पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर मेट्रोच्या कामावरही कोरोनाचा परिणाम झालाय. सुमारे सहा महिन्यांपासून कामकाज ठप्प आहे. मेट्रोचा जिओटेक्निकल सर्व्हे झाला, पण प्रलंबित जागांबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. कास्टिंग यार्ड व कार डेपोच्या उर्वरीत जागेचा प्रस्तावही शासकीय खात्यांच्या पाठपुराव्यात रेंगाळला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 2020 मध्ये धावणारी पीएमआरडीएची मेट्रो 2023 मध्ये धावण्याची चिन्हे आहेत.
पीएमआरडीएने पुणे विद्यापीठाजवळचे दोन पूल पाडले. त्यानंतर कोविड जम्बो सेंटर उभारणीसाठी हातभार लावला. त्या दरम्यान मेट्रोच्या जिओटेक्निकल र्स्व्हेचे काम सुरू आहे. सॉईल टेस्टिंगचे काम बालेवाडीपर्यंत पूर्ण झाले. मात्र, पुणे विद्यापीठ दरम्यानचा काही भाग अद्यापही प्रलंबित राहिलेला आहे. माण येथे मंजूर झालेली कार डेपोच्या 13.2 हेक्टरपैकी उरलेल्या 7.5 हेक्टर जागा अद्यापपर्यंत पीएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. तसेच, मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी वाकड-ताथवडे चौकाजवळील यशदाची 15 हेक्टर जागेचेही हस्तातंरण झालेले नाही. या दोन महत्त्वाच्या जागेचा प्रश्न निकाली लागल्याशिवाय मेट्रोचे कामकाज पुढे सरकरणार नाही.
मेट्रोच्या विकासकामांमध्ये कोणतीही गतीशिलता अद्यापपर्यंत आली नाही. आयुक्त विक्रम कुमार यांच्यानंतर आयुक्त सुहास दिवसे यांनी पीएमआरडीएची सूत्रे हाती घेतली. आयुक्त दिवसे यांना प्राधिकरणाच्या कामकाजामधला पूर्वीचा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे तो अनुभव मेट्रो व इतर पीएमआरडीएच्या प्रकल्पात उपयोगी पडणार आहे. यासंदर्भात दिवसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
मेट्रोसह सर्व प्रकल्प कन्सलटंटवरच
सध्या पीएमआरडीएमध्ये विविध प्रकल्पांसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने मेट्रोसह प्रत्येक प्रकल्पात कन्सलटंटवरच भार सोपवला जात आहे. त्यामुळे अधिकारी आणि कन्सलटंट यांच्या मनधरणीवरच पीएमआरडीएचा डोलारा उभा आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी टाटा कंपनीची मदत होत असली, तरी पीएमआरडीएकडे मेट्रोसारख्या महत्त्वकांक्षी मोठ्या प्रकल्पासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचा तुटवडा आहे. एक मुख्य अभियंता व दोन कार्यकारी अभियंत्यावरच मेट्रोचे कामकाज सुरू आहे. उरलेल्या कंत्राटी मनुष्यबळावरच पीएमआरडीएची भिस्त आहे.
दोन ते तीन महिने कोविड परिस्थितीत गेले. कार डेपो व कास्टिंग यार्डच्या दोन्ही जागांचा पाठपुरावा सुरू आहे. जवळपास 75 टक्के जागा मेट्रोची ताब्यात आलेली आहे. मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. स्वतंत्र इंजिनिअरची नेमणूक केलेली आहे. मेट्रोच्या डिझाईनचं काम सुरू आहे. लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागतील. मेट्रो सुरू होण्यापासून अंदाजे तीन वर्षांचा कालावधी लागतो. 2023 मध्ये मेट्रो पूर्ण होईल.- विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.