IT Engineer sakal
पिंपरी-चिंचवड

IT Engineer : आयटी अभियंत्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार; कंपन्यांमधून मनुष्यबळ कपात

नवीन आर्थिक वर्ष म्हणजे नोकरीत पगारवाढीचा व बढतीचा काळ. मात्र, याच काळात शहरातील बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये मनुष्यबळ कपात केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अश्‍विनी पवार

पिंपरी - नवीन आर्थिक वर्ष म्हणजे नोकरीत पगारवाढीचा व बढतीचा काळ. मात्र, याच काळात शहरातील बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये मनुष्यबळ कपात केली जात आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये सुरू असणाऱ्या मंदीची झळ भारतातील आयटी कंपन्यांना बसत आहे.

परदेशातील क्लायंटकडून येणारे प्रोजेक्ट कमी झाल्याने तसेच नवीन प्रोजेक्ट मिळत नसल्याचा मोठा फटका देशातील आयटी कंपन्यांना बसत आहे. उत्पन्न कमी झाल्याने मोठमोठ्या नामांकित कंपन्या सध्या मनुष्यबळ कमी करत आहेत. त्यामुळे आयटी अभियंत्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

चांगली कामगिरी असूनही कपात

सर्वात जास्त पगार व पगारवाढ देणारे क्षेत्र म्हणून आयटी क्षेत्र ओळखले जाते. मात्र, यावर्षी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पगारवाढीची नाही तर; नोकरी वाचावी एवढीच अपेक्षा आहे. कारण गेल्या वर्षी चांगल्या कामगिरीबाबत पगारवाढ व प्रमोशन मिळूनही यंदा खराब कामगिरी असल्याचे सांगत आयटी अभियंत्यांना नोकरीवरून कमी केले जात आहे.

प्रोजेक्ट अभावी करण्यात येणाऱ्या या ‘कॉस्ट कटिंग’मुळे आयटी अभियंत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही कंपन्या प्रोजेक्ट नसल्याचे सांगत जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून राजीनामा देऊन कमी पगारात नवीन कर्मचारी घेत आहेत.

दुसऱ्या शहरातील प्रोजेक्टवर काम

कोरोना काळानंतरही वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊन अनेक कंपन्यांनी नोकरभरती केली. त्यावेळी भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच शहरातील कार्यालयाद्वारे प्रोजेक्टवर काम देण्यात आले. मात्र अचानक या कर्मचाऱ्यांचे प्रोजेक्ट बदलून, त्यांची नेमणूक थेट दुसऱ्या राज्यातील प्रोजेक्टवर करण्यात आली. त्या ठिकाणच्या कार्यालयात हजेरी लावणे अनिवार्य केले. अनेकांना आपले राज्य अथवा शहर सोडून येणे शक्य नसल्याने राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही.

उदाहरण १ : तीन वर्षांपूर्वी हिंजवडीतील आयटी कंपनीत दाखल झालेल्या प्रवीण (नाव बदलले आहे) यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला होता. प्रवीण हे मूळचे नागपूरचे असल्याने ते आपल्या घरूनच काम करत होते. ध्यानीमनी नसताना अचानक कंपनीने त्यांना कामावर हजर होण्यास सांगितले. मात्र घरातील परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही व नाइलाजास्तव राजीनामा द्यावा लागला.

उदाहरण २ : प्रियाला (नाव बदलले आहे) गेल्या वर्षी आपल्या उत्तम कामासाठी प्रमोशन व उत्तम पगारवाढ मिळाली होती. मात्र अचानक व्यवस्थापनाने तिच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्‍यक अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेशन नसल्याचे सांगत राजीनामा मागितला.

उदाहरण ३ : नामांकित मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एका प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मनोजला (नाव बदलले आहे) अचानक दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करण्यास सांगण्यात आले. या प्रोजेक्टसाठी दुसऱ्या राज्यातील शहर कार्यालयात हजर राहणे क्रमप्राप्त होते. मात्र, संबंधित आयटी अभियंत्याला हे शक्य नसल्याने नोकरी सोडावी लागली.

अशीही कर्मचारी कपात

कोरोना काळात अनेक नामांकित आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. कर्मचारीच नसल्याने कार्यालयातील पायाभूत सुविधांच्या खर्चात बचत होत असल्याने अनेक कंपन्यांनी कोरोना काळानंतरही ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध ठेवला. जो कर्मचाऱ्यांच्याही सोयीचा ठरला. मात्र काही दिवसांपूर्वी याच कंपन्यांनी हायब्रीड व वर्क फ्रॉम ऑफिस ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली.

कोणतेही कारण न देता कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करणे अनिवार्य करण्यात आले. दुसऱ्या शहरातील अनेकांना हे सोयीचे नसल्याने नाइलाजास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली आहे. त्यामुळे कार्यालयात हजर राहणे हे केवळ कपातीचे कारण असल्याचे कर्मचारी सांगतात.

सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. बाहेरून येणारे प्रोजेक्ट कमी झाल्याने बहुतांश कंपन्यांचे उत्पन्न घटले आहे. यामुळे चांगला परफॉर्मन्स असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपली नोकरी गमवावी लागत आहे.

- महिला आयटी अभियंता

वर्क फ्रॉम होम असल्याने घरापासून लांब अंतरावरील कंपनीमध्ये मी रुजू झालो. घरून काम करणे सोयीचे होते. मात्र आता कंपनीने कामावर हजर राहणे अनिवार्य केले आहे. कामाचे स्वरूप व शहरातील वाहतुकीची परिस्थिती पाहता रोज ये जा करणे शक्य नाही. त्यामुळे राजीनामा देऊन दुसरी नोकरी शोधावी, असा विचार आहे. मात्र मंदीमुळे दुसरी नोकरी मिळाली नाही तर; काय असाही प्रश्‍न उपस्थित होतो.

- तरुण आयटी अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT