनिधी काहीच कशी जबाबदारी घेत नाहीत? आपल्या वाढदिवसानिमित्त फलक लावू नका रे... असं आपल्या चेल्यांना ते का सांगत नसावेत. फलक हटवा असा विषय महापालिकेतील एकाही सभेच्या पटलावर आजवर का आला नसेल. सगळीकडेच अनागोंदी कारभार... पण हे असं कसं चालेल? यावर विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था व सामान्य नागरिकांची एकजूट गरजेची आहे.
सलग लांबीचे प्रशस्त रस्ते, मोठे चौक, दुहेरी अनेक उड्डाणपूल, सार्वजनिक बस वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग, शहराच्या कोणत्याही एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी विनाअडथळा लागणारा कमीतकमी वेळ....अशी अनेक वैशिष्टे सांगता येतील असे हे शहर आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षात फलकांचा सुळसुळाट झाला. शहरात कोणत्याही दिशेने आत या. एकवेळ त्या भागाचे नाव दिसणार नाही, पण जाहिरात फलकांची गर्दी दिसेल. मुख्य चौक, रस्ते, सार्वजनिक मैदान-उद्यानांचा परिसर...पहाल तिकडे फलक. इतके सुंदर शहर, पण आपण त्याला बाधा आणतो आहोत हे कोणच कसे काय लक्षात घेत नाही. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त तर फलक उभारणीला ऊत येतो. एकवेळ गाव तिथे एसटी हे घोषवाक्य खोटं ठरेल, पण नेत्यांच्या सुंदर-सुंदर पोझमधले मोठाले फलक लहान लहान रस्त्यांवरही दिसतील. बरं वाढदिवसाच्या आधी लावलेले हे फलक उना पावसात छबी काळवंडली तरी उतरवले जात नाहीत. कधीतरी सोसाट्याचा वारा येतो. मग बिनधडाचे मुंडके हवेत हलत राहते. मात्र, नेत्यांची संख्याच इतकी भरमसाट आहे की, असा एकही महिना विनावाढदिवसाचा नाही. काही वाढदिवसांचा योग तर सलग तारखांचा आहे. म्हणजेच शहरवासीयांच्या मानगुटीवर दररोज नवा दिवस, नवा नेता बसलेला असतो. हाच आदर्श मग कार्यकर्ते ते थेट गावगुंडांपर्यंत पोहोचला असून फलकांचा वापर दहशत पसरविण्यासाठी होवू लागला आहे.
सोन्याचे दागिणे अक्षरशः पांघरलेल्यांना फलकावर पाहताना सर्वसामान्य माणसांच्या उरात धडकी भरते. नेता एक आणि शुभेच्छूक असंख्य असतात. यापैकी कितीजणांना आपल्या आईवडिलांचे वाढदिवस माहीत असतील. फलक केवळ वाढदिवसाचे नसतात. निधन, दशक्रिया, प्रथम पुण्यस्मरण...हे केवळ माणसांविषयी नाही तर बैल, श्वानांचेही फलक लागतात. सगळे काही हास्यास्पद. मात्र, कोणालाच काही वाटत नाही. ना नेत्यांना, ना कार्यकर्त्यांना. फलक लावण्यामध्येही कोंबडी विके, मांसाहारी ताट, काज-बटण, सेल, चाक पंक्चर, कामगार पाहिजेत पासून कशाचेही फलक आहेत. अनेक चौक, रस्त्यांना महापुरुष, स्वातंत्र्य चळवळीतील लोक, संत, देशातील महनीय व्यक्ति अशांची नावे आहेत. मात्र, त्यांच्या कार्याचा अवमान होईल असे विसंगत फलकही पाहायला मिळतात.
शहरात येणाऱ्यांचे स्वागत अशा फलकांनी होते, याचे वैषम्य महापालिका प्रशासनाला कधी वाटलेच नाही. विभागाच्या दोन गाड्या आणि चारपाच कंत्राटी कर्मचारी पाठवायचे. कोणत्यातरी चौकातील अगदीच निरुपद्रवी फलकांवर किरकोळ कारवाई करायची. मोठमोठ्या फलकांना हात लावण्याची हिंमत कधी दाखविली गेलीच नाही. त्याचमुळे अगदी महापालिका भवन, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयालगतचे चौक फलकांनी भरून गेलेले असतात. आकाशचिन्ह परवाना विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग यांना कोणी जाबच विचारलेला नाही. लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्या नगरसेवकांनीही महापालिका सभागृह कधी दणाणून सोडलेले नाही. कारण प्रत्येक नगरसेवकाला स्वतःचा वाढदिवस प्रभागात असाच साजरा करायचा असतो. काहींची उपजीविकाच टेंडर असल्याने बेकायदा फलकांवर कारवाई करा असा विषय सभेत मी मांडणार आहे, अशी केवळ कुजबूज पसरवत परस्पर मलिदा मिळविण्याचाही धंदा केला आहे.
असे सारे चित्र दिसत असले तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. शहरातील काही सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, अनेक नागरिक, प्रशासनातील चांगले अधिकारी स्वच्छ सुंदर-पिंपरी चिंचवड शहर या मोहिमेत काम करत आहेत. त्यांची ताकद तुलनेत कमी दिसत असली तरी ते सतत अव्याहत प्रयत्नशील आहेत. केवळ खंत न बाळगता या संस्थांच्या कामांना बळकटी मिळण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था व सामान्य नागरिकांची एकजूट गरजेची आहे. माझा प्रभाग-मी जबाबदार अशी भूमिका रुजवायला हवी.
शहरात बेकायदा फ्लेक्स व होर्डिंगने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शुभेच्छांपासून अभिनंदनापर्यंत आणि बारशापासून ते श्रद्धांजलीपर्यंतच्या फ्लेक्सचा समावेश होतो. गल्लीतील सोम्या- गोम्यापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत यात आघाडीवर असतात. कसंही करून आपलीच छबी लोकांसमोर राहावी, यासाठी अट्टहास चालू असतो. मात्र, आपलं शहर विद्रूप करणाऱ्यांना धडा शिकवायची वेळ आता आली आहे आणि सर्वसामान्यांच्या रेट्यामुळेच यात नक्की बदल घडू शकतो. फक्त यासाठी आपल्यातील इच्छाशक्ती जागृत व्हायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.