PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी विरोधकांकडून भाजपवर टिकास्त्र

पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष व त्यांच्या स्वीय सहायकासह पाच जणांना ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्ष (Chairman) व त्यांच्या स्वीय सहायकासह पाच जणांना ठेकेदाराकडून (Contractor) लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक (Arrested) केली. या प्रकाराचे पडसाद शहरात उमटले असून विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील भाजपवर (BJP) टीका (Comment) केली आहे. तर, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्षांची बाजू घेत त्यांना गोवण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल व ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

भाजपची आज सत्त्वपरीक्षा

महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोन वाजता आहे. मात्र, बुधवारी (ता. १८) ठेकेदाराकडून लाच स्विकारल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष व त्यांच्या स्वीय सहायकासह पाच जणांना अटक झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना आक्रमक झाले आहेत. लाच प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी महापालिका प्रवेशद्वारावर व सर्वसाधारण सभागृहासमोर ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, सभागृहातही ते लाच प्रकणावरूनच सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सर्वसाधारण सभेबाबत काय भूमिका घेणार?, सभा होणार की काही तरी निमित्त करून तहकूब करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक प्रकारे भाजपसाठी शुक्रवार सत्त्वपरीक्षेचा ठरणार आहे.

घटना अतिशय निंदणीय : वाघेरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंधरा वर्षांत विकासकामे करून शहराचा चेहरामोहरा बदला. जगाच्या नकाशावर शहराची वेगळी ओळख निर्माण केली. भाजपच्या साडेचार वर्षांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. कालची घटना अतिशय निंदणीय आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावर कारवाई व्हावी. आमच्या पक्षाचा कोणी दोषी असेल. तर, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. चौकशीनंतर सर्व गूढ बाहेर येईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

मंजूर विषयांना स्थगिती : मिसाळ

कालच्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेल्या सर्व विषयांना स्थगिती देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राष्ट्रवादीने बेस्ट सिटी म्हणून शहराची ओळख देशात निर्माण केली होती. भाजपने पाच वर्षात भ्रष्टाचारी शहर अशी ओळख केली आहे. काहीतरी गूढ असल्यामुळेच न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असेल. त्यांच्या पक्षाच्या आमदारांना आता सांगायला काही राहिले नाही, असे महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सांगितले.

इतर सदस्यांनी खुलासे करावेत : साठे

भाजपच्या अखत्यारितील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात हात घालून संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याचा हा परिपाक आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. प्रदेश व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचे पाईक आहोत, हे सद्ध करावे, निपक्षपणे चौकशी व्हावी आणि स्थायी समितीतील इतर पक्षीय सदस्यांनी जाहीर खुलासा करावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

स्थायी समिती बरखास्त करा : किर्दत

महापालिकेत घडलेल्या प्रकरणावरून जनतेच्या पैशांचा किती अपहार होतो आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चढाओढ का असते? हे स्पष्ट होते. कोरोना काळातील सर्वच प्रकरणात भाजप व राष्ट्रवादी सदस्य एकमुखाने सर्व प्रस्ताव मान्य करत असल्याचे गेले काही महिने दिसत होते. यात राष्ट्रवादीलासुद्धा विश्‍वासात घेतले होते का?, असा प्रश्‍न पडतो. स्थायी समिती तातडीने बरखास्त करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे म्हणणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. नैतिकता असल्यास भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा. घडलेल्या प्रकाराच्या चौकशीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ताब्यात घेतलेल्यांच्या मागील सूत्रधार शोधणे गरजेचे असून, त्याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात.

- अण्णा बनसोडे, आमदार

स्थायी समिती सभापतींसह चार कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिशय खालच्या थराला जाऊन राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. कोणताही लेखी पुरावा नसताना कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्ष लांडगे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

- महेश लांडगे, आमदार

अ‍ॅड. नितीन लांडगे स्वच्छ प्रतिमा व घरंदाज व्यक्तिमत्व आहे. कोणताही लोभ मनात ठेवून ते काहीही करणार नाही. भारतीय जनता पक्ष शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपची सत्ता शहरात येणार असल्याने केवळ राजकीय हेतूने अँटिकरप्शनचा प्रकार रचलेला आहे.

- लक्ष्मण जगताप, आमदार

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेत छापा टाकल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा हा प्रताप उघडकीस आला आहे. ही सत्ता त्वरित बरखास्त करण्यात यावी. महापालिकेतील सर्वच विभागांशी संबंधित पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी. ती पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमावा.

- विलास लांडे, माजी आमदार

इथे कुणीही स्वच्छ नाहीत : कडूलकर

महापालिका तिजोरीतून लोकप्रतिनिधी टक्केवारी मिळवत आहेत. स्थायी समितीत सर्व पक्षांचे नगरसेवक आहेत. मात्र, समितीतील टक्केवारीवर व भ्रष्ट कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणतीही परखड भूमिका घेतलेली नाही. सर्व विकास कामांच्या निविदांची आणि सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या आर्थिक समृद्धीची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.

तक्रारदारास संरक्षण द्या : कांबळे

स्वराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेतर्फे तत्कालीन नगरसेवक व आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध लाचप्रकरणी अँटिकरप्शन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर कारवाई होऊन नगरसेवकाला अटक झाली. मात्र, तक्रारदार संस्थेवर अघोषित बंदी घालून तत्कालीन कारभाऱ्यांनी कामे काढून घेतली होती. यामुळे अनेकदा ठेकेदार तक्रार करत नाहीत व भ्रष्टाचार बोकाळतो. तक्रारदारास संरक्षण द्यायला हवे, असे कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले.

साडेचार वर्षांची चौकशी व्हावी : भापकर

महापालिकेत टक्केवारीचे राजकारण व गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी २०१७ पासून करीत आहे. मात्र, सरकारने भ्रष्ट लोकांना पाठीशी घातले. आता लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेला स्थायी समिती अध्यक्षांचा स्वीय सहायक कोणाकोणासाठी पैसे घेत होता, याची सखाल चौकशी करावी. स्थायी समितीच्या गेल्या साडेचार वर्षांच्या सर्व निर्णयाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली.

मिसाळ करणार शहानिशा : थोरात

ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून अडकविल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन, या कटकारस्थानाचे मूळ शोधण्यासाठी भाजपच्या पिंपरी-चिंचवड प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कळविले आहे. शुक्रवारी त्या शहरात येणार असून तक्रारी मागील सत्य जाणून घेतील, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT