Indrayani River Water Pollution Sakal
पिंपरी-चिंचवड

Indrayani River Pollution : इंद्रायणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांना ना तीर्थ, ना तीर्थस्नान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात आळंदीची कार्तिकी वारी अवघ्या चार दिवसांवर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- पीतांबर लोहार/विलास काटे

पिंपरी/आळंदी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात आळंदीची कार्तिकी वारी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मावळ आणि खेड तालुक्यातील गावांसह चाकण, तळेगाव, निघोजे अशा औद्योगिक क्षेत्रांतील रसायनयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीत सोडले जात आहे.

त्यामुळे नदीचे पात्र काळवंडले आहे. शुक्रवारी (ता. १) पहाटेपासून पाण्यावर पुन्हा फेस तरंगू लागला आहे. गेल्या महिन्याभरातील हा दुसरा प्रकार आहे. प्रदूषणाबाबत ओरड झाली की केवळ बैठकी घेण्याचे नाटक करून कारवाईचे कागदी घोडे प्रशासनाकडून नाचविले जातात. भाविकांना मात्र तीर्थस्नानापासून आणि तीर्थप्राशन करण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र आहेत. आळंदीची कार्तिकी वारी मंगळवारपासून (ता. ५) सुरू होत आहे. पंढरपूरची कार्तिकी वारी संपवून भाविक आळंदी दाखल होऊ लागले आहेत. दर्शनापूर्वी इंद्रायणीत स्नान करायचे, तीर्थ घ्यायचे, ही भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नदी घाटावर नेहमीच गर्दी असते. तशी शुक्रवारी पहाटेपासूनही गर्दी होती.

पण, नदीत बर्फाप्रमाणे फेस आलेला होता. इंद्रायणीनगर व केळगावजवळील बंधाऱ्यापासून नदीत दुथडी फेस पसरलेला होता. नदीच्या जवळून जातानासुद्धा नदीपात्रातील पाण्याला उग्र वास येत होता. नाक मुठीत धरून चालावे लागत होते. प्रदूषित पाण्यामुळे अनेक जलचर प्राणी दिसेनासे झाले होते. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

दोषींना पाठबळ

कार्तिकी वारी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. पण, नदीत मिसळणारा प्रदूषित पाण्याचा प्रवाह थांबायला तयार नाही. वारी काळात वडिवळे आंद्रा धरणातील पाणी सोडले जाणार आहे. मात्र, अखंड वाहणारे प्रदूषित, सांडपाणी मात्र कुणीच थांबवू शकले नाहीत. यासाठी सर्व राजकीय शक्ती आणि प्रशासन दुर्लक्षच करीत आहेत.

आतापर्यंत इंद्रायणीचे प्रदूषण हटवून नदीपात्र संवर्धन आणि स्वच्छतेसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील, रामदास कदम यांनी आश्वासने दिली. बैठका घेतल्या. निधीची घोषणाही झाल्या. पण प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईबाबत ठोस भूमिका आणि पाठपुरावा कुणीच घेतला नाही. प्रदूषण करणाऱ्यांना राजकीय, प्रशासकीय पाठबळ असल्यानेच इंद्रायणीची दुरवस्था पाहायला मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सांडपाणी थेट नदीत

गेल्या काही वर्षांपासून इंद्रायणीच्या उगमापासूनच विविध ग्रामपंचायती, नगर परिषदा, औद्योगिक भागातील छोटे-मोठे कारखाने, पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर व महापालिका हद्दीतील चिखली कुदळवाडी भागातून रसायनयुक्त आणि मैलापाणी थेट नदीत सोडले जात आहे. परिणामी इंद्रायणीला गटाराचे स्वरूप आले आहे. बहुतांश ठिकाणी पाणी काळवंडलेले आहे.

हिरवट पिवळा रंग दिसत आहे. पाण्यावर फेसही मोठ्या प्रमाणात असतो. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे इंद्रायणी बारमाही वाहत असते. मात्र, सगळीकडे सांडपाणीच आहे. आळंदी नगर परिषद हद्दीतील सांडपाणीही नदीपात्रात सोडले जात आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणतात...

आळंदीतील कार्तिकी वारीसाठी वडिवळे धरणातून दीडशे क्युसेक आणि आंद्रा धरणातून शंभर क्युसेकप्रमाणे दोन दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नदीचे पात्र निवळेल, अशी आशा होती. मात्र, नदीतील पाणी अधिक फेसाळ झाल्यामुळे प्रदूषण करणाऱ्या यंत्रणांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. या प्रदूषणाबाबत मार्ग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.

- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, नगर परिषद, आळंदी

इंद्रायणी नदीला केवळ पिंपरी-चिंचवडचेच नव्हे तर सगळीकडून सांडपाणी मिळते. सध्या धरणांतून पाणी सोडलेले आहे. त्यामुळे केळगावजवळील बंधाऱ्यात पाणी ढवळले जात असल्याने फेसाळले आहे. शहरातील पाच-सहा व पीएमआरडीएच्या हद्दीतून अकरा नाले नदीला मिळतात. आम्ही पाच नाल्यांचे पाणी प्रक्रिया प्रकल्पात वळवले आहे.

कुदळवाडी नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महिनाभरात कार्यान्वित होईल. नदीचे प्रदूषण रोखण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय.

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका, पिंपरी-चिंचवड

ठोस कृती हवी

पिंपरी-चिंचवड भागात इंद्रायणी स्वच्छता जनजागृती अभियानासाठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली आहे. त्यातून केवळ जनजागृती होईल. प्रत्यक्षात नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, अशी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची अपेक्षा आहे.

वारकरी म्हणतात...

देहू आणि आळंदी ही महाराष्ट्राची अस्मिता केंद्र आहेत. या क्षेत्रांना जोडणारा समान धागा म्हणजे इंद्रायणी नदी होय. तिला आपण पुण्यसलिला म्हणतो. मात्र, तिच्या स्वच्छतेचा विचार करता, आज परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रभरातून लाखो लोक कार्तिक वारीसाठी आळंदीला येतील. ते श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करतात. जलपर्णीचा विळखा व फेसाळलेपणा यामुळे आरोग्याला हानी होऊ शकते. वारीच्या धर्तीवर यथाशक्य उपाययोजना व्हावी.

- भागवत महाराज साळुंके, कीर्तनकार, आळंदी

आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असताना कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणी नदीची स्वच्छता करायचो. साधारण दोनशे मुले असायचो. स्नानासाठीही जात होतो. पण, अंगाला खाज येत असल्याने आता स्नानासाठीही ते पाणी वापरत नाही. देहूपेक्षा आळंदीत नदी अधिक प्रदूषित दिसते. अनेक कंपन्यांतील सांडपाणी नदीत मिसळते, त्यामुळे फेस येतो. असे पाणी प्रक्रिया करूनच सोडायला हवे किंवा नदीत सांडपाणी सोडण्यावर पूर्णपणे निर्बंध आणायला हवेत.

- भागवत महाराज पाटील, साधक, आळंदी

पर्यावरणप्रेमी म्हणतात...

इंद्रायणी नदी प्रदूषण कशामुळे झाले आहे? ती कशामुळे प्रदूषित होत आहे? नदीतील पाण्यावर कशामुळे फेस येत आहे? याची कारणे शोधायला हवीत. त्यासाठी जलतज्ज्ञांची मते प्रशासनाने जाणून घ्यायला हवीत. पर्यावरणप्रेमींनी किंवा वारकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर किंवा नदीचे पात्र, फेसाळल्यानंतर केवळ तात्पुरती कारवाई करून उपयोग नाही. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. त्यासाठीच सायक्लॉथॉन आयोजित केली आहे.

- डॉ. नीलेश लोंढे, भोसरी

प्रदूषणाबाबत नदीबरोबरच तिची प्रणाली समजून घेतली पाहिजे. नदीला मिळणारे नाले, ओढे यांची स्थिती बघायला हवी. नाल्यांतून रसायनयुक्त सांडपाणी सतत नदीत मिसळत असते. तिच्या प्रदूषणाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवणे थांबवावे, त्यांची ही भूमिका पर्यावरणासाठी घातक आहे. कुदळवाडी नाल्याद्वारे रात्री कंपन्यांतील सांडपाणी नदीत सोडले जाते, याला अधिकारीही जबाबदार आहेत. नदी प्रदूषित करून स्वतःचे जीवन आपण संपवत आहोत.

- प्रशांत राऊळ, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT