पिंपरी : चिखली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी तळेगाव दाभाडे येथीलही नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे), योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. मांजरी, पुणे. मूळ रा. सांगली) अशी निगडी ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी घर देण्याचे आमिष दाखवून रवींद्र शिंदे, साक्षीदार संतोष सुदाम चव्हाण, गोरखनाथ विठोबा गवंड, प्रवीण गावडे, बबन लोंबाटे आदींकडून सात लाख ६२ हजार रुपये घेतले. मात्र, घर व गाळा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात भोसले याच्याकडून एक लाख तर ढोले यांच्याकडून तीन लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी आबासाहेब भोसले याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. किरण मधुकर साबळे (रा. सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे) यांना व त्यांच्या भावाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत घर मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. साबळे यांच्याकडून ९६ हजार रुपये घेतले. वैशाली सातकर यांच्याकडून एक लाख ५ हजार, पुरुषोत्तम राऊत, सीमा गायकवाड, देढे यांच्याकडून वेगवेगळ्या रकमा घेतल्या. तर लक्ष्मी नारायण राऊत यांच्याकडूनही साठ हजार घेतल्याचे समोर आले असून या आरोपीने तळेगाव येथील प्रकरणात एकूण दोन लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न
या गुन्ह्यातील महत्वाची कागदपत्रे नष्ट करण्यासाठी आरोपीची पत्नी सपना भोसले हिने सर्व कागदपत्रे नातेवाईकाला दिले. मात्र, पोलिसांनी सापळा रचून देहूरोडमधील सेंट्रल चौकात नातेवाईकांची रिक्षा अडवली. त्यामध्ये माउली विजय गलांडे व निशा गलांडे (रा. वडगाव शेरी) हे होते.
त्यांच्याकडील बॅगमध्ये सांगली जिल्ह्यातील ढालगाव ग्रामपंचायत, रांजनीतील चिकित्सा अधिकारी ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नेहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोपायतर आदींचे बनावट रबरी शिक्के व शाई पॅड सापडले. यासह आरोपी भोसलेची वैयक्तिक कागदपत्रांच्या प्रती, इतर काही लोकांच्या ओळखपत्रांच्या प्रती व तीनशे लोकांची नावे, त्यांच्या नावासमोर काही रक्कम, फ्लॅट नंबर लिहिलेले आढळले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.