कामशेत (ता. मावळ) : ‘‘मी रोजंदारीवर कामाला जायला सुरुवात केली. आज सत्तावीस वर्षे झाली. रोज दीड तास जायला अन् दोन तास यायला लागतात. अशी डोंगराची चढण पार करीत माझी पायपीट सुरू आहे. आता गुडघे थकले आहेत, पण घरात बसून चालणार नाही. कारण पोटाला भाकरी मिळावी, यासाठी काम केले पाहिजे. म्हणून रोजच्या जगण्यासाठी पायपीट करीत कामधंदा करतोय. अकरा रुपये मिळणारी हजेरी आता पावणे तीनशेवर पोचली आहे. याच कमाईतून संसाराचा गाडा हाकतोय. दोन मुलींची लग्न केली, दोन मुले शिकताहेत,’’ असे सटवाईवाडीतील चंद्रकांत सुपे रोजच्या जगण्यासाठी होणारी पायपीट सांगत होते.
रोजची अशी पायपीट करणारे सुपे एकटे नाहीत. सह्याद्रीच्या पठारावरील सटवाईवाडीतील सगळ्यांची ही अवस्था आहे. पहाटे चारला यांचा दिवस उगवतो अन् रात्री दहाला मावळतो. पन्नास घरांची आणि अडीचशे लोकसंख्या असलेल्या सटवाईवाडीकरांची आयुष्यभर पायपीट सुरू आहे. निसर्गाचा लहरीपणा अनुभवत आहे. पावसाच्या पाण्यावर बेभरवशाची शेती, त्यात पिकलेल्या शिवारात रानडुक्कर, माकडांचा उपद्रव कमी नाही. नुसते भात व नाचणी पिकवून घर चालत नाही. त्याला बाकीचा खर्च आहे. त्यासाठी आम्ही मिळेल ते आणि जिथे मिळेल तेथे काम करतो, असे रहिवासी एकनाथ हेमाडे सांगत होते. जिजाबाई सुपे म्हणाल्या, ‘‘मी आणि गावातील कित्येक महिला गवत कापायला काट्यावर जातो. यातून कुटुंबाला हातभार लागतो.’’ रंगाबाई कशाळे, ताराबाई हेमाडे, शैला हेमाडे, शैला गवारी, सुदाम हेमाडे, काळू हेमाडे, एकनाथ हेमाडे, दिनेश चिमटे, शांताराम सुपे, अंकुश दाते असे अनेक जण आहेत, ज्यांचे उभे आयुष्य पायपीट करण्यात गेले.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कामासाठी जातात दूरवर...
‘उकसाण, गोवित्री, माऊ, वहानगाव, टाकवे बुद्रूक, कामशेत व लोणावळा या परिसरात गावातील पुरुष-स्त्रिया कामासाठी जातात. पुरुषाला तीनशे रुपये, तर महिलेला दोनशे रुपये मजुरी मिळते. त्यामुळे गावात केवळ आठ ते दहा वृद्ध आणि वीस-पंचवीस लहान मुलेच दिवसभर असतात. नाहीतर दिवसभर गाव सुनेसुने राहाते,’ असे रूपाली सुपे यांनी सांगितले.
पाऊलवाटा तुडवत आमची जगण्याची धडपड सुरू आहे. या धडपडीकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.
- रूपाली सुपे, ग्रामपंचायत सदस्य, वडेश्वर
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(संपादन : शिवनंदन बाविस्कर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.